6
1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 जर कोणी परमेश्वराविरूद्ध आज्ञेचा भंग करून पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून फसविले व त्याच्यावर जुलूम केला.
3 किंवा आपल्या शेजाऱ्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली व तिच्याविषयी खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला;
4 म्हणजे असले पाप करून दोषी झाला; तर त्याने चोरलेली किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची गहाण ठेवलेली वस्तू बूडविली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्यास सापडली असून त्याने परत केली नसेल ती.
5 किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहीली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी ज्या वस्तुचा त्याने अपहार केला असेल तिची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किंमतीचा पाचवा हिस्सा अधिक भरावा;
6 त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा;
7 मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.
होमार्पणाचा विधी
8 परमेश्वर मोशेला म्हणाला,
9 अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.
10 मग याजकाने आपला तागाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदीजवळ ठेवावी.
11 मग याजकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी.
12 परंतु वेदीवरील अग्नी जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर लाकडे ठेवून तो पेटता ठेवावा व त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा.
13 वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये.
अन्नार्पणाचा विधी
14 हा अन्नार्पणाचा नियम आहे: अहरोनाच्या मुलांनी ते परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे;
15 याजकाने त्या अन्नार्पणातून मूठभर सपिठ, थोडे तेल व धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा; ते परमेश्वरासाठी स्मारक भाग म्हणून त्याच्या चांगूलपणासाठीचे सुवासीक हव्य होय.
16 अन्नार्पणातून जे काही उरलेले, व खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.
17 ते खमीर घालून भाजू नये; माझ्या अर्पणातून याजकाचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिलेले आहे; पापार्पण व दोषार्पण या सारखेच हेही परमपवित्र आहे.
18 या अर्पणाला खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढया सतत चालू राहावा; या अर्पणास जो स्पर्श करेल तो पवित्र होईल.
19 परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
20 “अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वरास अर्पण आणावयाचे ते हे: एक दशांश एफा मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे.
21 ते तव्यावर तेलात परतावे त्यामध्ये तेल चांगले मुरल्यावर ते आत ओतावे व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे.
22 त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून निवडला जाईल त्यानेही असेच अर्पण करावे. कायमचा विधी म्हणून या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा.
23 याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा; ते अन्नार्पण खाऊ नये.”
पापार्पणाचा विधी
24 परमेश्वर मोशेला म्हणाला,
25 अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.
26 जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा.
27 ज्याला मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र होईल; त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्रस्थानी धुवावे.
28 मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे; पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे.
29 याजकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला ते खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे;
30 आणि ज्या पापबलीचे थोडे रक्त दर्शनमंडपामध्ये पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.