29
अरीएल व त्याचे शत्रू
1 अरीएल, अरीएल, म्हणजे ते शहर ज्यात दाविदाने तळ दिला, तिला हायहाय!
वर्षाला वर्ष जोडा, सण फिरून येवोत.
2 पण मी अरीएलला शिक्षा करीन आणि त्यामुळे ती दु:ख व शोक करील,
आणि ती मला अरीएलासारखी होईल.
3 मी तुझ्यासभोवती तळ घालून तुला वेढीन,
आणि मी तुझ्याभोवती मजबूत कुंपण घालीन आणि तुझ्याविरूद्ध वेढा उभारीन.
4 तू नीच केली जाशील आणि भूमीवरून बोलशील. तुझा आवाज धुळीतून कमी निघतील,
तुझा आवाज भूमीतून बाहेर निघणाऱ्या भूतासारखा असेल, आणि तुझा शब्द धुळीतून आल्याप्रमाणे येईल.
5 तुझ्या शत्रूंचा समुदाय धुळीच्या कणांसारखा आणि निर्दयांचा समुदाय उडत्या भुसासारखा होईल
आणि हे एका क्षणांत एकाएकी घडणार.
6 सेनाधीश परमेश्वराकडून, भूकंप, मोठीगर्जना व मोठे वादळ, वावटळ आणि खाऊन टाकणारी अग्नी, यांनी तुला शासन करण्यात येईल.
7 ते सर्व रात्रीच्या आभासासारखे असेल,
अनेक राष्ट्रातील समुदाय अरीएलविरूद्ध लढतील,
ते तिच्यावर आणि तिच्या दुर्गावर हल्ला करतील.
8 हे असे असणार की एक भुकेला मनुष्य आपण खात आहे असे स्वप्न पाहतो, पण जेव्हा तो जागा होतो तर त्याचे पोट रिकामेच असते.
हे असे असणार की तान्हेला स्वप्न पाहतो की तो पीत आहे, पण तो जागा होतो आणि पाहा तो मूर्छित आहे व त्याचा जीव त्रासलेला आहे,
होय, जे राष्ट्र समुदाय सियोन पर्वताविरूद्ध लढतात त्यांची अशीच स्थिती होईल.
इस्राएलाची दांभिकता व अंधत्व
9 तुम्ही विस्मित व आश्चर्यचकित व्हा, तुम्ही आपणास आंधळे करा आणि आंधळे व्हा.
ते धुंद आहेत पण द्राक्षरसाने नव्हे. ते झूलत आहेत पण मद्याने नव्हे.
10 कारण परमेश्वराने तुम्हावर गाढ झोपेचा आत्मा ओतला आहे.
त्याने तुमचे डोळे बंद केले आहेत, जे भविष्यवादी आहेत आणि परमेश्वर तुमची डोकी झाकले, जे तुम्ही दृष्टांत पाहता.
11 तुम्हास सर्व दर्शन शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाच्या शब्दाप्रमाणे झाले आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्यास वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे.”
12 किंवा तुम्ही असे पुस्तक वाचता न येणाऱ्याला देऊन त्यास ते वाचायला सांगू शकता. तो म्हणेल, “मला वाचता येत नसल्याने मी हे पुस्तक वाचू शकत नाही.”
13 माझा प्रभू म्हणतो, हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात.
पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर,
म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व मनुष्यांनी घालून दिलेले नियम आहेत.
14 म्हणून मी शक्तीशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांस विस्मित करीत राहीन. आश्चर्या मागून आश्चर्य,
त्यांच्यातील सुज्ञ मनुष्याचे ज्ञान नष्ट होईल, आणि त्यांच्यातील शहाण्या मनुष्याचा समजदारपणा नाहीसा होईल.
15 जे परमेश्वरापासून आपल्या योजना खोल लपवतात,
आणि ज्यांची कृत्ये अंधारात आहेत, व जे असे म्हणतात, “आम्हांला कोण पाहते? आणि ओळखते? त्यांना हायहाय!”
16 तुम्ही गोष्टींची उलटफेर करता! कुंभार मातीप्रमाणे आहे असे मानतील काय? एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला बोलेल काय? “तू मला घडवले नाहीस, आणि त्यास काही समजत नाही” असे घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याविषयी बोलेल काय?
17 काही काळाच्या आत
लबानोन सुपीक भूमीमध्ये बदलण्यात येईल आणि सुपीक भूमी घनदाट जंगल होईल.
18 त्या दिवशी बहिरा पुस्तकातील शब्द ऐकू शकेल
आणि आंधळ्याचे डोळे गडद अंधारातून पाहतील.
19 पीडलेले पुन्हा परमेश्वराच्या ठायी आनंद करत राहतील
आणि मनुष्यातले गरीब इस्राएलाच्या पवित्राबद्दल हर्ष करतील.
20 कारण निर्दयींचा अंत होईल आणि उपहास करणारा नाश होईल. दुष्कृत्ये करण्यात आनंद मानणारे सर्व काढले जातील.
21 जे मनुष्यांना शब्दाने खोटे पाडतात. ते त्याच्यासाठी पाश मांडतात
जे वेशीत न्याय शोधतात आणि नीतिमानास खोटेपणानी दाबून टाकतात.
22 परमेश्वर, ज्याने अब्राहामाला खंडून घेतले, परमेश्वर याकोबाच्या घराण्याविषयी असे बोलतो.
“याकोब यापूढे लज्जीत होणार नाही व त्याचे तोंड आता फिक्के पडणार नाही.
23 पण जेव्हा तो त्याची सर्व मुले पाहील, जे माझ्या हातचे कार्य असेल, ते माझे नाव पवित्र मानतील.
ते याकोबाचा पवित्र प्रभूला पवित्र मानतील; इस्राएलाच्या देवाचा आदर करतील.
24 जे भ्रांत आत्म्याचे ते बुद्धी पावतील आणि जे तक्रार करतात ते विद्या प्राप्त करतील.”