37
सन्हेरीबाच्या हातून यहूदाची सुटका
2 राजे 19:1-7
1 मग असे झाले की, जेव्हा हिज्कीया राजाने त्यांचा निरोप ऐकून, त्याने आपले कपडे फाडले, स्वतःला गोणपाटाने झाकून आणि परमेश्वराच्या मंदिरात गेला.
2 त्याने एल्याकीम जो घरावर कारभारी होता, आणि शेबना चिटणीस आणि याजकातील वडील यांना गोणपाट घातलेले असे आमोजाचा मुलगा यशया संदेष्ट्याकडे पाठवले, त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले.
3 ते त्यास म्हणाले, हिज्कीया असे म्हणतो, हा दिवस यातनेचा, धिक्काराचा व अपमानाचा दिवस आहे, कारण जसे बालक जन्मायला तयार आहे, पण आईला तिच्या बालकाला जन्म देण्यास शक्ती नाही.
4 परमेश्वर तुझा देव रब-शाकेचे शब्द ऐकेल, त्याचा धनी अश्शूरचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे, आणि जे शब्द तुझा देव परमेश्वर याने ऐकली आहेत त्यांचा तो कदाचित निषेध करील, म्हणून जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी आपली प्रार्थना उंच कर.
5 तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे आले.
6 आणि यशया त्यांना म्हणाला, तुझ्या धन्याला सांग; परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा अपमान केला आहे, ते शब्द तू ऐकले आहेस, त्याने तू घाबरून जाऊ नको.
7 पाहा, मी एक आत्मा त्याच्यात घालीन आणि तो काही बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल, तो आपल्याच देशात तलवारीने पडेल, असे मी करीन.
8 मग रब-शाके माघारी आला आणि त्यास अश्शूराचा राजा लिब्नाविरूद्ध लढाई करताना सापडला, कारण त्याने राजा लाखीशाहून गेला आहे, हे त्याने ऐकले.
9 मग सन्हेरीबाने ऐकले की, कूशाचा व मिसराचा राजा तिऱ्हाका आपणाशी लढावयास गेला आहे, असे बोलताना कोणी ऐकले, ते ऐकून त्याने हिज्कीयाकडे पुन्हा निरोप घेऊन जासूद पाठवले की,
10 यहूदाचा राजा हिज्कीया, याला सांगा, तू ज्या देवावर भरवसा ठेवतोस तो यरूशलेम अश्शूराच्या राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे म्हणून तुला न फसवो.
11 पाहा, तू ऐकले आहेस अश्शूराच्या राजांने त्यांच्या सर्व देशांचा पूर्णपणे कसा नाश केला आहे, तर तू सुटशील काय?
12 गोजान, हारान, रेसफ व तलस्सारातले एदेनाचे लोक या ज्या राष्ट्रांचा माझ्या वाडवडीलांनी नाश केला त्यांच्या देवांनी त्यांना वाचवले का?
13 हमाथाचा राजा आणि अर्पदचा राजा सफरवाईम नगराचा राजा, हेनाचा व इव्वाचा राजा हे कोठे आहेत?
14 हिज्कीयाने जासूदाकडून हे पत्र स्विकारुन त्याने ते वाचले, नंतर तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने ते परमेश्वरापुढे पसरले.
15 हिज्कीयाने परमेश्वराकडे प्रार्थना केली
16 हे सैन्यांच्या परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, जो तू करुबावर बसतो, तो तूच मात्र सर्व राज्यांचा देव आहेस, तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस.
17 हे परमेश्वरा, कान लाव व ऐक! हे परमेश्वरा तुझे डोळे उघड आणि पाहा, आणि सन्हेरीबाचे शब्द ऐक, जी त्याने जिवंत देवाची निंदा करण्यासाठी पाठवली आहेत.
18 हे सत्य आहे, परमेश्वरा, अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्राचा व त्यांच्या भूमीचा नाश केला आहे.
19 त्यांनी त्यांचे देव अग्नीत टाकले, कारण ते देव नव्हते परंतु मनुष्यांच्या हाताचे काम होते, फक्त लाकूड व दगड होते, म्हणून अश्शूऱ्यांनी त्यांना नष्ट केले.
20 तर आता, हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास त्यांच्या हातातून सोडीव, म्हणजे तूच मात्र परमेश्वर आहेस हे पृथ्वीतल्या सर्व राजांनी जाणावे.
