3
शमुवेलाला परमेश्वराचे पाचारण
1 शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली देवाची सेवा करीत होता. परमेश्वराचे वचन त्या दिवसात दुर्मिळ झाले होते; वारंवार भविष्यसूचक दृष्टांत होत नव्हते.
2 त्या वेळेस असे झाले की, एली आपल्या ठिकाणी झोपला होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्यास डोळ्यांनी चांगले दिसत नव्हते;
3 आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता, आणि देवाचा कोश परमेश्वराच्या मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपला होता.
4 परमेश्वराने शमुवेलाला हाक मारली, तेव्हा तो म्हणाला, “मी येथे आहे.”
5 मग शमुवेल एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” आणि एलीने म्हटले, “मी बोलावले नाही परत जाऊन झोप.” म्हणून शमुवेल परत जाऊन झोपला.
6 पुन्हा परमेश्वराने, “शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” एलीने उत्तर दिले, “माझ्या मुला मी तुला बोलावले नाही; परत जाऊन झोप.”
7 शमुवेलाला तर अजून परमेश्वराचा काही अनुभव आला नव्हता, आणि परमेश्वराचा संदेश अजून त्यास प्रगट झालेला नव्हता.
8 मग परमेश्वराने शमुवेलाला पुन्हा तिसऱ्याने हाक मारली. तेव्हा तो पुन्हा उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” तेव्हा एलीला समजले की, परमेश्वराने मुलाला हाक मारली आहे.
9 मग एली शमुवेलाला म्हणाला, “तू जाऊन पुन्हा झोप; आणि जर त्याने तुला पुन्हा हाक मारली, तर असे म्हण, हे परमेश्वरा बोल कारण तुझा दास ऐकत आहे.” मग शमुवेल परत जाऊन आपल्या जागी झोपला.
10 आणि परमेश्वर आला आणि उभा राहिला; त्याने पहिल्या वेळेप्रमाणे, “शमुवेला शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल तुझा दास ऐकत आहे.”
11 परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा इस्राएलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की, जो कोणी ती ऐकेल त्या प्रत्येकाचे कान भणभणतील.
12 एलीच्या घराण्याविषयी जे मी सांगितले, ते मी सर्व आरंभापासून शेवटपर्यंत मी त्याच्या विरूद्ध पूर्ण करीन.
13 कारण मी त्यास सांगितले की जो अन्याय त्यास माहित आहे, त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही.
14 यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण यांकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही दूर होणार नाही.”
15 नंतर शमुवेल सकाळपर्यंत झोपला; मग त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. पण शमुवेल एलीला हा दृष्टांत सांगाण्यास घाबरत होता.
16 मग एलीने शमुवेलाला हाक मारून म्हटले, “माझ्या मुला शमुवेला.” तेव्हा शमुवेल म्हणाला, “हा मी येथे आहे.”
17 मग त्याने म्हटले, “तो तुझ्याशी काय बोलला? मी तुला विनंती करतो ते माझ्यापासून लपवून ठेवू नको. जे काही त्याने तुला सांगितले त्यातले काही जर तू माझ्यापासून लपवून ठेवशील तर परमेश्वर तुझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो.”
18 तेव्हा शमुवेलाने सर्वकाही त्यास सांगितले; त्याच्यापासून काही लपवून ठेवले नाही. मग एली म्हणाला, तो “परमेश्वरच आहे. त्यास बरे वाटेल ते तो करो.”
19 आणि शमुवेल वाढत गेला आणि परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि त्याने त्याचा एकही भविष्यविषयक शब्द सत्यात अपयशी होऊ दिला नाही.
20 शमुवेल परमेश्वराचा नियुक्त केलेला भविष्यवादी आहे असे दानापासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएलांना समजले.
21 शिलोत परमेश्वराने पुन; दर्शन दिले, कारण त्याने शिलो येथे वचनाद्वारे स्वतःला शमुवेलाला प्रगट केले.