3
ख्रिस्ताबरोबर पुनरूत्थित होण्याचे परिणाम
1 म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा.
2 वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका;
3 कारण तुम्ही मृत झला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.
4 आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.
5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जिवे मारा.
6 त्यामुळे देवाचा कोप होतो.
7 तुम्हीही पूर्वी त्या वासनांत जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता.
8 परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग व दुष्टपण, निंदा आणि तुमच्या मुखाने शिवीगाळ करणे, हे सर्व आपणापासून दूर करा.
9 एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे
10 आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माण करणार्याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्यास तुम्ही परिधान केले आहे.
11 ह्यात ग्रीक व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्वकाही आहे व सर्वांत आहे.
12 तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करूणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा.
13 एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा.
14 पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा.
15 ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.
16 ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
17 आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
ख्रिस्ती मनुष्याचे गृहजीवन
18 स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा.
19 पतींनो, आपआपल्या पत्नीवर प्रीती करा; तिच्याशी निष्ठूरतेने वागू नका.
20 मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे.
21 वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.
22 दासांनो, दैहिक दृष्ट्या जे तुमचे मालक आहेत त्यांचे सर्व गोष्टींत आज्ञापालन करा. मनुष्यांना खुश करणार्या नोकरासारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.
23 आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.
24 प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल तुम्ही हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा.
25 कारण अन्याय करणाऱ्याने जो अन्याय केला तोच त्यास मिळेल आणि पक्षपात होणार नाही.