27
याकोब इसहाकाचा आशीर्वाद मिळवतो
जेव्हा इसहाक म्हातारा झाला आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास दिसेनासे झाले तेव्हा त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, “माझ्या मुला.” तो म्हणाला, “काय बाबा?” तो म्हणाला, “हे पाहा, मी म्हातारा झालो आहे, माझ्या मरणाचा दिवस मला माहीत नाही. म्हणून तुझी हत्यारे, बाणांचा भाता व धनुष्य घे, आणि बाहेर रानात जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये. मला आवडणारे रुचकर जेवण तयार करून माझ्याकडे आण, म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन.” जेव्हा इसहाक त्याच्या मुलाशी बोलत होता तेव्हा रिबका ऐकत होती. एसाव रानात शिकार करून घेऊन येण्यासाठी गेला. रिबका आपला मुलगा याकोब याला म्हणाली, “हे पाहा, तुझ्या बापाला तुझा भाऊ एसावाशी बोलताना मी ऐकले. तो म्हणाला, ‘माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करून माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि माझ्या मरण्यापूर्वी परमेश्वराच्या उपस्थितीत तुला आशीर्वाद देईन.’ तर आता माझ्या मुला, मी तुला आज्ञा देते त्याप्रमाणे माझा शब्द पाळ. आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगली करडे घेऊन मला आणून दे. मी त्यांचे तुझ्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार करते, 10 मग ते जेवण तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे मग ते खाऊन तुझा बाप मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल.” 11 परंतु याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “माझा भाऊ एसाव केसाळ मनुष्य आहे; मी गुळगुळीत मनुष्य आहे. 12 कदाचित माझा बाप मला स्पर्श करेल आणि मी फसवणारा असा होईल. मी आपणावर शाप ओढवून घेईन, आशीर्वाद आणणार नाही.” 13 त्याची आई त्यास म्हणाली, “माझ्या मुला, तुझ्यावरचा शाप माझ्यावर येवो. केवळ माझा शब्द पाळ आणि जा, माझ्याकडे ते घेऊन ये.” 14 मग याकोब गेला आणि ती करडे आईकडे घेऊन आला. त्याच्या आईने त्यांचे त्याच्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार केले. 15 रिबकाने आपला वडील मुलगा एसावाचे चांगले कपडे घरात तिच्याजवळ होते ते घेऊन आपला धाकटा मुलगा याकोबाच्या अंगात घातले. 16 तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व त्याच्या मानेवरच्या गुळगुळीत भागावर लावले. 17 तिने स्वतः इसहाकासाठी तयार केलेले रुचकर जेवण आणि भाकर आणून याकोबाच्या हातात दिले. 18 ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि म्हणाला, “माझ्या बापा” तो म्हणाला, “मी येथे आहे, माझ्या मुला तू कोण आहेस?” 19 याकोब आपल्या बापाला म्हणाला, “मी तुमचा वडील मुलगा एसाव आहे; तुम्ही मला सांगतिले तसे मी केले आहे. तेव्हा आता उठून बसा व तुमच्यासाठी शिकार करून आणलेले मांस खा म्हणजे मग तुम्ही मला आशीर्वाद द्याल.” 20 इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला एवढ्या लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?” याकोब म्हणाला, “कारण तुमचा देव परमेश्वराने मला मिळवून दिली.” 21 इसहाक याकोबाला म्हणाला, “माझ्या मुला, माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुला स्पर्श करतो आणि मग तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस की नाही हे मला समजेल.” 22 तेव्हा याकोब आपल्या बापाजवळ गेला. इसहाकाने त्यास स्पर्श केला आणि म्हणाला, “तुझा आवाज तर याकोबाच्या आवाजासारखा आहे. परंतु तुझे हात मात्र एसावाच्या हातासारखे केसाळ आहेत.” 23 इसहाकाने त्यास ओळखले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हातासारखे केसाळ होते, म्हणून त्याने त्यास आशीर्वाद दिला. 24 तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?” आणि तो म्हणाला, “मी आहे.” 25 इसहाक म्हणाला, “तू जेवण माझ्याकडे आण, आणि मी तू आणलेले हरणाचे ते मांस खाईन, मग तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबाने आपल्या बापाला जेवण दिले. इसहाकाने ते खाल्ले आणि याकोबाने त्याच्यासाठी द्राक्षरसही दिला आणि तो प्याला. 