6
चार रथ
1 मग मी वळून आपले डोळे वर करून बघितले तेव्हा दोन पर्वतांमधून चार रथ जातांना दिसले. ते पर्वत पितळेचे होते.
2 पहिल्या रथला तांबडे रंगाचे घोडे होते. दुसऱ्या रथाला काळ्या रंगाचे घोडे होते.
3 तिसऱ्या रथाला पांढऱ्या रंगाचे घोडे होते आणि चौथ्या रथाला ठिपके असलेले राखाडी घोडे होते.
4 मग माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, हे काय आहे?”
5 देवदूत म्हणाला, “ते चार प्रकारचे स्वर्गातले वारे आहेत. ते अखिल पृथ्वीच्या प्रभू समोर उभे होते व आता बाहेर येत आहेत.
6 काळे घोडे उत्तर देशाला, पांढरे घोडे पश्चिम देशाला व ठिपके असलेले राखाडी घोडे दक्षिण देशाला जात आहेत.”
7 तांबडे घोडेही बाहेर पडले, त्यांचा पृथ्वीभर फिरण्याचा कल होता. म्हणून देवदूताने त्यांना पृथ्वीवर फिरण्यास सांगितले मग ते पृथ्वीवर फिरले.
8 मग त्याने मला हाक मारुन सांगितले, “बघ, उत्तरेकडे गेलेल्या घोड्यांनी आपले काम पूर्ण केले आहे. उत्तर देशात त्यांनी माझा आत्मा शांत केला आहे.”
यहोशवाला प्रतीकात्मक मुकुट
9 मग मला परमेश्वराचे वचन मिळाले. तो म्हणाला,
10 बंदिवासात असलेल्या हेल्दय, तोबीया व यदया ह्यास सोबत घे. त्याच्याकडून सोने आणि चांदी घेऊन, सफन्याचा मुलगा, योशीयाच्या घरी आजच जा, ते बाबेलाहून आले आहेत.
11 त्या सोन्या-चांदीपासून मुकुट घडव. तो यहोसादाकाचा मुलगा यहोशवा मुख्ययाजक याच्या डोक्यावर ठेव.
12 मग त्यास पुढील गोष्टी सांग: “सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो:
‘फांदी’ नावाचा एक मनुष्य आहे. तो आपल्या स्थानावर उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.
13 तो परमेश्वराचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली होईल. स्वत:च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील.
तो सिंहासनावर याजकही होईल. या दोन्हीमध्ये शांतीची सहमती असेल.”
14 “तो मुकुट परमेश्वराच्या मंदिरात ठेवतील. हेलेम, तोबीया, यदया व सफन्याचा मुलगा हेन ह्यांचे परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्या दानशूरपणाची आठवण म्हणून ठेवण्यात येईल.
15 दूरवर राहणारे लोक येतील आणि परमेश्वराचे मंदिर बांधतील मग तुमची खात्री पटेल की सेनाधीश परमेश्वरानेच मला तुमच्याकडे पाठवले आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक परमेश्वराची वाणी ऐकाल तर असे होईल.”