23
कईलात आणि रानात दावीद लपून राहतो
1 तेव्हा कोणी दावीदाला सांगितले की, पाहा पलिष्टी कईल्याशी लढतात व खळी लुटत आहेत.
2 म्हणून दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कईल्याचे रक्षण करू काय?” मग परमेश्वर दावीदाला म्हणाला, जा पलिष्टयांना मारून कईल्याचे रक्षण कर.
3 तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी म्हटले, “पाहा आम्हास येथे यहूदात भय आहे; मग आम्ही कईल्यांकडे पलिष्टांच्या सैन्यावर चालून गेलो तर ते कितीतरी अधिक धोकादायक होईल!”
4 मग दावीदाने आणखी परमेश्वरास विचारले, आणि परमेश्वराने उत्तर देऊन म्हटले, “उठून खाली कईल्याकडे जा, कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन.”
5 मग दावीद व त्याची माणसे कईला येथे जाऊन पलिष्ट्यांशी लढली आणि त्यांनी त्यांची गुरेढोरे नेली व त्यांचा मोठा वध केला; असे दावीदाने कईलकरास तारले.
6 त्यानंतर असे झाले की, अहीमलेखाचा मुलगा अब्याथार दावीदाकडे कईला येथे पळून गेला तेव्हा त्याने आपल्या हाती एफोद आणले.
7 दावीद कईल्याला गेला असे कोणी सांगितले; “तेव्हा शौल म्हणाला, परमेश्वराने तुला माझ्या हाती दिले आहे. कारण वेशीच्या व अडसराच्या नगरात शिरून तो कोंडला गेला आहेस.”
8 मग कईल्याकडे उतरावे आणि दावीदाला व त्याच्या मनुष्यांना वेढा घालावा म्हणून शौलाने सर्व लोकांस लढाईला बोलावले.
9 आपल्याबद्दल शौल वाईट योजीत आहे, हे दावीदाला कळले म्हणून तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”
10 मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा शौल माझ्यामुळे नगराचा नाश करायला कईल्यावर येऊ पाहत आहे असे तुझ्या सेवकाने खचित ऐकले आहे;
11 तर कईलकर मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल खाली येईल काय? हे परमेश्वरा इस्राएलाच्या देवा मी तुला विंनती करतो, हे तू आपल्या सेवकाला सांग.” परमेश्वर बोलला, “तो खाली येईल.”
12 मग दावीद म्हणाला कईलकर मला व माझ्या मनुष्यांना शौलाच्या हाती देतील काय? परमेश्वर बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील.
13 मग दावीद व त्याची माणसे उठून कईल्यांतून निघून गेली; ती सुमारे सहाशे माणसे होती. त्यांना जेथे जायला मिळाले तेथे ती गेली; तेव्हा दावीद कईल्यातून पळाला असे शौलाला कोणी सांगितले आणि त्याने तिकडे जायचे सोडले.
14 आणि दावीद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्यास त्याच्या हाती दिले नाही.
15 आपला जीव घ्यायला शौल निघाला आहे असे दावीदाने पाहिले आणि दावीद जीफ रानातील एका झाडीत होता;
16 शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दावीदाकडे गेला आणि त्याने त्याचा हात परमेश्वराच्याठायी सबळ केला.
17 तो त्यास म्हणाला, “भिऊ नको कारण माझा बाप शौल याच्या हाती तू लागणार नाहीस. तू तर इस्राएलावर राजा होशील आणि तुझ्याजवळ मीच पहिला तुझा सहाय्यक होईन हे माझा बाप शौलही जाणतो.”
18 तेव्हा त्या दोघांनी परमेश्वराच्यासमोर करार केला. मग दावीद झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.
19 जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनाच्या दक्षिणेकडे हकीला डोंगरातील झाडीत गडामध्ये दावीद आम्हाजवळ लपून राहिला आहे की नाही?
20 तर आता हे राजा, खाली येण्याच्या आपल्या सर्व मनोरथप्रमाणे खाली ये, म्हणजे त्यास राजाच्या हाती देणे हे आमचे काम असेल.”
21 तेव्हा शौल म्हणाला, “तुम्हास परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे.
22 मी तुम्हास विनंती करतो तुम्ही जा आणखी मन लावून त्याचा माग काढा आणि तेथे त्यास कोणी पाहिले याची माहिती काढून पाहा कारण तो फार चतुराईने वागतो असे मला कळाले आहे.
23 तर जेथे तो लपून राहतो त्या सर्व लपण्याच्या जागा पाहून त्यांची खात्री करून घ्या, मग खरे वर्तमान घेऊन माझ्याकडे परत या; त्यानंतर मी तुम्हाबरोबर जाईन आणि असे होईल की, तो त्या मुलुखात असला तर मी त्यास यहूदाच्या सर्व हजारांतून त्यास हुडकून काढीन.”
24 मग ते उठले आणि शौलापुढे जीफाकडे गेले; परंतु दावीद व त्याची माणसे यशीमोनाच्या दक्षिणेकडे मावोनाच्या रानात अराबात होती.
25 शौल व त्याची माणसे त्याचा शोध करायला आली. हे कोणी दावीदाला सांगितले, म्हणून तो खडकावरून उतरून मावोनाच्या रानात राहिला हे ऐकून शौल मावोनाच्या रानात दावीदाच्या मागे लागला.
26 शौल डोंगराच्या एका बाजूने चालला आणि दावीद व त्याची माणसे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने चालली आणि दावीदाने शौलापासून पळायला घाई केली कारण शौल व त्याची माणसे, दावीदाला आणि त्याच्या मनुष्यांना धरायला घेरीत होती.
27 परंतु एक निरोप्या शौलाकडे येऊन म्हणाला, लवकर ये कारण पलिष्ट्यांनी देशावर घाला घातला आहे.
28 तेव्हा शौल दावीदाचा पाठलाग सोडून पलिष्ट्यांवर चाल करून गेला. याकरिता त्या जागेचे नाव सेला हम्मालकोथ म्हणजे निसटून जाण्याचा खडक असे पडले.
29 मग दावीद तेथून वर जाऊन एन-गेदीच्या गडामध्ये राहिला.