3
मानवाचे पतन
रोम. 5:12-21
परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “ ‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?” स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो. परंतु बागेच्या मधोमध जे झाड आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल.”
सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही. कारण देवास हे माहीत आहे की, जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, व तुम्ही देवांसारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले.
तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने एकत्र जोडून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली. दिवसाचा थंड वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत आला. त्या वेळी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आणि परमेश्वर देवाच्या समक्षतेपासून दृष्टीआड व्हावे म्हणून मनुष्य व त्याची पत्नी बागेच्या झाडांमध्ये लपली.
तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?” 10 मनुष्य म्हणाला, “बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.” 11 परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
12 मनुष्य म्हणाला, “तू ही स्त्री माझ्या सोबतीस म्हणून दिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.” 13 मग परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, “तू हे काय केलेस?” ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला फसवले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”
14 परमेश्वर देव सर्पास म्हणाला, “तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशूंमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील. 15 तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये *व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रूत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.”
16 परमेश्वर देव स्त्रीस म्हणाला, “मुलांना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
17 नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, तू तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्ले आहेस. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू तिजपासून अन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील; 18 जमीन तुझ्यासाठी काटे व कुसळे उत्पन्न करील आणि शेतातील वनस्पती तुला खाव्या लागतील. 19 तू माघारी जमिनीमध्ये जाशील तोपर्यंत तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर खाशील, तू मरणाच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. कारण मातीमधून तू निर्माण झालेला आहेस; आणि मातीमध्ये तू परत जाशील.
20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण सर्व जिवंत मनुष्यांची ती आई होती. 21 परमेश्वर देवाने आदाम व त्याच्या पत्नीसाठी चामड्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली.
22 परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवंत राहील.” 23 तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले. 24 देवाने मनुष्यास बागेतून घालवले, आणि जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी त्याने एदेन बागेच्या पूर्वेकडे करुब ठेवले, आणि सर्व दिशांनी गरगर फिरणारी ज्वालारूप एक तलवार ठेवली.
* 3:15 संतानामध्ये 3:15 संतानामध्ये 3:20 अर्थ-जीवन