12
आब्रामाला देवाचे पाचारण आणि अभिवचने
प्रेषि. 7:2-5
आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील, जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, परंतु जो कोणी तुझा अनादर करील त्यास मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.” परमेश्वराने अब्रामाला सांगितल्याप्रमाणे त्याने केले, तो गेला आणि त्याच्याबरोबर लोट गेला. त्याने हारान सोडले त्या वेळी अब्राम पंचाहत्तर वर्षांचा होता. अब्रामाने त्याची पत्नी साराय, त्याच्या भावाचा मुलगा लोट आणि हारान प्रदेशामध्ये त्यांनी जमा केलेली सर्व मालमत्ता, आणि हारानात विकत घेतलेले लोक या सर्वांना बरोबर घेतले. ते कनान देशात जाण्यासाठी निघाले आणि कनान देशात आले. अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेमापर्यंत मोरेच्या एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली. मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहचला व त्याने तेथे तंबू ठोकला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली. त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व दक्षिणेकडील नेगेब वाळवंटाकडे गेला.
अब्रामाचे मिसर देशात वास्तव्य
उत्प. 20:1-18; 26:1-11
10 त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; म्हणून अब्राम खाली मिसर देशामध्ये राहायला गेला. कारण देशात तीव्र दुष्काळ पडला होता. 11 मिसर देशात प्रवेश करण्यापूर्वी अब्राम आपली पत्नी साराय हिला म्हणाला, “पाहा मला माहीत आहे की, तू अतिशय सुंदर स्त्री आहेस. 12 मिसराचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, ही त्याची पत्नी आहे, आणि मग तुझ्यासाठी ते मला मारून टाकतील, परंतु तुला जिवंत ठेवतील. 13 म्हणून, तू माझी बहीण आहेस, असे तू लोकांस सांग. म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि ते मला मारणार नाहीत, अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.” 14 अब्रामाने जेव्हा मिसर देशात प्रवेश केला, तेव्हा तेथील लोकांनी पाहिले की साराय ही फार सुंदर स्त्री आहे. 15 मिसर देशाचा राजा फारो याच्या राजकुमारांनी सारायला पाहिले व त्यांनी आपला राजा फारो याच्याजवळ तिच्या सौंदर्याची स्तुती केली आणि तिला राजाच्या घरी घेऊन जाण्यात आले. 16 तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले. त्यास मेंढरे, गुरेढोरे, व गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी व उंटही मिळाले. 17 अब्रामाची पत्नी साराय हिला फारोने नेले म्हणून परमेश्वराने फारो व त्याच्या घरातील लोकांस भयंकर पीडांनी पीडले. 18 तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला, “तू हे माझ्याबाबत का केलेस? साराय तुझी पत्नी आहे हे तू मला का सांगितले नाहीस? 19 ती माझी बहीण आहे असे तू का म्हणालास? मला पत्नी करण्यासाठी मी तिला नेले होते, परंतु मी आता तुझी पत्नी तुला परत करतो, तिला घेऊन जा.” 20 मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या माणसांना आज्ञा दिली. तेव्हा अब्राम व त्याची पत्नी साराय यांनी आपले सर्वकाही बरोबर घेऊन मिसर सोडले.