15
देवाचा अब्रामाशी करार
इब्री. 11:8-10
या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.” अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?” अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.” नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.” मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.” त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला. परमेश्वर त्यास म्हणाला, “हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.” तो त्यास म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?” तो त्यास म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.” 10 त्याने ते सर्व त्याच्याकडे आणले आणि त्यांना चिरून त्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे केले व प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागासमोर ठेवला. पण पक्षी त्याने चिरले नाहीत; 11 कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता पक्ष्यांनी त्यावर झडप घातली, परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले. 12 नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्यास झाकले. 13 मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल. 14 परंतु ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राचा मी न्याय करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील. 15 तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील आणि चांगला म्हातारा झाल्यावर तुला पुरतील. 16 मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. कारण अमोरी लोकांचा अन्याय अद्याप त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला नाही.” 17 सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या त्या तुकड्यांमधून धुराची अग्नीज्वाला आणि अग्नीची ज्योती गेली. 18 त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा 19 केनी, कनिज्जी, कदमोनी, 20 हित्ती, परिज्जी, रेफाईम, 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी यांचा देश मी तुझ्या संतानाला देतो.”