24
1 यहोयाकीमाच्या काळात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यहूदात आला. यहोयाकीमाने तीन वर्षे त्याचे मांडलिकत्व पत्करले आणि नंतर फितूर होऊन त्याने बंड केले.
2 यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने खास्दी, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे घडेल म्हणून सांगितले होते आणि त्याप्रमाणेच घडत होते. यहूदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.
3 यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसा व्हावा म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती.
4 मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. सारे यरूशलेम त्यांच्या रक्ताने माखले. या पापांना परमेश्वराजवळ क्षमा नव्हती.
5 यहोयाकीमाने बाकी जे काही केले त्याची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात आहे.
6 यहोयाकीमाच्या मृत्यूनंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा यहोयाखीन राज्य करु लागला.
7 मिसरच्या नदीपासून फरात नदीपर्यंत, पूर्वी मिसरच्या ताब्यात असलेला सगळा प्रदेश बाबेलाच्या राजाने बळकावल्यामुळे मिसरचा राजा मिसरदेश सोडून आला नाही.
यहोयाकीमाची कारकीर्द
2 इति. 36:9-10
8 यहोयाखीन राजा झाला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर तीन महिने राज्य केले. याच्या आईचे नाव नेहूष्टा. ती यरूशलेमेच्या एलनाथानची मुलगी.
9 यहोयाखीनाने आपल्या वडिलांप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने गैर वर्तन केले.
10 यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरूशलेम नगराला वेढा दिला.
11 नंतर नबुखद्नेस्सर बाबेलचा राजा या नगरात आला.
12 यहूदाचा राजा यहोयाखीन बाबेलच्या या राजाच्या भेटीला आला. यहोयाखीनाची आई, त्याचे कारभारी, वडिलधारी मंडळी, सरदार हेही लोक त्याच्याबरोबर होते. तेव्हा बाबेलच्या राजाने यहोयाखीनाला आपल्या ताब्यात घेतले. नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी हे झाले.
13 यरूशलेमेच्या परमेश्वराच्या मंदिरातली आणि राजवाड्यातली सर्व मौल्यवान चीजवस्तू नबुखद्नेस्सरने हस्तगत केली. इस्राएलाचा राजा शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली सर्व सुवर्णपात्रे त्याने मोडून तोडून टाकली. हे परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच झाले.
14 नबुखद्नेस्सरने यरूशलेमेमधील सगळी वडिलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांस त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब मनुष्य वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.
15 यहोयाखीनाला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, स्त्रिया, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही यरूशलेमेत त्याचे कैदी होते.
16 सात हजाराचे सैन्य, एक हजार कुशल कामगार आणि कारागीर यांनाही त्याने नेले. हे सर्व लोक युध्दात वाकबगार, तयार होते. त्यांना राजाने बाबेलला कैदी म्हणून नेले.
17 बाबेलाच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनाचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.
सिद्कीयाची कारकीर्द
18 सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना शहरातील यिर्मया याची मुलगी.
19 सिद्कीया यहोयाकीमाप्रमाणेच वर्तनाने वाईट होता. परमेश्वराच्या आज्ञेविरुध्द तो वागला.
20 तेव्हा परमेश्वराने संतापाने यरूशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली. नंतर सिद्कीयाने बाबेलाच्या राज्याविरूद्ध बंडखोरी केली.