36
एसावाची वंशावळ
1 इति. 1:35-37
एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ ही, एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ. एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते. आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे पुत्र त्यास कनान देशात झाले. एसाव आपल्या स्त्रिया, आपली मुले, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला. कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली होती की त्यांना एकत्र राहता येईना. ज्या देशात ते राहत होते त्यामध्ये त्यांच्या गुरांढोरांचा निर्वाह होईना. एसाव सेईरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसावाला अदोमसुद्धा म्हणतात. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ: 10 एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल. 11 अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज. 12 अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची पत्नी आदा हिची नातवंडे होती. 13 रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती. 14 सिबोनाची मुलगी अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची पत्नी होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले. 15 एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज, 16 कोरह, गाताम व अमालेक. आपापल्या कुळांचे हे सरदार अलीपाजला अदोम देशात झाले. ही आदेची नातवंडे होती. 17 एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती. 18 एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले. 19 हे एसावाचे पुत्र होते, आणि हे त्यांचे वंश होते.
सेईराचे वंशज
1 इति. 1:38-42
20 त्या देशात सेईर नावाच्या होरी मनुष्याचे पुत्र हे: लोटान, शोबाल, सिबोन, अना, 21 दीशोन, एसर व दिशान. हे अदोम देशात सेईराचे पुत्र होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले. 22 लोटानाचे पुत्र होते होरी व हेमाम, आणि तिम्ना ही लोटानाची बहीण होती. 23 शोबालाचे पुत्र: अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम. 24 सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे* सापडले तोच हा अना. 25 अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा. 26 दीशोनाचे हे पुत्र होते: हेम्दान, एश्बान, यित्रान व करान. 27 एसराला बिल्हान, जावान व अकान हे पुत्र होते. 28 दीशानाला ऊस व अरान हे पुत्र होते. 29 होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी: लोटान, शोबाल, सिबोन, अना, 30 दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले.
अदोम देशाचे राजे
1 इति. 1:43-54
31 इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच: 32 बौराचा मुलगा बेला याने अदोमावर राज्य केले, आणि त्याच्या नगराचे नाव दिन्हाबा होते. 33 बेला मरण पावल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब ह्याने राज्य केले. 34 योबाब मरण पावल्यावर, तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने राज्य केले. 35 हुशाम मरण पावल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते. 36 हदाद मरण पावल्यावर मास्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले. 37 साम्ला मरण पावल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले. 38 शौल मरण पावल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान याने त्या देशावर राज्य केले. 39 बाल-हानान मरण पावल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती. 40 एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या सरदारांची नावे: तिम्ना, आल्वा, यतेथ, 41 अहलीबामा, एला, पीनोन, 42 कनाज, तेमान, मिब्सार, 43 माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे.
* 36:24 किंवा जंगली गाढवे