3
वधूचे विचार
1 (ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता,
ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो,
त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले;
पण तो मला सापडला नाही.
2 मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती,
रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन.
मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही.
3 शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले.
मी त्यांना विचारले, “माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?”
4 मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते.
इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला.
मी त्यास धरले. मी त्यास जाऊ दिले नाही.
मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले.
जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही.
5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो,
रानतल्या हरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते.
आमचे प्रेम करणे संपत नाही,
तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका.
वरात
6 (ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील
सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने
अशी धुराच्या खांबासारखी,
रानातून येणारी ती ही कोण आहे?
7 पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे.
त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत,
ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत.
8 ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत.
रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला
करायला ते तयार आहेत.
9 राजा शलमोनाने स्वत:साठी
लबानोनी लाकडाची पालखी तयार केली.
10 त्याचे खांब चांदीचे केले.
पाठ सोन्याची केली.
बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली.
त्याचा अंतर्भाग यरूशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे.
11 (ती स्त्री यरूशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा.
ज्या दिवशी त्याचे लग्र झाले,
त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा.
त्या दिवशी तो खूप आनंदी होता.