18
दावीद आपले साम्राज्य वाढवतो
2 शमु. 8:1-14
यानंतर असे झाले की, दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गथ आणि त्यांची गावे घेतली. मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दावीदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले.
मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दावीदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला. दावीदाने त्याच्याकडून एक हजार रथ, सात हजार सारथी, आणि वीस हजार पायदळ एवढे घेतले. दावीदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून शंभर रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.
जेव्हा दिमिष्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले, त्यांच्यापैकी बावीस हजार लोकांसही दावीदाने जिवे मारले. नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने बस्थान बसविले. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे.
हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरूशलेमेला आणल्या. हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली.
जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली. 10 तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले, कारण दावीद हद्देजराविरुध्द लढला व त्याचा पराभव केला, तोवू आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्याबरोबर सोने, रुपे, पितळ याची भांडी आणली. 11 जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून, अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांच्यापासून घेतले होते, ती भांडीही दावीद राजाने परमेश्वरास समर्पिली.
12 सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांस मारले. 13 अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला.
दाविदाचे अंमलदार
2 शमु. 8:15-18
14 दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतिने वागत असे. 15 सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता. 16 अहीटूबचा पुत्र सादोक आणि अब्याथारचा पुत्र अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता. 17 यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार * याजकहोते.

*18:17 याजक