19
शिमोनाला देण्यात आलेला प्रदेश
दुसऱ्या वेळेस शिमोनाच्या नावाची चिठ्ठी म्हणजे शिमोनाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले. आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बैर-शेबा म्हणजे शेबा व मोलादा; हसर-शुवाल व बाला व असेम; एल्तोलाद व बथूल व हर्मा; आणि सिकलाग व बेथ-मर्का-बोथ व हसर-सूसा; आणि बेथ-लबवोथ व शारुहेन; ही तेरा नगरे, आणि त्यांची गावे; अईन, रिम्मोन व एथेर व आशान; अशी नगरे चार, आणि त्याकडले गावे; बालथ-बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहुकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय. शिमोनाला यहूदी वंशजाच्या वतनातील प्रदेशातच वाटा देण्यात आला. कारण यहूदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजाला वतन मिळाले.
जबुलूनाला देण्यात आलेला प्रदेश
10 तिसरी चिठ्ठी जबुलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे; 11 त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते. 12 ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ-ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते. 13 तेथून पूर्वे दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते. आणि तेथून नेया जवळील रिम्मोन येथे निघते; 14 ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताह-एल खोऱ्यात संपते. 15 कट्टाथ, नहलाल व शिम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यामध्ये गावे मोजली नाहीत. 16 जबुलून वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
इस्साखाराला देण्यात आलेला प्रदेश
17 इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चौथी चिठ्ठी निघाली. 18 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम; 19 आणि हफराईम, शियोन व अनाहराथ; 20 रब्बीथ, किशोन व अबेस; 21 रेमेथ व एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस, 22 त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गावे. 23 इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
आशेराला देण्यात आलेला प्रदेश
24 पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली. 25 त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ; 26 अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते; 27 ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यंत आणि इफताह-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक नगर व नियेल नगर येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते. 28 तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोन शहरापर्यंत पोहचते. 29 तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते. 30 उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली; 31 आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
नफतालीला देण्यात आलेला प्रदेश
32 सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली. 33 त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते. 34 तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक शहर येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतन भागापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते. 35 त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ; 36 अदामा, राम व हासोर; 37 केदेश, एद्रई व एन-हासोर; 38 इरोन मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे आणि त्यांची गावे. 39 नफतालीच्या वंशचे त्याच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे.
दानाला देण्यात आलेला प्रदेश
40 सातवी चिठ्ठी दान वंशजाच्या नावाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली. 41 त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश. 42 शालब्बीन व अयालोन व इथला; 43 एलोन व तिम्ना, एक्रोन; 44 एलतके, गिब्बथोन व बालाथ; 45 यहूदा, बने-बराक व गथ-रिम्मोन. 46 मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरील प्रदेश. 47 दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेरही गेली, कारण की दान वंशजांनी लेशेम शहराशी लढून त्यास धरले; आणि तलवारीने त्यास मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यामध्ये वस्ती केली, आणि आपला पूर्वज दान याचे नाव त्यांनी लेशेम शहरास ठेवले. 48 दानाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे मिळाली ते हे.
यहोशवाला देण्यात आलेला प्रदेश
49 इस्राएल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ती केल्यावर नूनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्ये वतन दिले. 50 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरचे तिम्नाथ-सेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यामध्ये राहिला. 51 एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यांनी शिलोमध्ये दर्शनमंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे त्यांनी देश वाटून देण्याचे संपले.