21
इसहाकाचा जन्म
इब्री. 11:11
1 परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले.
2 अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली, त्यास जी नेमलेली वेळी देवाने सांगितली होती त्या वेळी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला.
3 अब्राहामाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले.
4 देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली.
5 इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता.
6 सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येकजण माझ्याबरोबर हसेल.”
7 आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!”
हागार आणि इश्माएल ह्यांना घालवून देणे
गल. 4:21-30
8 मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.
9 मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले.
10 म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.”
11 त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले.
12 परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल.
13 मी त्या दासीच्या मुलाचेही राष्ट्र करीन, कारण तो तुझा वंशज आहे.”
14 अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.
15 कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले.
16 नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली.
17 देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे
18 ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्यास धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.”
19 मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले.
20 देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला.
21 तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली.
अब्राहाम आणि अबीमलेख ह्यांच्यामधील करार
22 त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्याबरोबर आहे;
23 म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील.”
24 आणि अब्राहाम म्हणाला, “मी शपथ वाहतो.”
25 मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली.
26 अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते.”
27 म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला.
28 अब्राहामाने अबीमलेखाला कळपातील सात कोकरे वेगळी करून त्यांच्यापुढे ठेवली.
29 अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे?”
30 त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.”
31 तेव्हा त्याने त्या जागेला बैर-शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले.
32 त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले.
33 अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली.
34 अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस परदेशी म्हणून राहिला.