47
दुष्काळी परिस्थितीत योसेफाचा राज्याकारभार
योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनान देशातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते गोशेन प्रांतात आहेत.” त्याने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांना घेतले आणि त्यांची ओळख करून दिली. फारो राजा त्याच्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?” ते म्हणाले, “आम्ही आपले दास मेंढपाळ आहोत आणि आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.” ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात तुमच्या दासांच्या कळपांसाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा राहिलेला नाही म्हणून आम्ही या देशात तात्पुरते राहण्यास आलो आहोत. आम्ही आपणांस विनंती करतो की आम्हास गोशेन प्रांतात राहू द्यावे.” मग फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत. त्यांना राहण्याकरिता तू मिसर देशातील कोणतेही ठिकाण निवड. त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे, त्यांना गोशेन प्रांतात वस्ती करून राहू दे. आणि त्याच्यात जर कोणी हुशार मनुष्य मनुष्ये तुला माहीत असतील तर मग त्यांना माझ्या गुराढोरांवर अधिकारी कर.” मग योसेफाने याकोब त्याचा बाप याला आणले आणि फारोच्या समोर सादर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला. मग फारोने याकोबाला विचारले, “तुमचे वय किती आहे?” याकोबाने फारोस उत्तर दिले, “माझ्या कष्टमय जीवनाची वर्षे फक्त एकशे तीस वर्षे आहेत. परंतु माझ्या पूर्वजांइतके दीर्घ आयुष्य मला लाभले नाही.” 10 याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला. 11 योसेफाने फारोच्या आज्ञेप्रमाणे आपल्या बापाला व भावांना रामसेस नगरजवळील प्रांतातील उत्तम भूमी त्यांना रहावयास दिली. 12 आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या कुटुंबाप्रमाणे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या संख्येप्रमाणे भरपूर अन्नसामग्री पुरवली. 13 त्या वेळी सर्व भूमीवर दुष्काळ तर फारच कडक पडला होता; अन्नधान्य कोठेच मिळत नव्हते. त्यामुळे मिसर व कनान देशातील जमीन दुष्काळामुळे उजाड झाली. 14 योसेफाने मिसर आणि कनान देशातील रहिवाशांना अन्नधान्य विकून त्यांच्याकडील सर्व पैसा गोळा केला. त्यानंतर योसेफाने तो पैसा फारोच्या राजवाड्यात आणला. 15 काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले, त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हास अन्न द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोरच का मरावे?” 16 परंतु योसेफ म्हणाला, “जर तुमचे पैसे संपले आहेत, तर तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या आणि मग मी तुमच्या गुराढोरांच्या बदल्यात तुम्हास धान्य देईन.” 17 तेव्हा लोकांनी त्यांच्याकडील गुरेढोरे, शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले. त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले. 18 परंतु त्या वर्षानंतर, पुढील वर्षी लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “आमच्या धन्यापासून आम्ही काही लपवत नाही. आपणास माहीत आहे की, आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही धन्याची झाली आहेत. तेव्हा आमच्या धनाच्यासमोर आमची शरीरे व आमच्या जमिनी याशिवाय दुसरे काहीही उरलेले नाही. 19 तुमच्या डोळ्यांसमोर आम्ही का मरावे? आमचा व आमच्या जमिनीचाही नाश का व्हावा? परंतु जर आपण आम्हांला अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमच्या जमिनी फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ. आम्हास बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि जमिनी ओस पडणार नाहीत.”
याकोबाचे व्यवस्थापत्र
20 तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमिनी योसेफाने फारोसाठी विकत घेतल्या. मिसरी लोकांनी आपल्या शेतजमिनी फारोला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता. 21 मिसरमधील एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांस त्याने फारोचे गुलाम केले*. 22 योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता. त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही. 23 तेव्हा योसेफ लोकांस म्हणाला, “पाहा, मी फारोकरता तुम्हास तुमच्या जमिनीसह विकत घेतले आहे तर मी आता तुम्हास बियाणे देतो. ते तुम्ही शेतात पेरा. 24 परंतु हंगामाच्या वेळी तुमच्या उत्पन्नातील पाचवा हिस्सा फारोला दिलाच पाहिजे. बाकीचे चार हिस्से तुम्ही तुमच्यासाठी घ्यावेत. त्यातून पुढच्या वर्षाकरता तुम्ही बियाणे ठेवावे व बाकीच्या धान्याचा तुमच्या घरातील लहानथोरांस खाण्यासाठी उपयोग करावा.” 25 लोक म्हणाले, “आपण आम्हांला वाचवले आहे, म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हांला आनंद आहे.” 26 त्या वेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला, तो आजपर्यंत चालू आहे; त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नाचा पाचवा भाग फारोचा आहे. फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे. फक्त याजकांची जमीन फारोच्या मालकीची नाही. 27 इस्राएल मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली. त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले. 28 याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला, तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला. 29 इस्राएलाच्या मरणाचा काळ जवळ आला, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले आणि तो त्यास म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडीखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की, मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. मला मिसरामध्ये पुरू नको. 30 जेव्हा मी माझ्या वाडवडिलांसोबत झोपी जाईन, तेव्हा मला मिसरमधून बाहेर घेऊन जा आणि माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या पुरण्याच्या जागेत मला मूठमाती दे.” योसेफाने उत्तर दिले, “तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन.” 31 मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा.” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली. मग इस्राएलाने आपले डोके मागे पलंगाच्या उशावर नम्रतेने खाली वाकून नमन केले.
* 47:21 किंवा फारोने त्यांस वास्तव्य करावयास लावले