10
तोला व याईर हे इस्त्राएल लोकांचे शास्ते
1 अबीमलेखाच्या मृत्यूनंतर इस्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला मनुष्य तो उभा झाला, आणि तो एफ्राइम डोंगराळ प्रदेशात शामीर शहरात राहत होता.
2 त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीर नगरात पुरला गेला.
3 नंतर त्याच्या मृत्यूनंतर गिलादी याईर उभा राहिला, आणि त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
4 त्यास तीस पुत्र होते; प्रत्येकाचे आपापले गाढव होते ज्यावर ते सवार होत होते; आणि त्यास तीस नगरेही होती; आजपर्यंत त्यास हावोथ याईर म्हणतात; ती गिलादाच्या प्रांतात आहेत.
5 मग याईर मरण पावल्यावर त्यास कामोन शहरात पुरले.
अम्मोन्यांच्या हातून इस्त्राएल लोकांचा छळ
6 यानंतर इस्राएलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले; कारण की त्यांनी बआल, अष्टारोथ, अरामाचे देव, सीदोनातले देव, मवाबातले देव व अम्मोनी लोकांचे देव व पलिष्ट्यांचे देव, यांची उपासना केली; त्यांनी परमेश्वरास सोडले, आणि त्यानंतर त्याची उपासना केलीच नाही.
7 यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले.
8 त्या वर्षी, त्यानंतर अठरा वर्षे त्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस छळले आणि यार्देनेच्या पलीकडे अमोऱ्यांच्या देशातल्या गिलादात जे इस्राएली होते त्या सर्वांना जाचले.
9 यहूदा व बन्यामीन व एफ्राइमाची घराणे यांच्याशीही लढावयास अम्मोनी लोक यार्देन पार करून अलीकडे आले, त्यामुळे इस्राएलावर फार मोठे दु:ख आले.
10 तेव्हा इस्राएली लोकांनी परमेश्वरास मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, “आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बआलाच्या मूर्तींची उपासना केली.”
11 तेव्हा परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस म्हटले. “मिसऱ्यांपासून व अमोऱ्यांपासून व अम्मोन्यांच्या लोकांपासून व पलिष्ट्यांपासून मी तुम्हाला सोडवले नाही काय?
12 आणि सीदोनी व अमालेकी व मावोनी यानी तुम्हाला जाचले, तेव्हा तुम्ही मला मोठ्याने हाक मारली, आणि मी तुम्हाला त्यांच्या हातातून सोडवले.
13 तरी तुम्ही मला सोडून दुसऱ्या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही.
14 जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यास हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हाला सोडवावे.”
15 तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वरास म्हटले, “आम्ही पाप केले आहे; जे सर्व तुला चांगले वाटेल, त्याप्रमाणे तू आम्हांला कर; आम्ही तुला विनंती करतो केवळ त्या दिवशी तू आम्हांला सोडव.”
16 तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्राएलाच्या दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला.
17 अम्मोनी लोक तर एकत्र मिळून त्यांनी गिलादात तळ दिला, आणि इस्राएलाच्या लोकांनी एकत्र जमून मिस्पात तळ दिला.
18 तेव्हा गिलादातले लोक व अधिकारी एकमेकांना म्हणाले, “जो मनुष्य अम्मोनी लोकांशी लढू लागेल असा मनुष्य कोण आहे? तो गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांचा अधिकारी असा होईल.”