26 मग इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला चुंबन दे.” 27 मग याकोब आपल्या बापाजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. आणि त्याने त्याच्या कपड्यांचा वास घेतला; त्याने त्यास आशीर्वाद दिला. तो म्हणाला, “पाहा ज्या शेताला परमेश्वराने आशीर्वाद दिला त्याचा वास जसा येतो तसा माझ्या मुलाचा वास आहे. 28 देव तुला आकाशातले दव व भूमीची समृद्धी व भरपूर धान्य व द्राक्षरस देईल. 29 लोक तुझी सेवा करोत व राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील. तुझ्या आईची मुले तुला नमन करतील. तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल आणि तुला आशीर्वाद देणारा प्रत्येकजण आशीर्वादित होईल.” 30 इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले आणि त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोच एसाव शिकारीहून आला. 31 त्यानेही आपल्या वडिलाच्या आवडीचे रुचकर भोजन तयार करून आपल्या बापाजवळ आणले, तो त्याच्या बापाला म्हणाला, “माझ्या वडिलाने उठावे आणि तुमच्या मुलाने शिकार करून आणलेले मांस खावे जेणेकरून मला आशीर्वाद द्यावा.” 32 इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.” 33 मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्या अगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्यास आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.” 34 जेव्हा एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले, तो खूप मोठ्याने ओरडून आणि दुःखाने रडून म्हणाला “माझ्या पित्या; मलाही आशीर्वाद द्या.” 35 इसहाक म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येथे आला आणि तो तुझे आशीर्वाद घेऊन गेला.” 36 एसाव म्हणाला, “त्याचे याकोब *हे नाव त्यास योग्यच आहे की नाही? त्याने माझी दोनदा फसवणूक केली आहे. त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” आणि एसाव म्हणाला, “माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?” 37 इसहाकाने एसावास उत्तर दिले आणि म्हणाला “पाहा, मी त्यास तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे सर्व बंधू त्याचे सेवक होतील. आणि त्यास मी धान्य व नवा द्राक्षरस दिला आहे. माझ्या मुला, मी तुझ्यासाठी काय करू.” 38 एसाव आपल्या बापाला म्हणाला, “माझ्या बापा, माझ्यासाठी तुमच्याकडे एकही आशीर्वाद नाही काय? माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.” एसाव मोठ्याने रडला! 39 मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल. 40 तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”
इसहाक याकोबाला हारान येथे पाठवून देतो
41 त्यानंतर आपल्या वडिलाने त्यास जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव त्याच्या मनात म्हणाला, “माझ्या पित्याकरिता शोक करण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला ठार मारीन.” 42 रिबकाला तिच्या वडील मुलाचे शब्द कोणी सांगितले. म्हणून तिने आपला धाकटा मुलगा याकोब याला निरोप पाठवून बोलावले आणि मग ती त्यास म्हणाली, “पाहा, तुझा भाऊ एसाव तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे व स्वतःचे समाधान करून घेत आहे. 43 म्हणून आता माझ्या मुला, माझी आज्ञा पाळ आणि, हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे तू पळून जा. 44 तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडे दिवस त्याजकडे राहा. 45 तुझ्यावरून तुझ्या भावाचा राग निघून जाईल, आणि तू त्यास काय केले हे तो विसरेल. मग मी तुला तेथून बोलावून घेईन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का अंतरावे?” 46 मग रिबका इसहाकाला म्हणाली, “हेथीच्या मुलींमुळे मला जीव नकोसा झाला आहे. याकोबाने जर या देशाच्या मुली करून हेथाच्या लोकांतून पत्नी केली तर माझ्या जगण्याचा काय उपयोग?”
* 27:36 अर्थ-पाय पकडणारा किंवा धोका देणारा