7
आपली वागणूक व कृती सुधारा
1 यिर्मयासाठी परमेश्वराकडून जे वचन आले ते असे, ते म्हणाले:
2 यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका!
3 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपली वाट नीट करा आणि चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही असे केल्यास मी तुम्हास या ठिकाणी राहू देईन
4 “परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर हे आहे. असे खोटे बोलणाऱ्या वाईट गोष्टींस स्वत:स सोपवून देऊ नकोस.
5 कारण जर तू आपला मार्ग नीट केलास आणि चांगले ते केलेस, जर तू शेजारी आणि मनुष्यांमध्ये पुर्णपणे न्याय केला,
6 जर तू देशात राहणाऱ्याचे, अनाथाचे, आणि विधवेचे शोषण करणार नाहीस, आणि या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाहीस आणि स्वत:चे नुकसान करून घ्यायला इतर देवतांच्या मागे चालणार नाहीस,
7 तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन.
8 पाहा! तुम्ही फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात, जे तुमची काहीएक मदत करु शकत नाही.
9 तुम्ही चोरी, खून आणि व्यभिचार आणि खोटी शपथ वाहाल आणि बालमुर्तीस धूप जाळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्यांच्या मागे चालाल,
10 मग ज्या घरात माझ्या नावाची घोषणा होते, तिथे तुम्ही येऊन माझ्या समोर उभे राहून असे म्हणाल का आम्ही तारले गेलो आहोत? म्हणजे तुम्ही हे सर्व घृणीत काम पुन्हा कराल.
11 ज्या घराला माझे नाव आहे, ते तुमच्या दृष्टीने दुसरे काही नसून लुटारूंना लपण्याची जागा आहे का? पाहा, माझ्या दृष्टीस असे आले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
12 तर तुम्ही शिलो येथील जे माझे ठिकाण होते तेथे जा, ज्यात पहिल्याने माझे नाव वसविले आणि त्याचे मी आपले लोक, इस्राएल यांच्या दुष्कृत्यांमुळे जे केले ते पाहा.
13 इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही.
14 म्हणून, शिलोचे जसे मी केले, त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करीन.
15 एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर केले, तसे मी तुम्हास माझ्यापासून दूर करीन.
मूर्तीपूजेमुळे देवाचा क्रोध
16 यिर्मया, तुला सांगतो, या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस आणि त्यांच्यासाठी याचना व आळवणीही करु नकोस किंवा त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. कारण मी तुझी प्रार्थना ऐकणार नाही.
17 ते लोक यहूदा शहरात, आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय?
18 मला संताप आणावा म्हणून मुले लाकडे गोळा करत आहेत आणि वडील सरपण पेटवत आहे. स्त्रिया आकाशाच्या राणीसाठी कणीक मळत आहे आणि इतर दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेयार्पणे ओतत आहेत.
19 परमेश्वर असे म्हणतो, ते मला राग आणतात काय? “ते स्वत:लाच संताप आणत आहेत. म्हणजे त्यांच्यावर लाज यावी.
20 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी या जागेवर माझा संताप मनुष्यांवर, प्राण्यांवर, झाडांवर आणि पिकांवर येईल, तो जाळून टाकणार आणि कोणीही तो विझवू शकणार नाही.”
बंडखोरीबद्दल यहूदाला शिक्षा
21 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, तुम्ही आपली होमार्पणे आपल्या यज्ञास जोडा आणि मांस खा.
22 कारण मी जेव्हा तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्या कडे काहीएक मागीतले नाही, मी त्यांना होमार्पणे आणि यज्ञ यांबद्दल आज्ञा दिली नाही.
23 मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तर मी आज्ञा केलेल्या सर्व मार्गात चाला, म्हणजे तुमचे चांगले होईल.
24 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले.
25 तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजवर मी माझे सेवक तुमच्याकडे पाठवले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठवले.
26 पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते
27 “तर त्यांना हे वचन सांगितले तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना या गोष्टी घोषीत केल्या तरी ते तुला उत्तर देणार नाहीत.
28 म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांग. ज्या राष्ट्रांने परमेश्वराचे म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि शिक्षा घेतली नाही, ते हेच आहे. सत्यता ही त्यांच्या मुखातून छेदून टाकलेली आहे.
29 हे यरूशलेमे, तुझे केस कापून दूर फेकून दे. उजाड डोंगरमाथ्यावर जाऊन शोकगीत गा.
कारण परमेश्वराने रागाच्या भरात या पिढीला नाकारले आणि सोडले आहे.
30 कारण परमेश्वर असे म्हणतो, यहूदाच्या लोकांस पापे करताना मी पाहिले आहे.” त्यांनी वापरण्यात नसलेल्या गोष्टी, ज्या घराला माझे नाव आहे, ते भ्रष्ट करायला ठेवल्या आहेत.
31 आणि त्यांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्याठिकाणी ते स्वत:च्या मुलामुलींना अग्नीत जाळण्यासाठी देत असत. अशी आज्ञा मी दिलेली नाही आणि असे काही माझ्या मनातही आले नाही.
32 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत. “पुन्हा कधीही तोफेत व बेन हिन्नोमची दरी असे म्हटले जाणार नाही, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील.
33 प्रेते आकाशातील पक्ष्यांचे आणि पृथ्वीवरील पशूस अन्न असे होतील. आणि त्यांना हाकलायला तेथे कोणीही नसेल.
34 यहूदाच्या गावांतील व यरूशलेमेच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. वधू वरांचा शब्द उमटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.”