12
यिर्मयाची तक्रार व देवाचे उत्तर
1 परमेश्वरा, मी तुझ्याकडे वादविवाद घेऊन येतो, तू नितीमान ठरतोस,
मी निश्चितपणे माझ्या तक्रारीचे कारण तुला सांगितले पाहिजे. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? सर्व जे अविश्वासू लोक ते यशस्वी आहेत.
2 तू त्यांना लावले आणि ते मुळावले. ते वाढतात आणि फळे देतात.
तू त्यांच्या मुखात त्यांच्या जवळ आहे, पण त्यांच्या मनापासून तू फार दूर आहेस.
3 पण, परमेश्वरा, तू मला जाणतोस. तू मला पाहतोस आणि माझ्या मनाला पारखतोस.
कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण. कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना तयार कर.
4 किती काळ राष्ट्र शोक करणार? आणि साऱ्या देशाचे गवत सुकून जाईल?
त्यामध्ये राहणाऱ्यांच्या दुष्टाई मुळे पशू व पक्षी मरुन गेले आहेत. कारण ते लोक म्हणाले “आमचे काय होईल हे देवाला माहीत नाही.”
5 कारण तू “यिर्मया, पायदळाबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले, तर मग घोड्यांबरोबर तू कसा धावशील?
जर तू सुरक्षित आणि उघड्या देशात पडतोस तर यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या काटेरी झुडुंपात तू काय करशील?
6 कारण तुझे भाऊबंद आणि तुझ्याच वडिलाच्या घराण्याने तुझ्याविरूद्ध विश्वासघात केला आहे आणि तुझ्याचविरूद्ध आवाज उठवीत आहे.
जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले, तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.”
7 “मी माझे घर सोडले आहे, मी माझे वतन टाकले आहे.
मी माझे प्रिय लोक तिच्या वैऱ्यांच्या हाती दिले आहे.
8 माझे स्वत:चे वतन मला जंगलातील सिंहाप्रमाणे झाले आहेत.
तिने आपला आवाज माझ्याविरूद्ध केला, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे.
9 माझे वतन मला तरस आहे, आणि पक्षी तिच्याभोवती घिरट्या घालत आहेत.
जा आणि भूमीवरील सर्व जिवंत प्राण्यांना गोळा करा, आणि त्यांनी खाऊन टाकावे म्हणून त्यास आण.
10 पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी माझा वाटा पायदळी तुडविला आहे,
त्यांनी माझा आनंददायक भाग वैराण व वाळवंटात पालटवला आहे.
11 त्यांनी तिला उजाड केले आहे, मी तिच्या करिता शोक करत आहे. ती उजाड झाली आहे.
सर्व भूमी उजाड करण्यात आली आहे. कारण कोणी हे मनावर घेत नाही.
12 नाश करणारे सर्व वाळवंटातील त्या उजाड ठिकाणाहून आले आहेत,
कारण परमेश्वराची तलवार एका सीमेपासून देशाच्या तुसऱ्या सीमेपर्यंत खाऊन टाकीत आहे.
कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी देशात सुरक्षितता नाही.
13 त्यांनी गहू पेरला पण काटेरी झाडांची कापणी केली, त्यांनी दमेपर्यंत कष्ट केले, पण काही मिळवले नाही.
परमेश्वराच्या कोपामुळे ते त्यांच्या पिकाबाबत लज्जित होतील.”
14 परमेश्वर माझ्या सर्व शेजाऱ्यांविरूद्ध असे म्हणतो. जे वतन मी आपल्या इस्राएल लोकांस वतन म्हणून दिले त्यास जे दुष्ट शेजारी हात लावतात, पाहा! त्यांना मी त्याच्या भूमीतून उपटून काढीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून काढीन.
15 पण अशा रीतीने त्यांना उपटून काढल्यानंतर असे होईल की परतून त्यांच्यावर दया करीन, आणि मी प्रत्येकाल्या त्याच्या वतनास आणि प्रत्येकाला त्याच्या देशास परत आणीन.
16 असे होईल की जशी त्यांनी माझ्या लोकांस बालमूर्तीची शपथ वाहायला शिकवली तशी, परमेश्वर जिवंत आहे, अशी माझ्या नावाची शपथ वाहायला जर ते माझ्या लोकांचे मार्ग मन लावून शिकतील तर ते माझ्या लोकांमध्ये बांधण्यात येतील.
17 पण जर कोणी ऐकत नाही, तर ते राष्ट्र मी समुळ उपटून टाकीन आणि ते नष्ट करीन, परमेश्वर असे म्हणतो.