34
दीनाच्या भ्रष्टतेबद्दल घेतलेला सूड
याकोबापासून लेआस झालेली मुलगी दीना ही त्या देशातील मुलींना भेटण्यास बाहेर गेली. तेव्हा त्या देशाचा राजा हमोर हिव्वी याचा मुलगा शखेम याने तिला पाहिले तो तिला घेऊन गेला, आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले. याकोबाची मुलगी दीना हिच्याकडे तो आकर्षित झाला. त्या मुलीवर त्याचे प्रेम जडले आणि तो प्रेमळपणे तिच्याशी बोलला. शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, “ही मुलगी मला पत्नी करून द्या.” आपली मुलगी दीना हिला त्याने भ्रष्ट केले हे याकोबाने ऐकले. परंतु त्याची सर्व मुले गुराढोरांबरोबर रानात होती म्हणून ते घरी येईपर्यंत याकोब शांतच राहिला. शखेमाचा बाप हमोर बोलणी करण्यासाठी याकोबाकडे गेला. जे काही घडले ते याकोबाच्या मुलांनी रानात ऐकले आणि ते परत आले. ती माणसे दुखावली गेली होती. त्यांचा राग भडकला होता, कारण याकोबाच्या मुलीवर शखेमाने बळजबरी करून इस्राएलाला काळिमा लावला, जे करू नये ते त्याने केले होते. हमोर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम तुमच्या मुलीवर प्रेम करतो. मी तुम्हास विनंती करतो की ती त्यास पत्नी म्हणून द्या. आमच्या बरोबर सोयरीक करा, तुमच्या मुली आम्हांला द्या, आणि आमच्या मुली तुमच्यासाठी घ्या. 10 तुम्ही आमच्या बरोबर राहा, आणि हा देश राहण्यास व व्यापार करण्यास तुमच्यापुढे मोकळा असेल, आणि त्यामध्ये मालमत्ता घ्या.” 11 शखेम तिच्या बापाला व तिच्या भावांना म्हणाला, “माझ्यावर तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून तुम्ही जे काही मागाल ते मी जरुर देईन. 12 माझ्याकडे वधूबद्दल मोठी किंमत मागा, जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हास देईन, परंतु ही मुलगी मला पत्नी म्हणून द्या.” 13 त्यांची बहीण दीना हिला शखेमाने भ्रष्ट केले होते, म्हणून याकोबाच्या मुलांनी शखेम व त्याचा बाप हमोर यांना कपटाने उत्तर दिले. 14 ते त्यास म्हणाले, “ज्याची अद्याप सुंता झालेली नाही अशा मनुष्यास आम्ही आमची बहीण देऊ शकत नाही; त्यामुळे आम्हांला कलंक लागेल. 15 पण फक्त या एकाच अटीवर आम्ही तुझ्याशी सहमत होऊ: तुम्हा सर्वांची आमच्याप्रमाणे सुंता झाली पाहिजे, जर तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता झाली तरच 16 आम्ही आमच्या मुली तुम्हास देऊ व तुमच्या मुली आम्ही करू आणि आम्ही तुम्हामध्ये राहू आणि आपण सर्व एक लोक होऊ. 17 पण जर तुम्ही आमचे ऐकणार नाही आणि सुंता करावयास नकार द्याल तर मग मात्र आमच्या बहिणीला घेऊ आणि निघून जाऊ.” 18 त्यांच्या शब्दाने हमोर व शखेम यांना फार आनंद झाला. 19 त्यांनी जे सांगितले होते ते करण्यास त्या तरुणाने उशीर केला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते, आणि तो त्यांच्या वडिलाच्या घराण्यात सर्वांत आदरणीय होता. 20 हमोर व शखेम त्या नगराच्या वेशीपाशी गेले व नगरातील लोकांशी बोलले, ते म्हणाले, 21 “ही माणसे आपल्याशी शांतीने वागतात, म्हणून त्यांना आपणामध्ये आपल्या देशात राहू द्यावे आणि त्यामध्ये व्यापार करू द्यावा. खरोखरच, त्यांना पुरेल एवढा आपला देश मोठा आहे. त्यांच्या मुली आपण स्त्रिया करून घेऊ, आणि आपण आपल्या मुली त्यांना देऊ. 22 फक्त एकाच अटीवर ते लोक आपल्यासोबत राहायला आणि आपल्यासोबत एक व्हायला तयार आहेत: ती म्हणजे आपण सगळ्या पुरुषांनी त्या लोकांप्रमाणे सुंता करून घेण्याचे मान्य केले पाहिजे. 23 जर हे आपण करू तर मग त्यांची सर्व शेरडेमेंढरे गुरेढोरे व संपत्ती आपलीच होणार नाहीत काय? म्हणून आपण त्यांच्याशी सहमत होऊ, आणि मग ते आपल्या बरोबर येथेच वस्ती करून राहतील.” 24 तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले. त्या वेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करून घेतली. 25 तीन दिवसानंतर, सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी म्हणजे दीनाचे भाऊ यांनी आपआपली तलवार घेतली व ते नगर बेसावध असता त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले. 26 त्यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले. 27 नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीजवस्तू लुटल्या, कारण त्यांनी त्यांच्या बहिणीला भ्रष्ट केले होते. 28 तेव्हा त्यांनी त्या लोकांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे, गाढवे इत्यादी सर्व जनावरे आणि घरातील व शेतांतील सर्व वस्तू लुटल्या. 29 तसेच त्यांनी तेथील लोकांच्या मालकीची धनदौलत, मालमत्ता व सर्व चीजवस्तू आणि त्यांच्या स्त्रिया व मुलेबाळे देखील घेतली. 30 परंतु याकोब, शिमोन व लेवी यांना म्हणाला, “तुम्ही मला खूप त्रास देऊन संकटात टाकले आहे; आता या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी माझा द्वेष करतील व माझ्या विरूद्ध उठतील. आपण थोडकेच लोक आहोत. या देशातील सर्व लोक एकत्र होऊन आपल्या विरूद्ध जर लढावयास आले तर मग माझ्याजवळच्या आपल्या सर्वांचा माझ्याबरोबर नाश केला जाईल.” 31 परंतु शिमोन आणि लेवी म्हणाले, “शखेमाने आमच्या बहिणीशी वेश्येशी वागतात तसे वागावे काय?”