25
इस्त्राएल लोक व बआल पौराची उपासना करतात
इस्राएली शिट्टीमात राहत असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले. मवाबाच्या स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या देवांच्या अर्पणात आमंत्रण दिले. तेव्हा लोक जेवले व त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले. इस्राएल लोकांनी बआल-पौराच्या देवांची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वराचा राग इस्राएलांवर भडकला.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरता भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलावर भडकलेला राग जाईल.” मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या ताब्यातील पुरुष बआल-पौराच्या देवांची उपासना करतात त्या सर्वांना तुम्ही मारून टाका.”
त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी जमली होती. एका इस्राएली मनुष्याने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भावाच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडीलधारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते तर दर्शनमंडपाशी रडत होते. जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला.
तो त्या इस्राएली मनुष्याचा मागे त्याच्या तंबूत गेला आणि त्याने त्या दोघांच्या म्हणजे इस्राएली मनुष्याच्या व त्या स्त्रीच्या पोटात भाला आरपार खुपसला. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी बंद झाली. या मरीमुळे एकून चोवीस हजार लोक मरण पावले. 10 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 11 एलाजाराचा मुलगा फिनहास याजक अहरोनाच्या नातवाने इस्राएल लोकांस माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएलावरील माझा राग दूर केला. म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी त्यांचा नाश केला नाही.
12 फिनहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतीचा करार करीत आहे. 13 हा त्यास आणि त्याच्यामागे त्याच्या वंशजाना सर्वकाळ याजकपणाचा करार होईल. कारण तो आपल्या देवाबद्दल खूप आवेशी झाला. आणि त्याने इस्राएलाच्या वंशासाठी प्रायश्चित केले.
14 “मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली मनुष्य मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता.” 15 आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबी होते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.
16 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणालाः 17 “तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानाचे लोक तुझे शत्रू आहेत. 18 कारण त्यांनी तुला आपल्या कपटाने शत्रूसारखे वागवले. त्यांनी तुला पौराच्या वाईट गोष्टींच्या बाबतीत आणि मिद्यानाच्या अधिपतीची मुलगी कजबी, त्यांची बहीण, जी पौराच्या प्रकरणात मरी पसरली तेव्हा ती मारली गेली, तिच्या गोष्टीने ते तुम्हास जाचतात.”