32
याकोब एसावाला भेटण्याची तयारी करतो
1 याकोबही आपल्या मार्गाने गेला आणि त्यास देवाचे दूत भेटले.
2 जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “ही देवाची छावणी आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव महनाईम ठेवले.
3 याकोबाने आपला भाऊ एसाव याच्याकडे सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपले निरोपे पाठवले.
4 त्याने त्यांना आज्ञा देऊन म्हटले, “तुम्ही माझे धनी एसाव यांना सांगा, आपला सेवक याकोब असे म्हणतो की, ‘आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो.
5 माझ्यापाशी पुष्कळ गाई-गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप आणि दास व दासी आहेत. आपली कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून मी आपल्या धन्याला हा निरोप पाठवीत आहे.’ ”
6 निरोपे याकोबाकडे परत आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याच्याकडे गेलो व त्यास भेटलो. तो आपणाला भेटावयास येत आहे. त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.”
7 तेव्हा याकोब घाबरला आणि अस्वस्थ झाला. त्याने आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या दोन टोळ्या केल्या, तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट व गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या.
8 तो म्हणाला, “जर एसावाने एका टोळीवर हल्ला करून मार दिला तर दुसरी टोळी निसटून जाईल व वाचेल.”
9 याकोब म्हणाला, “माझा बाप अब्राहाम याच्या देवा, आणि माझा बाप इसहाक याच्या देवा, परमेश्वर देवा, तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस. तसेच तू माझी भरभराट केलीस,
10 तू माझ्यावर करुणा व सर्व सत्य विश्वसनीयता दाखवून, करार पाळून, आपल्या दासासाठी जे काही केले आहेस, त्यास मी पात्र नाही. आणि मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय काहीही नव्हते. परंतु आता माझ्या दोन टोळ्या आहेत.
11 कृपा करून तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव. तो येऊन मला, व मायलेकरांना मारून टाकील, अशी मला भीती वाटते.
12 परंतु तू मला म्हणालास की, ‘मी नक्कीच तुझी भरभराट करीन. मी तुझी संतती वाढवीन आणि जिची गणना करता येणार नाही, अशी समुद्राच्या वाळूइतकी ती करीन.’ ”
13 त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने आपल्याजवळ जे होते त्यातून, आपला भाऊ एसावाला देण्यासाठी भेट तयार केली.
14 त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके,
15 तसेच तीस दुभत्या सांडणी व त्यांची शिंगरे, चाळीस गाई व दहा बैल, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली.
16 त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला. मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.”
17 याकोबाने कळपाच्या पहिल्या टोळीच्या चाकराला आज्ञा देऊन तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’
18 तेव्हा तू त्यास असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. त्याने ही माझा धनी एसाव याला भेट म्हणून पाठवली आहेत. आणि पाहा, तो आमच्या पाठोपाठ येत आहे.’ ”
19 याकोबाने दुसऱ्या, तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करून अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हास जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच म्हणावे.”
20 तुम्ही असेही म्हणावे की, “आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.” त्याने विचार केला, “जर मी ही माणसे भेटीसह पुढे पाठवली तर कदाचित एसावाचा राग शांत होईल. त्यानंतर जेव्हा मी त्यास भेटेन, तेव्हा कदाचित तो माझा स्विकार करील.”
21 म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली. तो स्वतः त्या रात्री तळावर मागेच राहिला.
पनीएल येखे याकोबाने केलेले झुंज
22 मग याकोब रात्री उठला. त्याने आपल्या दोन्ही स्त्रिया, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांना बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी गेला.
23 अशा रीतीने त्याने आपले जे सर्वकाही होते त्यांसह सर्वांना नदी पार करून पाठवले.
24 याकोब एकटाच मागे राहिला होता, आणि एक पुरुष आला व त्याने याकोबाशी सूर्य उगवेपर्यंत कुस्ती केली.
25 जेव्हा त्या मनुष्याने पाहिले की, आपण याकोबाचा पराभव करू शकत नाही, तेव्हा त्याने त्याच्या जांघेला स्पर्श केला. तेव्हा त्याच्याशी कुस्ती करीत असता याकोबाच्या जांघेचा सांधा निखळला.
26 मग तो पुरुष याकोबाला म्हणाला, “आता मला जाऊ दे.” परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.”
27 तो पुरुष त्यास म्हणाला, “तुझे नाव काय आहे?” आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.”
28 तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्राएल असेल. कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून विजय मिळवला आहेस.”
29 मग याकोबाने त्यास विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.” परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्या वेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला.
30 म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “या ठिकाणी मी देवाला समक्ष पाहिले आहे, तरी माझा जीव वाचला आहे.”
31 मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता.
32 म्हणून आजपर्यंत इस्राएल लोक जनावरांच्या जांघेच्या सांध्याजवळचा स्नायू खात नाहीत कारण याच स्नायूपाशी याकोबाला दुखापत झाली होती.