29
पलिष्टी दाविदावर विश्वास ठेवत नाहीत
मग पलिष्ट्यांनी आपली सर्व सैन्ये अफेक येथे एकत्र जमवली आणि इस्राएली मनुष्यांनी इज्रेलात एका झऱ्याजवळ छावणी दिली. पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरासोबत व हजांरासोबत पुढे चालले आणि त्यांच्या पिछाडीस दावीद व त्याची माणसे आखीशाबरोबर चालली. तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार बोलले, “हे इब्री येथे काय करतात?” मग आखीश पलिष्ट्यांच्या सरदाराना म्हणाला, “इस्राएलाचा राजा शौल याचा चाकर दावीद तो हाच आहे की नाही? तो माझ्याजवळ काही दिवस किंवा काही वर्षे राहिला आहे. आणि तो माझ्याकडे आला त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्याकडे मला काही अपराध सापडला नाही.” मग पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; आणि पलिष्ट्यांचे सरदार त्यास म्हणाले, “जे ठिकाण तू या मनुष्यास नेमून दिले येथे त्याच्या ठिकाणी त्याने जावे म्हणून त्यास परत जाण्यास सांग; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर कदाचित तो लढाईत आमचा विरोधी होईल; कारण हा आपल्या प्रभूशी कशावरून समेट करणार नाही बरे? या आपल्या मनुष्यांच्या शिरांनीच की नाही? शौलाने हजारांना मारले व दावीदाने दहा हजारांना मारले, असे ते नाचत व गात ज्याच्याविषयी एकमेकांना म्हणाले, तोच हा दावीद आहे की नाही?” मग आखीशाने दावीदाला बोलावून त्यास म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे; तू सरळपणाने वागला आहेस व माझ्याबरोबर सैन्यात तुझे बाहेर जाणे व तुझे आत येणे माझ्या दृष्टीने बरे आहे. आणि तू माझ्याजवळ आला त्या दिवसापासून आजपर्यंत तुझ्याठायी काही वाईट मला सापडले नाही. तथापि तू सरदारांच्या मनास येत नाहीस. तर तू पलिष्ट्यांच्या सरदारांना असंतूष्ट करू नये. म्हणून आता शांतीने निघून परत जा.” तेव्हा दावीद आखीशाला म्हणाला, “मी आपला धनी राजा याच्या शत्रूशी लढायला येऊ नये असे मी काय केले आहे? मी तुमच्या पुढे आलो त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हास आपल्या दासाच्याठायी काय सापडले आहे?” तेव्हा आखीशाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा चांगला आहेस असे मी जाणतो. परंतु याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये असे पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले आहेत. 10 तर आता तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासहीत तू पहाटेस ऊठ आणि उजेड झाला म्हणजे परत माघारे जा.” 11 मग पलिष्ट्यांच्या देशात परत जाण्यास दावीद व त्याची माणसे मोठ्या पहाटेस उठली; पलिष्टी वर इज्रेल येथे गेले.