18
वचनपुत्र
इब्री. 13:2
परमेश्वराने मम्रेच्या एलोन झाडांजवळ अब्राहामाला दर्शन दिले, तेव्हा तो दुपारच्या उन्हाच्या वेळी तंबूच्या दाराशी बसला होता. त्याने वर पाहिले आणि, पाहा, आपल्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याने पाहिले. अब्राहामाने जेव्हा त्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना भेटण्यासाठी तंबूच्या दारापासून पळत गेला आणि त्याने त्यांना जमिनीपर्यंत खाली वाकून नमन केले. तो म्हणाला, “प्रभू, जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुझ्या सेवकाला सोडून पुढे जाऊ नका. थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा. मी तुमच्यासाठी थोडे अन्न आणतो, जेणेकरून तुम्हास ताजेतवाने वाटेल. मग तुम्ही तुमच्या मार्गाने जा, यासाठीच तुमच्या या सेवकाकडे तुमचे येणे झाले असावे.” आणि ते म्हणाले, “तू म्हणतोस तसे कर.” अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर *तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.” नंतर अब्राहाम गुरांच्या कळपाकडे पळत गेला आणि त्यातून त्याने कोवळे आणि चांगले वासरू घेतले आणि सेवकाजवळ देऊन त्याने त्यास ते लवकर तयार करण्यास सांगितले. त्याने तयार केलेले वासरू, तसेच दूध व लोणी त्यांच्यापुढे खाण्यासाठी ठेवले आणि ते जेवत असता तो झाडाखाली त्यांच्याजवळ उभा राहिला. ते त्यास म्हणाले, “तुझी पत्नी सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.” 10 त्यांच्यातील एक म्हणाला, “मी वसंतऋतूच्या वेळी तुझ्याकडे नक्की परत येईन, आणि पाहा तेव्हा तुझी पत्नी सारा हिला मुलगा होईल.” तेव्हा त्याच्यामागे असलेल्या तंबूच्या दारामागून सारेने हे ऐकले. 11 आता अब्राहाम व सारा म्हातारे झाले होते, त्यांचे वय बरेच झाले होते, आणि स्त्रीला ज्या वयात मुले होऊ शकतात, ते साराचे वय निघून गेले होते. 12 म्हणून सारा स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा पतीही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?” 13 परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली? 14 परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.” 15 नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”
सदोम नगरासाठी अब्राहामाची मध्यस्थी
16 नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे जाण्यास निघाले. अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर गेला. 17 परमेश्वर देव म्हणाला, “मी जे काही करणार आहे ते अब्राहामापासून लपवू काय? 18 कारण अब्राहामापासून खरोखर एक महान व समर्थ राष्ट्र होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील. 19 मी त्यास यासाठी निवडले आहे की, त्याने आपल्या मुलांना व कुटुंबाला अशी शिकवण द्यावी की, त्यांनी त्याच्यामागे न्यायीपणाने व धार्मिकतेने परमेश्वराचा मार्ग अनुसरावा, म्हणजे मग परमेश्वराने अब्राहामाविषयी जे सांगितले आहे ते तो त्यास प्राप्त करून द्यावे.” 20 मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्या कारणाने, 21 मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.” 22 मग ती माणसे तेथून वळून आणि सदोम नगराकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला. 23 मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय? 24 कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय? 25 असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?” 26 परमेश्वर म्हणाला, “या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.” 27 अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, “पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो! 28 समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?” आणि तो म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.” 29 पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.” 30 तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.” 31 तो म्हणाला, “मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?” परमेश्वराने उत्तर दिले, “त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.” 32 शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.” 33 मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला.
* 18:6 साधारण एकवीस किलो