31
परमेश्वर असे म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व कुळांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.” परमेश्वर असे म्हणतोः
“मी इस्राएलास विसावा देण्यास येईन तेव्हा जे कोणी तलवारीपासून निभावले आहेत त्या लोकांस रानात अनुग्रह मिळेल.”
परमेश्वर पूर्वी मला दिसला व म्हणाला, हे इस्राएला, मी सार्वकालिक प्रीतीने, तुझ्यावर प्रीती केली आहे.
म्हणून मी विश्वासाच्या कराराने तुला आपल्याजवळ ओढून घेतले आहे.
हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन याकरिता तू बांधलेली होशील.
तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील.
तू पुन्हा शोमरोनाच्या डोंगरावर द्राक्षमळ्यांची लागवड करशील. शेतकरी लागवड करतील आणि त्याच्या फळांचा चांगला उपयोग होईल.
असा एक दिवस येईल की, त्यामध्ये एफ्राईमाच्या डोंगरावरील पहारेकरी ओरडून सांगतील.
उठा, आपण परमेश्वर आपला देव याच्याकडे वर सियोनेला जाऊ.
परमेश्वर असे म्हणतो, “याकोबासाठी आनंदाचा गजर करा! राष्ट्रांतील प्रमुख लोकांसाठी आनंदाने जयघोष करा! ऐकू येईल अशी स्तुती करा. म्हणा, ‘हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचे, इस्राएलाच्या वाचलेल्यांचे तारण कर.’
पाहा, मी त्यांना उत्तरेकडच्या देशातून आणीन, पृथ्वीच्या अगदी शेवटच्या ठिकाणाहून मी त्यांना एकत्र करीन.
त्यांच्यामध्ये आंधळे आणि पंगू, गर्भवती आणि ज्या कोणी त्यांच्या प्रसूतीची वेळ आली असेल त्याही त्यांच्याबरोबर असतील.
त्यांची मोठी मंडळी इकडे परत येईल.
ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन.
ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे,
आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.
10 राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा.
तुम्ही राष्ट्रांनी म्हणावे, ज्याने इस्राएल विखरला तोच त्यास एकवटील आणि जसा मेंढपाळ आपल्या कळपाला राखतो तसा तो त्यास राखील.
11 कारण परमेश्वराने खंडणी भरून याकोबाला सोडवले आहे आणि त्याच्यासाठी जो खूप बलवान होता त्याच्या हातातून त्यास मुक्त केले आहे.
12 मग ते येतील आणि सियोनेच्या शिखरावर आनंदाने गातील.
परमेश्वराच्या चांगुलपणामुळे धान्यासाठी आणि द्राक्षरसासाठी, तेलासाठी, आणि थवा व कळपांची संततीसाठी आनंदित होऊन येतील.
त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते पुन्हा कधी दुःखीत होणार नाहीत.
13 मग कुमारी आनंदीत होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध एकत्र आनंद करतील.
कारण मी त्यांच्या शोकाचे रुपांतर उत्सवामध्ये करीन. मी त्यांच्यावर दया करीन आणि दुःखाच्याऐवजी त्यांच्या आनंदाचे कारण होईल.
14 नंतर मी याजकांचा जीव विपुलतेत तृप्त करीन. माझे लोक ते स्वतःला माझ्या चांगुलपणाने भरतील.” असे परमेश्वर म्हणतो.
15 परमेश्वर असे म्हणतो, “रामांत विलाप आणि अतिखेदाचे रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत.
राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे. ती नाहीत म्हणून सांत्वन पावत नाही.”
16 परमेश्वर असे म्हणतो, तू रडण्यापासून आपला आवाज आणि आपले डोळे आसवांपासून आवर.
कारण तुझ्या दुःखाचे प्रतिफळ तुला मिळेल. असे परमेश्वर म्हणतो. तुझी मुले शत्रूंच्या देशातून परत येतील.
17 परमेश्वर असे म्हणत आहे, “तुझ्या भविष्यासाठी तुला आशा आहे.” “तुझे वंशज आपल्या सीमेत परत येतील.
18 खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली.
अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
19 कारण मी तुझ्यापासून भटकल्यानंतर, मी पश्चाताप केला. मला शिक्षण मिळाल्यानंतर, मी दुःखात आपल्या छातीवर *थापा मारल्या.
कारण माझ्या तरुणपणातील अपराधाच्या अपकीर्तीमुळे मी लज्जित व शरमिंदा झालो.”
20 एफ्राईम माझे बहुमूल्य मुल नाही काय? तो माझा प्रिय मोहक मुलगा नाही का?
कारण जरी कधी मी त्याच्याविरुध्द बोललो, तरी खचित मी त्यास आपल्या मनात प्रेमाने आठवण करीतच असतो. याप्रकारे माझे हृदय त्याच्यासाठी कळवळते.
