14
अवर्षणाविषयी संदेश
1 परमेश्वराचे वचन जे अवर्षणाबद्दल यिर्मयाकडे आले:
2 “यहूदा शोक करो, तिची दारे पडून जावोत, ते देशासाठी विलाप करत आहेत,
त्यांचे यरूशलेमेसाठी रडणे उंचावर गेले आहे.
3 त्यांचे थोरजन त्यांच्या चाकरांना पाण्यासाठी पाठवतात, ते सर्व अयशस्वी परत येतात,
म्हणून ते लज्जित व फजीत होऊन आपले चेहरे झाकून घेतात.
4 ह्यामुळे जमीनीत भेगापडल्या आहेत, कारण भूमीवर कोठेही पाणी नाही.
म्हणून शेतकरी लज्जीत होऊन आपली डोकी झाकत आहे.
5 कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसास एकटेच सोडून देते.
6 उघड्या डोंगरावर उभी राहून, जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकतात,
त्यांचे डोळे खोल गेले आहेत, कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही.
7 जरी आमची दुष्टाई आमच्याविरूद्ध साक्ष देते, पण तरी, परमेश्वरा, तुझ्या नामास्तव कार्य कर.
कारण आमची अविश्वासू कृत्ये वाढली आहेत. आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.
8 इस्राएलाची आशा, तोच एक ज्याने संकटकाळी त्यास तारले.
तू देशात उपऱ्यासारखा किंवा जो वाटसरु रात्री उतरायला वळतो त्याच्यासारखा तू का असावा?
9 जो वाचवू शकत नाही अशा वीर योद्ध्याप्रमाणे तू का गोंधळात आहेस?
कारण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो, आम्हास सोडून जाऊ नकोस.”
10 परमेश्वर या लोकांस असे म्हणतो: त्यांना भटकने प्रिय झाले आहे, त्यांनी आपले पाय असे करण्या पासून आवरून धरले नाही.
यास्तव परमेश्वर त्यांच्यापासून आनंदी नाही, आता तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.
11 परमेश्वर मला म्हणाला, “या लोकांच्या भल्यासाठी तू प्रार्थना करु नकोस.
12 कारण जरी ते उपवास करतील, तरी मी त्यांचे रडने ऐकणार नाही, आणि जरी ते होमार्पण व धान्यार्पण करतील, त्यामध्ये मी आनंद पावणार नाही. कारण तलवार व दुष्काळ आणि रोगराई यांनी मी त्यांचा नाश करीन.”
13 तेव्हा मी म्हणालो, “हे, प्रभू परमेश्वरा, पाहा! संदेष्टे त्यांना सांगत आहेत की, तुम्ही तलवार पाहणार नाही, आणि दुष्काळ तुमच्यासाठी असणार नाही, कारण मी तुम्हास या ठिकाणी खरी सुरक्षितता देत आहे.”
14 परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही आणि त्यांना अशी कोणतीही आज्ञा केली नाही किंवा त्याच्याशी बोललोही नाही. पण त्यांच्या हृदयातून निघणारे कपट, खोटे दर्शन, व दैवप्रश्न व व्यर्थता हे भविष्य ते तुम्हास सांगतात.
15 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी ज्यांना पाठवले नाही, अशे जे भविष्यवादी माझ्या नावात भविष्य सांगतात आणि असे म्हणतात या देशावर तलवार व उपासमार येणार नाही. ते संदेष्टे तलवारीने आणि उपासमारीने मरतील.
16 आणि ज्या लोकांस त्यांनी भवीष्य सांगितले, ते उपासमार व तलवार यामुळे यरूशलेमेच्या रस्त्यावर फेकले जातील. त्यांना व त्यांच्या स्त्रिया व मुलांना आणि मुलींना कोणी पुरणारा पण असणार नाही, कारण त्यांची दुष्टाई मी त्यांच्यावर ओतीन.
17 हे वचन त्यांना सांग: माझ्या डोळ्यांत अश्रू रात्रंदिवस वाहोत, ते थांबू नयेत.
कारण माझ्या लोकांच्या कन्येचे पडणे खूप मोठे आहे,
तिची जखम मोठी आणि ठीक न होणारी आहे.
18 जर मी रानात बाहेर गेलो तर पाहा, तीथे तलवारीने मारले गेलेले आहेत. आणि जर मी शहराजवळ आलो
तर पाहा! दुष्काळाने ग्रासलेले आहेत. कारण दोघेही, याजक आणि संदेष्टे ज्ञान नसल्याने भटकत आहे.”
19 “काय तू यहूदाला पूर्णपणे नाकारले आहे का? तू सियोनचा राग करतोस काय?
बरे न होण्या इतके तू आम्हांला का पीडलेस? आम्हांस शांती असेल ही आशा बाळगली, पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही.
आणि बरे होण्याची वाट पाहिली, पण पाहा, तेथे फक्त भयच आहे.
20 परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हास जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याविरूद्ध अपराध केले.
21 परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, आम्हांला नाकारू नकोस, तुझ्या वैभवशाली सिंहासनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस.
आठवण कर आणि आम्हा बरोबर तुझा करार तोडू नको.
22 राष्ट्राच्या मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य आहे काय? किंवा आकाश स्वत: पावसाच्या सरी पाडण्यास सशक्त आहेत काय?
जो हे सर्व करतो, तो तूच आमचा एकमेव परमेश्वर देव नाही काय? आमची आशा तुझ्यामध्ये आहे. कारण तुच या सर्व गोष्टी केल्या आहेत.”