21
इस्त्राएल व यहूदी येथील शिरगणती
2 शमु. 24:1-25
1 आणि सैतान इस्राएलाविरुध्द उठला व त्याने दावीदाला इस्राएलाची मोजणी करण्यास भाग पाडले.
2 दावीद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “जा बैर-शेबापासून दानापर्यंत सर्व इस्राएल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहित व्हावी म्हणून मला परत येऊन अहवाल द्या.”
3 यवाब म्हणाला “परमेश्वर आपले सैन्य आहे त्यापेक्षा शंभर पटीने अधिक वाढवो. पण माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाही का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्राएलावर त्याने दोष का आणावा?”
4 पण राजाचा शब्द यवाबाविरुध्द अंतिम होता, यामुळे यवाब निघून गेला आणि सर्व इस्राएलातून फिरला. मग यरूशलेमाला परत आला.
5 मग यवाबाने दावीदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्राएलात अकरा लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहूदात चार लाख सत्तर हजार पुरुष होते.
6 पण लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता.
7 देवाला या कृतीमुळे वाईट वाटले म्हणून त्याने इस्राएलावर मारा केला.
8 मग दावीद देवाला म्हणाला, “मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे. आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे.”
9 परमेश्वर दावीदाचा संदेष्टा गादला म्हणाला,
10 “जाऊन दावीदाला सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे, मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यातील एक निवड.”
11 मग गाद दावीदाकडे गेला व त्यास म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘त्यातून एक निवड.
12 तीन वर्षाचा दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा किंवा इस्राएलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी असावी? तर आता, ज्याने मला पाठवले, त्यास मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग.”
13 मग दावीद गादला म्हणाला, “मी गंभीर अडचणीत आहे. मला लोकांच्या हातात पडण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडू दे, कारण त्याच्या दयेची कृती फार महान आहे.”
14 तेव्हा परमेश्वराने इस्राएलावर मरी पसरवली आणि त्यामध्ये सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले.
15 यरूशलेमेचा नाश करण्यास देवाने दूत पाठवला. तो तिचा नाश करणार, हे परमेश्वराने पाहिले व हानी करण्यापासून त्याचे मन बदलले. तो त्या नाश करणाऱ्या दूताला म्हणाला, “पुरे झाले, आता तुझा हात मागे घे.” त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ उभा होता.
16 दावीदाने वर पाहिले व तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरूशलेमेवर उगारलेली होती. तेव्हा गोणताट घातलेले दावीद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले.
17 दावीद देवाला म्हणाला, “सैन्याची मोजणी करण्याचा हूकूम मी दिला होता की नाही? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुष्ट काम केले आहे. पण या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा माझ्या देवा, मी विनंती करतो तुझा हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडून तू आम्हास शिक्षा दे, पण तुझ्या लोकांस या मरीने शिक्षा देऊ नको.”
18 मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की, तू दावीदाला सांग, दावीदाने वर जाऊन अर्णान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी.
19 मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दावीद वरती गेला.
20 अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता, तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्याबरोबर होते ते लपले.
21 आणि दावीद अर्णानाकडे आला, तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दावीदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दावीदाला तोंड जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.
22 मग दावीद अर्णानला म्हणाला, “हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधीन.”
23 अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन.”
24 तेव्हा राजा दावीद अर्णानाला म्हणाला, “नाही, मी तुला त्याची पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन. कारण जे तुझे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. आणि किंमत दिल्यावाचून घेतलेले होमार्पण मी अर्पण करणार नाही.”
25 आणि दावीदाने त्या जागेसाठी अर्णानाला सहाशें शेकेल सोने दिले.
26 दावीदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वरास हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले.
27 मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली.
मंदिरासाठी जागा
28 त्या वेळेस, जेव्हा दावीदाने पाहिले की अर्णान यबूसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले तेव्हा त्याने तेथे यज्ञ केले.
29 कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती.
30 पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दावीद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता.