17
दाविदाशी परमेश्वराचा करार
2 शमु. 7:1-29
आणि असे झाले की, राजा दावीद आपल्या घरी राहत होता, तो नाथान संदेष्ट्यास म्हणाला, “पहा, मी गंधसरूच्या घरात राहत आहे, पण परमेश्वराचा कराराचा कोश मात्र अजूनही एका तंबूतच राहत आहे.” तेव्हा नाथान दावीदास म्हणाला, “जा, तुझ्या मनात जे आहे ते कर, कारण देव तुझ्याबरोबर आहे.”
पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानाकडे आले व म्हणाले, “जा आणि माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, मला राहण्यासाठी तू घर बांधायचे नाही. कारण मी इस्राएलांस वर आणले त्यादिवसापासून आजपर्यंत मी मंदिरात राहिलेलो नाही. त्याऐवजी, मी विविध ठिकाणी, तंबूतून व मंडपातूनच राहत आलो आहे. सर्व इस्राएलाबरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्राएलाच्या पुढाऱ्यांतील कोणा एकालाही ‘माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो काय?’ ”
“तर आता, माझा सेवक दावीद याला सांग की, ‘सर्वशक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे” की, तू माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला गायरानातून, मेंढरांच्या मागून काढून घेतले. आणि जेथे कोठे तू गेलास त्याठिकाणी मी तुझ्याबरोबर होतो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून कापून टाकले. आणि पृथ्वीवर जे कोणी महान लोक आहेत त्यांच्या नावासारखे मी तुझे नाव करीन.
माझ्या इस्राएल लोकांस मी एक जागा नेमून देईन आणि त्यांना त्याठिकाणी स्थिर करीन, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जागी राहतील व त्यांना कसलाही त्रास होणार नाही. पूर्वीसारखे दुष्ट लोक त्यांच्यावर जुलूम करणार नाही. 10 मी माझ्या इस्राएल लोकांवर न्यायाधीश नेमले होते त्यादिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन, मी तुला आणखी सांगतो की, परमेश्वर तुझे घर बांधील.
11 आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजाकडे गेल्यावर, मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा पुत्र, त्यास मी उभे करीन, मी त्याचे राज्य स्थापीन. 12 तो माझ्यासाठी घर बांधील आणि मी त्याचे सिंहासन सर्वकाळ स्थापित करीन.
13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्यापूर्वी शौल राज्य करत होता. त्याच्यावरची मी माझी कृपादृष्टी काढून घेतली तशी तुझ्यावरची माझी कृपादृष्टी दूर करणार नाही. 14 मी त्यास माझ्या घरात आणि राज्यात सर्वकाळ ठेवीन, त्याचे राजासन सर्वकाळ स्थापीन. 15 नाथान दावीदाशी बोलला आणि त्याने त्यास सर्व वचने व संपूर्ण दर्शनाबद्दल सविस्तर सांगितले.
16 नंतर दावीद राजा आत गेला व परमेश्वरासमोर जाऊन बसला; तो म्हणाला, “हे परमेश्वर देवा, मी कोण आहे, आणि माझे घराणे काय की तू मला येथपर्यंत आणले आहे?” 17 आणि हे देवा, तुझ्यादृष्टीने ही केवळ लहान गोष्ट होती, पण तू तुझ्या सेवकाच्या घराविषयी भविष्यात येणाऱ्या बऱ्याच दिवसांबद्दल बोलला आहेस. व हे परमेश्वर देवा, मला तू भविष्यातील पिढ्या दाखवल्या आहेत. 18 तुझ्या सेवकाचा तू सन्मान केला आहेस. आणखी मी, दावीद, तुला काय बोलू? तुझ्या सेवकाला तू विशेष ओळख दिली आहेस.
19 हे परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी व तुझा स्वतःचा हेतू पूर्ण व्हावा, म्हणून तू या सर्व महान गोष्टी प्रगट करण्यासाठी अदभुत कृत्ये केलीस. 20 हे परमेश्वरा, जे सर्व आम्ही आजवर आमच्या कानांनी ऐकले त्याप्रमाणे तुजसमान कोणी नाही आणि तुझ्याशिवाय कोणीच देव नाही. 21 आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; या तुझ्या लोकांस तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रांस घालवून दिले.
22 तू इस्राएलांना आपले स्वतःचे लोक सर्वकाळासाठी करून ठेवले आणि परमेश्वरा तू त्यांचा देव झालास. 23 म्हणून आता, हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस, ते सर्वकाळ स्थापित कर. तू बोलला आहेस तसे कर. 24 तुझे नाव सर्वकाळ स्थापित व्हावे व थोर केले जावे, असे म्हणून, सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. दावीद, तुझा सेवक याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे.
25 कारण, माझ्या देवा, तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की, तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरिता तुझ्या सेवकाला, तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे. 26 आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तुझ्या सेवकाला हे चांगले अभिवचन दिले आहे. 27 तर आता, संतुष्ट होऊन तुझ्या सेवकाच्या घराण्याला तुझ्यापुढे सर्वकाळ राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. हे परमेश्वरा, तू, आशीर्वाद दिलास आणि ते सर्वकाळ आशीर्वादित आहे.