140
छळणाऱ्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र
हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव;
जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव.
ते आपल्या मनात वाईट योजना करतात;
ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात.
त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते;
त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे.
हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव;
मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव.
त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे.
गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत;
त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे;
त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे.
मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा,
माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.
हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या,
माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस.
हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको,
त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील.
ज्यांनी मला घेरले आहे;
त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.
10 त्यांच्यावर जळते निखारे पडोत;
त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर
कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो.
11 वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही;
जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.
12 परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे,
आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे.
13 खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील;
सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.