यहेज्केल
लेखक
हे पुस्तक बुजीचा पुत्र यहेज्केल याजक आणि संदेष्टा याला उद्देशून आहे. त्याला यरूशलेमध्ये एक याजक म्हणून वाढविण्यात आले होते आणि तो बाबेलच्या बंदिवासात यहूदी लोकांसोबत राहिला. यहेज्केलच्या याजकवर्गाने आपल्या भविष्यसूचक सेवेत घालवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो नेहमी मंदिरात, याजकगणाचे, प्रभूचे गौरव आणि बलिदान व्यवस्थेसारख्या विषयांशी संबंधित होता. या पुस्तकामध्ये यहेज्केलला “मानवाच्या मुला” असे संबोधण्यात आले आहे, याचा अर्थ “नाशवंत मनुष्या” असा ही होतो.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 593 - 570.
यहेज्केलने बाबेलमधून लिहिले, परंतु त्याच्या भविष्यवाण्या इस्त्राएल, मिसर आणि काही शेजारच्या देशांशी संबंधित आहेत.
प्राप्तकर्ता
बाबेलमध्ये आणि घरात राहणारे इस्त्राएली लोक आणि नंतरचे पवित्र शास्त्राचे सर्व वाचक.
हेतू
यहेज्केलने त्याच्या पिढीसाठी सेवा केली ज्या (पिढी) बहुतेक पापी आणि निराशाजनक होत्या. त्याच्या भविष्यसूचक सेवाकार्याद्वारे त्याने त्यांना त्वरीत पश्चात्ताप करण्यास आणि दूरच्या भविष्यकाळात आत्मविश्वास आणण्याचा प्रयत्न केला. त्याने शिकवले की देव मानवी संदेशवाहकाद्वारे कार्य करतो, अगदी पराभूत होऊन निराश होऊनही देवाच्या लोकांना देवाच्या सार्वभौमत्वाची पुष्टी करणे आवश्यक आहे, देवाचे वचन कधीच चुकत नाही, देव अस्तित्वात आहे आणि कोठेही त्याची उपासना करता येऊ शकते. यहेज्केलचे पुस्तक जेव्हा आपल्याला वाटते कि हरलो त्या अंधकाराच्या काळात परमेश्वराचा शोध घेण्यास आर्जवतो, आपल्या स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करणे, आणि एक खरा देव यांच्याशी एकरूप होणे.
विषय
देवाचे गौरव
रूपरेषा
1. यहेज्केलला बोलावणे — 1:1-3:27
2. यरूशलेम, यहूदा आणि मंदिर यांच्याविरुद्ध भविष्यवाण्या — 4:1-24:27
3. राष्ट्रांविरुद्ध भविष्यवाण्या — 25:1-32:32
4. इस्त्राएल लोकांविषयी भविष्यवाण्या — 33:1-39:29
5. पुनर्संचयीताचा दृष्टांत — 40:1-48:35
1
संदेष्ट्याला दिव्य दृष्टांत
1 माझ्या आयुष्याच्या तिसाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, मी खबार नदीच्या तीरी दास्यात गेलेल्या लोकांसोबत राहत होतो. तेव्हा स्वर्ग उघडला आणि मी देवाचा दृष्टांत पाहिला.
2 तो त्या महिन्याच्या पाचवा दिवस होता, आणि ते यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते.
3 खबार नदिच्या जवळ, खास्द्यांच्या देशात बूजीचा मुलगा यहेज्केल याजकाकडे परमेश्वर देवाचे वचन सामर्थ्याने आले व परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर आला.
4 तेव्हा मी पाहिले उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तो एक अग्नीने धुमसणारा, मध्य भागात विजांचा पिवळसर प्रकाश मध्यभागी चमकत असलेला विशाल मेघ होता.
5 मध्यभागी चार जिवंत प्राण्याच्या आकाराचे काही नजरेस पडले; ते माणसासारखे दिसत होते,
6 पण त्यांना चार तोंडे होती, आणि प्रत्येक प्राण्याला चार पंख होते.
7 त्यांचे पाय सरळ होते पण तळवे वासरांच्या तळव्यासारखे आणि पितळेसारखे चकाकणारे होते.
8 त्यांच्या चोहोबाजूंना पंखाखाली त्यांना मनुष्याचे हात होते. त्या चौघांना त्यांचे मुखे व पंख याप्रमाणे होतेः
9 त्यांचे पंख त्यांच्या बाजूच्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत आणि पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते; त्याऐवजी त्यांच्यापैकी प्रत्येक आपल्यापुढे नीट सरळ चालत असे.
10 त्या चौघांच्या मुखापैकी एकाचे मुख मनुष्याच्या तोंडासारखे दिसत होते, दुसऱ्याचे मुख सिंहाच्या तोंडासारखे, तिसऱ्याचे मुख बैलासारखे आणि चौथ्याचे मुख गरुडाच्या तोंडासारखे होते.
11 त्यांची मुखे अशाप्रकारची होती आणि त्यांचे पंख एकमेकापासून वेगळे होते, प्रत्येक प्राण्याचे पंख दुसऱ्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करत होते.
12 प्रत्येक जण सरळ जात होता, जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत तसे ते न वळता, सरळ पुढे जात.
13 ते जिवंत प्राणी जळत्या कोलीतासमान किंवा मशालीसमान दिसत होते; त्यांच्यातून प्रखर अग्नी निघत होता व विजा चकाकत होत्या.
14 हे जिवंत प्राणी चपळतेने पुढे मागे हालचाल करीत होते आणि ते विजेसारखे दिसत होते!
15 मग मी त्या प्राण्यांकडे पाहिले त्या जिवंत प्राण्यांच्या बाजूला भूमीवर एक एक चाक होते.
16 त्या चाकांचे स्वरूप असे दिसत होतेः चारही चाके एक समान व वैडूर्य मण्यांसारखी होती; आणि जणूकाही चाकात चाक घातलेले असून त्यांना एकमेकांस छेदलेले असावे असा त्यांचा आकार होता.
17 जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत.
18 त्यांच्या धावा या भयावह व उंच होत्या, कारण त्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते!
19 जेव्हा ते जिवंत प्राणी चालत तेव्हा त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती.
20 जेथे जिवंत प्राण्यांचा आत्मा त्यांना नेऊ इच्छित होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता.
21 जेव्हा केव्हा ते प्राणी चालत चाकेही हालचाल करीत, जेव्हा ते थांबत चाकेही थांबत, जेव्हा ते उंच उडत त्यांच्या सोबत चाकेही उंच उडत होती कारण त्यांचा आत्मा त्यांच्या चाकांत वास करीत होता.
22 त्या जिवंत प्राण्यांच्या मस्तकावर महागड्या घुमटासारखे चकाकणारे दिसत होते, त्यांच्या कपाळावर स्फटिकासारखे चमकत होते.
23 घुमटाखाली प्राणी आपले पंख सरळ लांब पसरवत होते आणि एकमेकांच्या पंखांना ते स्पर्श करीत होते. प्रत्येक प्राण्याच्या पंखांच्या जोडीने आपले शरीर झाकीत आणि दोन-दोन पंखांनी स्वतःला आवरण करीत.
24 तेव्हा मी त्यांच्या पंखांचा पाण्याच्या धबधब्यासारखा मोठा आवाज ऐकला. तो सर्वसामर्थ्य देवाच्या वाणीसारखा होता. ते चालत तेव्हा जोरदार पर्जन्यवृष्टीयुक्त वादळासमान ध्वनी होता. तो ध्वनी मोठ्या सेनेसारखा होता. जेव्हा ते थांबत असे तेव्हा ते आपले पंख खाली करत होते.
25 जेव्हा ते थांबत व आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत तेव्हा त्यांच्या माथ्यावरील घुमटातून आवाज येत होता.
26 त्यांच्या माथ्याच्या वरील घुमटाच्या भागात नीलरत्न जडीत सिंहासन दिसत होते, आणि सिंहासनावर मनुष्याच्या चेहऱ्या समान कोणी असल्याची जाणीव होत होती.
27 त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा प्रकाश मी पाहिला, त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला, व त्याच्या भोवती प्रभा चमकत होती.
28 पाऊस पडतांना दिसणाऱ्या मेघधनुष्यासारखा तो भासत होता त्याच्या भोवती प्रखर तेजोमय प्रकाश होता. हे परमेश्वर देवाचे गौरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहिले व माझ्यासोबत बोलणारी वाणी ऐकली तेव्हा मी उपडा पडलो.