21 नंतर आमोजाचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवून म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ‘कारण अश्शूराचा राजा सन्हेरीब याच्याबद्दल तू माझी प्रार्थना केली.
22 त्याच्याबद्दल परमेश्वर हे शब्द बोलला आहे.
सियोनेची कुमारी तुला तुच्छ मानून तिरस्काराने तुला हसते, यरूशलेमेची कन्या, तुला डोके हलवून दाखवते.
23 तू कोणाची निंदा आणि अपमान केलास? आणि कोणाविरूद्ध आवाज उंच केलास
आणि आपले डोळे गर्वाने उंचावले? इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या विरुध्द.
24 तू आपल्या सेवकांकडून प्रभूची अवज्ञा करून म्हटले, मी आपल्या पुष्कळशा रथाबरोबर
मी पर्वताच्या उंचावर, लबानोनाच्या अगदी आतल्या भागावर चढून आलो आहे,
त्याचे उंच गंधसरू, व त्याचे निवडक देवदारू मी तोडीन
आणि मी त्याच्या अगदी दूरच्या उंचीवर त्याच्या फळझाडांच्या जंगलात प्रवेश करीत आलो
25 मी विहिरी खणल्या व विदेशी पाणी प्यालो;
मी आपल्या पायाच्या तळव्यांनी मिसरच्या सर्व नद्या सुकवून टाकीन.
26 मी हे मागच्या काळात कसे केले
आणि प्राचीन दिवसात हे कसे योजिल्याप्रमाणे केले, हे तू ऐकले नाही काय? आता हे मी घडवून आणले आहे.
तू अजिंक्य नगरे घटवून त्यांचे नासाडीचे ढीग करण्यास येथे आहे.
27 त्यामध्ये राहणारे, अल्प शक्तीचे होते, ते मोडून गेले व फजीत झाले.
ते शेतात लावलेल्या रोपासारखे, हिरवे गवत, छतावरचे किंवा शेतातले गवत,
वाढ होण्यापूर्वी पूर्वेच्या वाऱ्यापुढे करपले आहे.
28 पण तुझे बसणे, बाहेर जाणे, आत येणे आणि माझ्याविरूद्धचा तुझा क्रोध मला ठाऊक आहे.
29 कारण माझ्याविरूद्धच्या तुझ्या क्रोधामुळे आणि व तुझा उद्धटपणा माझ्या कानी पोहचला आहे,
मी आपले वेसण तुझ्या नाकात व आपला लगाम तुझ्या तोंडात घालीन;
तू ज्या मार्गाने आलास त्यानेच मी तुला मागे फिरवीन.
30 तुझ्यासाठी हे चिन्ह होईलः
या वर्षी तुम्ही जे काही आपोआप उगवेल ते खाल आणि दुसऱ्या वर्षी जे त्यातून उगवेल ते खाल,
परंतु तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरणी करा व कापा, द्राक्षमळे लावा आणि त्याचे फळ खा.
31 यहूदाच्या घराण्यातील वाचलेले अवशिष्ट पुन्हा मूळ धरतील आणि फळ धारण करतील.
32 कारण यरूशलेमेमधून अवशेष बाहेर येतील; सियोनाच्या डोंगरावरून वाचलेले येतील,
सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे करील.
33 म्हणून अश्शूरच्या राजाविषयी परमेश्वर हे म्हणतोः
तो या नगरात येणार नाही, किंवा येथे एकही बाण मारणार नाही, तो या समोर ढालीसह येणार नाही किंवा याविरूद्ध वेढा रचून थैमान घालणार नाही.
34 तो ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने निघून जाईल; तो या नगरात प्रवेश करणार नाही, ही परमेश्वराची घोषणा आहे.
35 कारण मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी या नगराचे रक्षण करीन.
36 मग परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूराच्या तळावरील एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिकांना ठार मारले, जेव्हा पहाटेस माणसे उठली, तेव्हा सर्वत्र प्रेते पडलेली होती.
37 मग अश्शूरचा राजा सन्हेरीबाने इस्राएल सोडले व घरी गेला व आणि निनवेत जाऊन राहिला.
38 तेव्हा असे झाले की, तो आपला देव निस्रोख याच्या घरात पूजा करीत असताना, त्याची मुले अद्रम्मेलेक व शरेसर यांनी त्यास तलवारीने ठार मारले, मग ते अरारात देशात पळून गेले, नंतर त्याचा मुलगा एसरहद्दोन त्याच्या जागी राज्य करू लागला.