12
पहिला वल्हांडण सण
गण. 9:1-14; अनु. 16:1-8; यहे. 45:21-25
मग मोशे व अहरोन मिसर देशामध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “हा महिना तुमच्यासाठी आरंभीचा महिना व्हावा. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दहाव्या दिवशी प्रत्येक मनुष्याने आपल्या कुटुंबातील लोकांकरता एक कोकरू घ्यावे. आणि एक कोकरू, खाण्यासाठी घरातील माणसे थोडी असली तर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती मनुष्यांना पुरेल याचा अंदाज घ्यावा. तो कोकरा एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निर्दोष असावा, तो कोकरा मेंढरातला किंवा बोकडातला असावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा. या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा. संध्याकाळी इस्राएली मंडळीतील लोकांनी त्यास वधावे. त्या कोकऱ्याचे रक्त घेऊन ते ज्या घरात त्याचे मांस खाणार आहेत त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीवर लावावे. त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून कडू भाजी व बेखमीर भाकरीबरोबर खावे. तुम्ही त्याचे मांस कच्चेच किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडी हीसुद्धा खावीत. 10 त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि सकाळपर्यंत काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे. 11 ते तुम्ही या प्रकारे खावे: तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे*; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे. 12 आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे. 13 परंतु तुमच्या घरांच्या दारावरील रक्त ही एक खूण असेल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून मी पुढे जाईन. मी मिसर देशाला मारीन तेव्हा कोणताही अनर्थ तुम्हावर येणार नाही व तुमचा नाश होणार नाही 14 हा दिवस तुम्हास आठवणीदाखल होईल, हा दिवस परमेश्वरासाठी तुम्ही विशेष उत्सवाचा सण म्हणून पाळावा. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा विधी समजून पाळावा. 15 सात दिवस बेखमीर भाकर खावी; पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. तुम्हातील जर कोणी खमीर घातलेली भाकर खाईल तर त्यास तुम्ही इस्राएल लोकांमधून बाहेर टाकावे. 16 या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; या दोन्ही दिवशी काही काम करू नये. फक्त खाण्यापिण्याच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये. 17 या प्रकारे बेखमीर भाकरीच्या सण पाळावा. कारण याच दिवशी मी तुम्हा सर्वांना मिसर देशातून बाहेर काढून आणले. म्हणून हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. 18 तेव्हा पहिल्या महिन्यातील चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्या. 19 या सात दिवसात तुमच्या घरात खमीर नसावे; कारण जो कोणी एखादी खमिराची वस्तू खाईल मग तो परदेशी असो, किंवा स्वदेशी असो त्यास इस्राएलाच्या मंडळीतून बाहेर टाकावे. 20 त्या दिवशी कोणीही खमीर खाऊ नये; तुम्ही घरोघरी बेखमीर भाकरच खावी.” 21 मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्या लोकांस एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा. 22 मग एजोब झाडाची जुडी घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळावी आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळपट्टीवर लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये. 23 कारण त्या वेळी परमेश्वर मिसरामधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळपट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो ते दार ओलांडून जाईल; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात जाऊ देणार नाही. 24 हा विधी तुम्हास व तुमच्या पुत्रपौत्राला निरंतरचा आहे असे समजून तो पाळावा. 25 परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हास देणार आहे त्यामध्ये तुम्ही जाल तेव्हा तुम्ही हा उपासनेचा प्रकार म्हणून पाळावा. 26 जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हास विचारतील की या उपासनेचा अर्थ काय आहे? 27 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा त्या दिवशी परमेश्वराने मिसराच्या लोकांस मारले व आपल्या घरांना वाचवले त्या वेळी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला, हे ऐकून लोकांनी नतमस्तक होऊन दंडवत घातले. 28 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.
