2
सीयोनेचा शोक परमेश्वराकडून
1 परमेश्वराने सियोनकन्येला आपल्या क्रोधमय काळोख्या मेघाने कसे अच्छादीले आहे.
इस्राएलाचे सौंदर्य त्याने स्वर्गातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे.
त्याने आपल्या क्रोधासमयी न्यायासनाचे स्मरण केले नाही
2 परमेश्वराने याकोबाची सर्व नगरे गिळंकृत केली आहेत.
त्यांच्यावर कसलीही दया केली नाही.
त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्ये दुर्गस्थानांना खाली ढकलून; त्याने ते धुळीला मिळविले आहेत.
त्याने तिचे राज्य व त्यातले सरदारास अप्रतिष्ठीत व कलंकित ठरविले आहे.
3 त्याने आपल्या संतप्त क्रोधाने इस्राएलाचे सर्व बळ नष्ट केले आहे.
त्याने आपला उजवा हात शत्रूंपासून मागे घेतला आहे.
सर्वत्र पेट घेणाऱ्या अग्नीप्रमाणे त्याने याकोबाला जाळून टाकले आहे.
4 त्याने शत्रूंप्रमाणे आमच्या दिशेने आपला धनुष्य वाकविला आहे.
त्याने युद्धासमान संघर्षाचा पवित्र घेऊन शत्रूप्रमाणे आम्हावर बाण चालविण्यास आपल्या हाताने नेम धरिला आहे.
त्याच्या दृष्टीस बहूमूल्य लोकांची त्याने हत्या केली.
सियोनकन्येच्या तंबूवर त्याने आपला क्रोध अग्नीसारखा ओतला आहे.
5 परमेश्वर शत्रूसारखा झाला. त्याने इस्राएलांस गिळले.
त्याने तिच्या बलस्थानाचा नाश केला आहे.
त्याने यहूदाच्या कन्येमध्ये शोक व विलाप वाढवला आहे.
6 एखाद्या बागेप्रमाणे त्याने निवासमंडपावर हल्ला केला आहे.
त्याने पवित्र सभास्थान उध्वस्त केले.
सियोनेत पवित्रसण व शब्बाथ याचा विसर परमेश्वराने घडवून आणिला आहे कारण त्याने आपला क्रोध राजे
आणि याजका यांवर प्रकट करून त्यांना तुच्छ लेखिले आहे
7 परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे; त्याने आपल्या पवित्रस्थानाचा वीट मानला आहे.
त्याने तिच्या राजवाड्याच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत.
परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला.
सणाचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.
8 सियोनकन्येचा तट नाहीसा करण्याचे परमेश्वराने ठरविले आहे.
त्याने त्यावर दोरी ताणली आहे, आणि आपला हात संहार करण्यापासून आवरिला नाही.
म्हणून त्याने तट व कोट ह्यास शोक करायला लाविला आहे.
ते सर्वच व्याकूळ झाले आहेत.
9 यरूशलेमेच्या वेशींची दरवाजे जमिनित खचल्या आहेत. त्याने वेशींचे अडसर तोडून नष्ट केले.
तिचे राजे आणि सरदार हे मोशेचा नियमशास्त्र नसलेल्या परराष्ट्राप्रमाणे आहेत.
तिच्या संदेष्टयांना परमेश्वराकडून दृष्टांत ही प्राप्त होत नाहीत
10 सियोनेची वडीलधारी मंडळी भूमीवर बसून निमुटपणे आक्रंदन करीत आहे.
त्यांनी आपल्या डोक्यात धूळ उडवली आहे. त्यांनी गोणताटाचे कपडे नेसले आहेत.
यरूशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववित आहे.
11 माझे डोळे आसवांनी जर्जर झाले आहेत.
माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे.
माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे. कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे.
मुले आणि तान्ही चौकांत मूर्छित पडत आहेत.
12 ती मुले त्यांच्या मातांना म्हणतात, “धान्य आणि द्राक्षरस कोठे आहेत”
घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्च्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला.
13 यरूशलेमकन्ये, मी तुझ्या संबधी काय बोलू? मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी तुलना कोणाबरोबर करू,
सीयोनेच्या कुमारी कन्ये? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोण बरे करू शकेल?
14 तुझ्या संदेष्ट्यांनी पाहिलेले दृष्टांत तुझ्यासाठी कपटी व मुर्खपणाचे होते.
त्यांनी तुझे अपराध तुझे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रकट केले नाही,
तर तूझ्यासाठी फसवे दैवी संकेत आणि पाशाचे दृष्टांत निर्माण केले.
15 रस्त्याच्या बाजूने जाणारे सुध्दा तुझ्याकडे पाहून टाळ्या वाजवतात.
यरूशलेमेच्या कन्येकडे पाहून ते शिळ घालतात आणि आपल्या मस्तकाने इशारा करून म्हणतात,
“हिच ती नगरी आहे का जिला ‘सौंदर्यपूर्ण’ किंवा ‘आखिल पृथ्वीस आनंदमय करणारी नगरी’ असे म्हणत?”
16 तुझे सर्व शत्रू तुझ्याविरुध्द मोठे तोंड वासून तुझी थट्टा करतात.
ते शिळ घालून दात-ओठ खातात व म्हणतात, “आम्ही तिचे प्राशन केले आहे.
खात्रीने आम्ही याच दिवसाची वाट पाहत होतो.
आम्ही तो दिवस शोधला! आणि तो पहिला आहे!”
17 परमेश्वराने सिद्ध केल्याप्रमाणे सर्व केले आहे. त्याने फार पूर्वी जाहीर केलेले आपले अभिवचन पूर्ण केले आहे.
त्याने चिरडून टाकले आणि त्यांच्यावर त्याने दया दाखविली नाही.
त्याने तुझ्या शत्रूंना प्रबळ केले आहे.
18 “त्यांचे हृदय परमेश्वराचा धावा करत आहे.
हे सियोनकन्येच्या तटा, तुझे अश्रू नदीच्या प्रवाहाप्रमाणे रात्रंदिवस वाहत राहो.
त्यास अटकाव करू नको. तुझ्या डोळ्यातील बाहुलीस विसावा देऊ नको.
19 रात्रीच उठून मोठ्याने आक्रोश कर.
परमेश्वराच्या मुखापुढे आपले मन पाण्यासारखे ओता.
जी तुझी मुले उपासमारीने नगराच्या रस्त्या-रस्त्यावर बेशूध्द होत आहेत, त्यांच्या जीवा करता तू आपले हात वर कर.
20 परमेश्वरा, पाहा, जिच्याशी तू कठोरपणाने असे केले, तिच्या कडे लक्ष लाव.
स्त्रियांनी आपल्या पोटच्या फळास, आपल्या मुलांना त्यांच्या बालपणातच, खावे काय?
परमेश्वराच्या मंदिरात याजक व संदेष्टे मारले जावेत काय?
21 तरुण आणि वृध्द असे दोघेही रस्त्यात भूमीवर कसे पडले आहेत.
माझे तरुण व तरुणी तलवारीने पडले आहेत;
तू आपल्या क्रोधाच्या दिवशी त्यांच्यावर कसलिही दया केली नाही तर त्यांना निर्दयपणे मारलेस.
22 पवित्र सभेच्या दिवसातील दहशतीप्रमाणे चोहोबाजूने तू माझ्याविषयी भय निर्माण केले आहेस.
परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी कोणीही सुटला नाही, व वाचला नाही.
मी ज्यांचे लालनपालन केले व वाढवले, त्यांना माझ्या शत्रूने नष्ट केले.”