23
जेव्हा तू अधिपतीबरोबर जेवायला बसतोस,
तेव्हा काळजीपूर्वक तुझ्यापुढे कोण *आहे याचे निरीक्षण कर,
आणि जर तू खादाड असलास तर
आपल्या गळ्याला सुरी लाव.
त्याच्या मिष्टान्नांची हाव धरू नको,
कारण ती लबाडाची खाद्ये आहेत.
श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको;
तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे.
जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील,
आणि अचानक ते पंख धारण करतील,
आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील.
जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको,
आणि त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको,
तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो.
तो तुला खा व पी! म्हणतो,
परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही.
जे थोडेसे अन्न तू खाल्ले ते ओकून टाकशील,
आणि तुमच्या शुभेच्छा व्यर्थ जातील.
मूर्खाच्या कानात काही सांगू नको,
कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील.
10 जुन्या सीमेचा दगड काढू नको;
किंवा अनाथाची शेती बळकावू नको.
11 कारण त्यांचा तारणारा समर्थ आहे;
आणि तो त्यांचा कैवार घेऊन तुमच्याविरुध्द होईल.
12 तू आपले मन शिक्षणाकडे
आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव.
13 मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको;
कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.
14 जर तुम्ही त्यास छडीने मारले,
तर तुम्ही त्याचा जीव अधोलाकापासून वाचवाल.
15 माझ्या मुला, तू जर शहाणा असलास
तर मग, माझ्या मनालाही आनंद होईल.
16 तुझे ओठ योग्य ते बोलत असता,
माझे अंतर्याम आनंदित होईल.
17 तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये,
पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा.
18 कारण त्यामध्ये खचित भविष्य आहे;
आणि तुझी आशा तोडण्यात येणार नाही.
19 माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख.
20 मद्यप्यांबरोबर
किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस.
21 कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात,
झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील.
22 तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक,
तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.
23 सत्य विकत घे, पण ते विकू नको;
शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.
24 नीतिमानाचा पिता फार उल्लासेल,
आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल.
25 तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या.
जिने तुला जन्म दिला तिला आनंद घेऊ दे.
26 माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे,
आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत.
27 कारण वेश्या ही खोल खड्डा आहे
आणि दुसऱ्या मनुष्याची पत्नी ही अरुंद खड्डा आहे.
28 ती चोरासारखी वाट बघत असते,
आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
29 कोणाला हाय? कोणाला दुःख? कोणाला लढाई?
कोणाला गाऱ्हाणी? कोणाला विनाकारण जखमा?
कोणाला आरक्त डोळे आहे?
30 जे मद्य पीत रेंगाळतात,
जे मिश्र मद्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात.
31 जेव्हा मद्य लाल आहे,
जेव्हा तो प्याल्यात चमकतो,
आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको.
32 पण शेवटी तो सापासारखा चावतो,
आणि फुरशाप्रमाणे झोंबतो.
33 तुझे डोळे विलक्षण गोष्टी पाहतील;
आणि तुझे मन विकृत गोष्टी उच्चारील.
34 जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा,
अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील.
35 तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला तडाखा दिला! पण मला काही लागले नाही.
त्यांनी मला पिटले पण मला ते जाणवले नाही.
मी केव्हा जागा होईल? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”
* 23:1 काय