11
बाबेल येथील बुरूज
आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते. ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली. ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते. मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.” आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला. परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही. चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.” मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले. त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
शेमाचे वंशज
उत्प. 10:21-31; 1 इति. 1:17-27; लूक 3:34-36
10 ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला. 11 अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला. 12 अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला. 13 शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 14 जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला; 15 एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 16 एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला. 17 पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 18 पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला. 19 रऊ याला जन्म दिल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 20 रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरुगाला जन्म दिला. 21 सरुगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 22 सरुग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला. 23 नाहोराला जन्म दिल्यावर सरुग दोनशे वर्षे जगला आणि त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. 24 नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला. 25 तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला. 26 तेरह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला.
तेरहाचे वंशज
27 तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला. 28 हारान, आपला पिता तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर येथे मरण पावला. 29 अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता. 30 साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते. 31 मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, हारानचा मुलगा लोट, आणि आपली सून म्हणजे अब्रामाची पत्नी साराय यांना बरोबर घेऊन खास्द्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला आणि प्रवास करीत ते हारान प्रदेशापर्यंत येऊन तेथे राहिले. 32 तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.