मी खरोखर त्याच्यावर दया करीन. असे परमेश्वर म्हणतो.
21 तू आपल्यासाठी रस्त्यांवर खुणा कर. तू आपल्यासाठी मार्गदर्शक खांब ठेव.
तू जो योग्य मार्ग घेतला, त्या मार्गावर आपले लक्ष ठेव. हे इस्राएला! कुमारी, तू आपल्या नगराकडे परत ये.
22 विश्वासहीन मुली, तू किती वेळ सतत हेलकावे घेशील?
कारण परमेश्वराने पृथ्वीवर काहीतरी नवे निर्माण केले आहे. स्त्री तिच्या रक्षणासाठी बलवान पुरुषाला घेरील.
23 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी लोकांस परत त्यांच्या देशात आणीन, यहूदाच्या नगरांत व देशात राहणारे ते हे म्हणतील, ‘तुझी धार्मिकतेची जागा जेथे तो राहतो, तू पवित्र पर्वता, परमेश्वर तुझे कल्याण करो! 24 कारण यहूदा आणि त्याची सर्व नगरे एकत्र राहतील. तेथे शेतकरी आणि मेंढपाळ त्याच्या कळपाबरोबर राहतील. 25 कारण मी थकलेल्यांना पिण्यास पाणी देईन आणि तहानेने व्याकुळ झालेल्या प्रत्येक जीवास भरेन. 26 यानंतर, मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की, माझी झोप ताजीतवानी करणारी होती.
नवा करार
27 परमेश्वराचे म्हणणे असे आहे. “पाहा, असे दिवस येत आहेत की ज्यात मी यहूदाच्या व इस्राएलाच्या घराण्यांत मनुष्यबीज आणि पशुबीज पेरीन. 28 मग असे होईल की, उपटायला व पाडायला, मोडायला व नाशाला, व पीडायला जशी मी त्यांच्यावर नजर ठेवत असे, तशी बांधायला व लावायला मी त्यांच्यावर नजर ठेवीत जाईन.” असे परमेश्वर म्हणतो.
29 “त्या दिवसात कोणीही पुन्हा असे म्हणणार नाहीत की,
वडिलाने आंबट द्राक्षे खाल्ली, पण मुलांचे दात आंबले आहेत. 30 कारण प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या अन्यायात मरेल. जो प्रत्येकजण आंबट द्राक्षे खाईल, त्याचेच दात आंबतील.”
31 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, “मी इस्राएलाच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन. 32 मी त्यांच्या वडीलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्या दिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला.” असे परमेश्वर म्हणतो.
33 “पण परमेश्वर म्हणतो, त्यादिवसानंतर जो करार मी इस्राएलाच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे.” “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यांमात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन, कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. 34 नंतर परमेश्वरास ओळखा असे म्हणून पुढे प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याला किंवा प्रत्येक आपल्या भावाला शिकवणार नाही. कारण लहानापासून थोरापर्यंत मला ओळखतील.” असे परमेश्वर म्हणतो. “कारण मी त्यांच्या अन्यायांची त्यांना क्षमा करीन आणि मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”
35 परमेश्वर असे म्हणतो, जो परमेश्वर दिवसा प्रकाशण्यासाठी सूर्य देतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशण्याची तजवीज करतो. जो समुद्रास खवळतो या करीता त्याच्या लाटा गर्जतात त्यांना तो शांत करतो. सेनाधीश परमेश्वर असे त्याचे नाव आहे. तो असे म्हणतो.
36 “जर या स्थिर गोष्टी माझ्या दृष्टीपुढून नष्ट झाल्या तर इस्राएलाचे वंशजही माझ्यासमोर सर्वकाळ राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.”
37 परमेश्वर असे म्हणतो, जर फक्त उंचात उंच आकाशाचे मोजमाप करणे शक्य असेल,
आणि जर फक्त पृथ्वीच्या खालचे पाये शोधून काढता येऊ शकतील, तर मीही इस्राएलाच्या सर्व वंशजांनी जे सर्व काही केले आहे
त्यामुळे त्यांना नाकारीन, असे परमेश्वर म्हणतो.
38 “पाहा असे दिवस येत आहेत की; असे परमेश्वर म्हणतो, परमेश्वरासाठी हनानेलाच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंत हे नगर पुन्हा बांधले जाईल. 39 मग त्यासाठी मापनसूत्र गारेबाच्या टेकडीपर्यंत नीट पुढे निघून जाईल आणि तेथून गवाथाकडे वळेल. 40 प्रेतांचे व राखेचे पूर्ण खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपऱ्यापर्यंत सर्व शेते परमेश्वरास पवित्र होतील. ती पुन्हा कधीही उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”
* 31:19 मांडीला