138
परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र
मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन;
मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन,
तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन.
तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची *थोरवी वाढविली आहेस.
मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस.
तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील,
कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील
कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो,
पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस.
माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस;
आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे;
हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे.
तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.
* 138:2 कराराची