4
बवाज रूथबरोबर विवाह करतो
आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला. मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले.
मग तो त्या जवळच्या नातलगाला म्हणाला, “मवाब देशातून नामी आली आहे; ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे, आणि तुला हे कळवावे व येथे या बसलेल्यांसमोर आणि माझ्या वडीलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्यानंतर मी आहे.” तो म्हणाला, “मी खंडून घेईन.”
मग बवाज म्हणाला, “ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची पत्नी मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे.” तेव्हा तो जवळचा नातलग म्हणाला, “माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही; सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल, म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.”
वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात अशी पद्धत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्याला देत असे. तो जवळचा नातलग बवाजाला म्हणाला, “तूच ते विकत घे,” आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या.
बवाज त्या वडीलजनांना व सर्व लोकांस म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. 10 याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतो; ते यासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनात कायम रहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये, आज तुम्ही याविषयी साक्षी आहात.”
11 तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहो, ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ ह्यांच्याप्रमाणे करो; एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमात कीर्ती होवो. 12 आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्याद्वारे होवो.”
13 मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. 14 तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो. 15 तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.”
16 तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली. 17 “नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.
18 पेरेशाची वंशावळ: पेरेस हेस्रोनाचा पिता झाला, 19 हेस्रोन रामचा पिता झाला, राम अम्मीनादाबाचा पिता झाला, 20 अम्मीनादाब नहशोनाचा पिता झाला, नहशोन सल्मोनाचा पिता झाला, 21 सल्मोन बवाजाचा पिता झाला, बवाज ओबेदाचा पिता झाला, 22 ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दाविदाचा पिता झाला.