दहावी पीडा: प्रथमवत्साचा मृत्यू
निर्ग. 11:1-10
29 मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनारूढ असलेल्या फारोच्या ज्येष्ठ पुत्रापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत सर्व आणि तसेच गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले. 30 रात्रीच्या वेळी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसराचे लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहा:कार उडाला, कारण ज्यात कोणी मरण पावले नाही असे एकही घर राहिले नाही. 31 तेव्हा रातोरात फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले फारो त्यांना म्हणाला, तुम्ही व तुमचे सर्व इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन तुमच्या परमेश्वराची उपासना करा. 32 आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचे कळप, व गुरेढोरे ही तुमच्याबरोबर घेऊन चालते व्हा, आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या. 33 लोकांनी देशातून तात्काळ निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लावला; कारण ते म्हणाले, आम्ही सर्वजण मेलोच आहोत.” 34 इस्राएल लोकांनी आपली मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहीत कापडात गुंडाळून आपल्या खांद्यावर घेतली. 35 इस्राएली लोकांनी मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या मिसऱ्याजवळ जाऊन कपडे, सोन्यारुप्याचे दागदागिने मागून घेतले.
इस्त्राएल लोक मिसर देश सोडतात
36 मिसरी लोकांची कृपादृष्टी इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले आणि म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिसरी इस्राएल लोकांस लुटले. 37 तेव्हा इस्राएल लोक मिसर देशामधून निघून रामसेस शहरापासून प्रवास करीत सुक्कोथ नगरास गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते. 38 त्यांच्या सोबत लोकांचा मिश्र समुदाय गेला. तसेच पुष्कळ कळप, गुरेढोरे, जनावरे होती. 39 त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती. त्यांना बेखमीर भाकरीच भाजाव्या लागल्या. त्यांना जबरीने बाहेर काढण्यात आले होते. त्यांना थांबण्यास वेळ नव्हता. तसेच खावयास काही विशेष जेवण करता आले नाही; 40 इस्राएली लोक मिसर देशामध्ये येऊन चारशे तीस वर्षे राहिले होते. 41 मग चारशे तीस वर्षांच्या अखेरीस बरोबर त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून बाहेर निघाल्या. 42 परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर काढिले याकरिता ही परमेश्वरासाठी जागरणाची रात्र म्हणून अवश्य पाळावी. इस्राएल लोकांनी पिढ्यानपिढ्या ही रात्र परमेश्वरासाठी जागरणाची म्हणून अवश्य पाळावी.
वल्हांडण सणाच्या विधीचे नियम
उत्प. 17:9-14; निर्ग. 12:1-13
43 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले, “वल्हांडण सण पाळण्याविषयीचे नियम असे आहेत. कोणाही परदेशी मनुष्याने वल्हांडणाचे भोजन खाऊ नये. 44 परंतु जर कोणी एखादा गुलाम विकत घेतला असेल आणि त्याची सुंता त्याने करवून घेतली असेल तर मग त्याने त्यातले खावे; 45 परंतु उपरा मनुष्य किंवा मोलकरी ह्यांपैकी कोणीही ते खाऊ नये. 46 प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये. 47 सर्व इस्राएल मंडळीने हा सण पाळलाच पाहिजे. 48 परदेशीय एकजण तुम्हाबरोबर राहत असेल व जर त्यास परमेश्वराच्या वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्याने सुंता करून घेतलीच पाहिजे. म्हणजे मग तो इस्राएल लोकांसारखा रहिवासी होईल. मग त्याने वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी व्हावे; परंतु त्याने सुंता करून घेतली नाहीतर त्यास त्यातले काही खाता येणार नाही. 49 हे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत, मग तो इस्राएली असो किंवा तुमच्या देशात राहणारा इस्राएली नसलेला कोणी परदेशी असो. प्रत्येकासाठी सारखेच नियम आहेत.” 50 तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यांना ज्या आज्ञा दिल्या त्या सर्व इस्राएली लोकांनी पाळल्या. 51 अशा रीतीने त्याच दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएली लोकांच्या सशस्त्र टोळ्या करून त्यांना टोळीटोळीने मिसर देशातून बाहेर काढून आणले.
* 12:11 घाईघाईने खावे निघण्यासाठी तयार राहणे 12:11 वल्हांडण सण