2
1 तो तुला आदळून तुकडे करण्यासाठी तुझ्याविरूद्ध आला आहे. शहरातील कोटांचे रक्षण कर, रस्त्यावर नजर ठेव, स्वतःला बळकट कर, तुझ्या सैन्याला एकत्र कर.
2 कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणेच पुन्हा प्राप्त करून देईल. जरी लुटारूनी त्यास रिक्त केले आहे आणि त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश केला आहे.
3 त्यांच्या वीरांच्या ढाली लाल आहेत आणि शूर माणसे किरमिजी रंगाचे पोषाख नेसले आहेत, त्यांच्या तयारी करण्याच्या दिवशी रथ पोलादाने चमकत आहेत आणि सुरूच्या काठ्यांचे भाले हवेत हालवत आहेत.
4 रथ रस्त्यातून वेगाने धावत आहेत; रूंद रस्त्यामधून ते इकडे तिकडे झपाट्याने पळत आहेत, ते मशाली सारखे आणि विजांसारखे धावत आहेत.
5 जो कोणी तुझे तुकडे करण्यास धडक देत आहे तो त्याच्या अधिकाऱ्यांना बोलावत आहे; ते उतावळीने त्यांच्या चालण्यात अडखळत आहेत. ते तटबंदीवर हल्ला करण्याची घाई करत आहेत. हल्ला करणाऱ्यापासून संरक्षणासाठी रक्षणाची तयारी करत आहेत.
6 पण नदीकाठची दारे उघडी केली आहेत, आणि राजवाडा नाश होऊन कोसळला आहे.
7 असा निर्णय होऊन चुकला आहे, राणी उघडी झाली आहे आणि तिला धरून नेले आहे आणि तिच्या दासी दु:खाने पारव्याप्रमाणे कण्हत आहेत, त्या आपली छाती पिटून घेत आहेत.
8 निनवे एक पाण्याच्या तळ्यासारखी आहे, पाण्याच्या जोरदार वेगासारखे लोक जलद दूर जात आहेत. दुसरे किंचाळतात, थांबा! थांबा, परंतु कोणीही मागे वळून पाहत नाही.
9 चांदी लुटून घ्या, सोने लुटून घ्या, सर्व उज्वल शोभिवंत वस्तूंचा अमर्याद साठा आहे, त्यास अंत नाही.
10 निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.
11 आता सिंहाची गुहा कोठे आहे? तरुण सिंहाच्या छाव्याची भक्ष्य खाण्याची जागा कोठे आहे? सिंह आणि सिंहीण त्यांच्या छाव्याबरोबर तेथे फिरत असत, ते तेथे कशालाही भीत नसत ती जागा कोठे आहे?
12 सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडून तुकडे करीत असे आणि तो आपल्या सिंहिणीसाठी भक्ष्याचा गळा दाबीत असे आणि तो आपल्या गुहा भक्ष्याने आणि त्याची गुहा शिकारीने भरीत असे.
13 पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तिचे रथ जाळून त्यांचा धूर करीन; आणि तलवार तुझ्या तरुण सिंहास खाऊन टाकील. मी तुझे भक्ष्य तुझ्या देशातून नाहीसे करीन, आणि तुझ्या दूतांचा आवाज ऐकण्यात येणार नाही.