24
यहोशवाचा अखेरचा निरोप
निर्ग. 24:9-18
तेव्हा यहोशवाने इस्राएलाचे सर्व वंश शखेमात एकवट करून इस्राएलाचे वडील व त्याचे पुढारी व त्याचे न्यायाधीश व त्यावरले अधिकारी यांस बोलावले, आणि ते देवापुढे हजर झाले. तेव्हा यहोशवाने सर्व लोकांस सांगितले, “इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो की, पूर्वकाळी तुमचे पूर्वज फरात महानदी पलीकडे राहत होते; अब्राहामाचा पिता व नाहोराचा पिता तेरह तेथे होता; तेव्हा त्यांनी दुसऱ्या देवाची सेवा केली. परंतु त्याने तुमचा पूर्वज अब्राहाम ह्याला महानदीच्या पलीकडून आणले, आणि त्यास कनान देशात नेले आणि तेव्हा मी त्यास इसहाकाद्वारे पुष्कळ वंशज दिले, आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या पुत्रपौत्रांसह मिसर देशी गेला. मग मी मोशे व अहरोन यांना पाठवले आणि मिसऱ्यांना पीडा देऊन पीडिले, नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. तेव्हा मी तुमच्या पूर्वजांस मिसर देशातून बाहेर आणले आणि तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला, तेव्हा मिसरी, रथ व घोडे घेऊन, तांबड्या समुद्रापर्यंत त्यांच्या पाठीस लागले. तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला, मग त्याने तुमच्या व मिसऱ्यांच्या मध्ये काळोख पाडला, आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना बुडवले; मी मिसरात जे केले, ते तर तुमच्या डोळ्यांनी पाहिले, आणि मग तुझी रानात बहुत दिवस राहिला. मग जे अमोरी यार्देनेच्या पलीकडे राहत होते, त्यांच्या देशात मी तुम्हाला आणले; तेव्हा त्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले, आणि तुम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला; मी त्यांचा तुमच्यापुढे नाश केला. नंतर मवाबाचा राजा सिप्पोरपुत्र बालाक त्याने उठून इस्राएलाशी लढाई केली; तेव्हा त्याने दूत पाठवून बौराचा पुत्र बलाम याला तुम्हाला शाप देण्यासाठी बोलावले. 10 परंतु बलामाचे मी ऐकले नाही; यास्तव त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला, आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडवले. 11 मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हा यरीहोचे मालक, अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, ह्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले; 12 मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवल्या, आणि त्यांनी त्यांना तुमच्यासमोरून घालवले; अमोऱ्याचे दोन राजे यांना घालवले; तुझ्या तलवारीने व धनुष्यानेही हे झाले नाही. 13 याप्रमाणे ज्या देशाविषयी तुम्ही श्रम केले नाहीत, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत, ती मी तुम्हाला दिली आहेत, तुम्ही त्यामध्ये राहत आहा; द्राक्षमळे व जैतूनबने जी तुम्ही लावली नाहीत, त्यांचे तुम्ही फळ खात आहात. 14 तर आता तुम्ही पूर्णपणाने व सत्यतेने परमेश्वरास भिऊन त्याची सेवा करा, आणि फरात नदीच्या पूर्वेकडे व मिसर देशात तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली, त्यांना दूर करून परमेश्वर देवाचीच सेवा करा. 15 जर परमेश्वर देवाची सेवा करणे हे जर तुम्हाला वाईट वाटते, तर तुम्ही ज्याची सेवा कराल, त्यास आज आपल्यासाठी निवडून घ्या; फरात नदीच्या पूर्वेकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली, त्यांची सेवा करा, किंवा ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांची सेवा करा, परंतु मी व माझ्या घरची माणसे आम्ही परमेश्वराचीच सेवा करू.” 16 तेव्हा लोकांनी असे उत्तर केले की, “परमेश्वर देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवांची सेवा कधीच करणार नाही; 17 कारण परमेश्वर आमचा देव आहे; त्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशांच्या दास्यातून बाहेर आणले; आणि ज्याने आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले, आणि ज्या वाटेने आम्ही गेलो व ज्या ज्या राष्ट्रामधून आम्ही मार्गक्रमण केले त्यामध्ये त्याने आमचे रक्षण केले, 18 आणि देशात राहणाऱ्या अमोऱ्यांनासह सर्व राष्ट्रांस परमेश्वराने आमच्यापुढून घालवले आहे; आणखी परमेश्वर आमचा देव आहे म्हणून आम्ही त्याची सेवा करू.” 19 परंतु यहोशवाने लोकांस सांगितले, “तुम्ही परमेश्वर देवाची सेवा करू शकणार नाही; कारण की तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अधर्माची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. त्याने तुमचे चांगले केले तो तुम्हाला भस्म करेल. 20 जर तुम्ही परमेश्वरास सोडून आणि परक्या देवांची सेवा कराल, तो उलटून तुमचे वाईट करील, तुमची हानीही करील.” 21 तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “असे नाही, आम्ही परमेश्वराची सेवा करू.” 22 तेव्हा यहोशवा लोकांस म्हणाला, “तुम्ही आपल्या स्वतःचे साक्षी आहात, तुम्ही परमेश्वराची सेवा करण्यास त्यास आपल्यासाठी निवडून घेतले आहे.” ते म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत.” 23 “असे आहे तर आता तुमच्यामध्ये जे परके देव असतील, ते तुम्ही दूर करा, आणि आपले अंतःकरण इस्राएलाचा देव परमेश्वर याकडे लावा.” 24 तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “आमचा देव परमेश्वर याची सेवा आम्ही करू; आम्ही त्याची वाणी ऐकू.” 25 त्याच दिवशी यहोशवाने लोकांबरोबर करार केला, आणि शखेमात त्याठिकाणी नियम व कायदे स्थापले. 26 तेव्हा यहोशवाने ही वाक्ये देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिली, आणि मोठी धोंड घेऊन, तेथे परमेश्वराच्या पवित्र स्थानी जे एला झाड, त्याच्याखाली ती उभी केली. 27 आणि यहोशवाने सर्व लोकांस म्हटले, “पाहा, ही धोंड आमच्याविषयी साक्षीदार होईल, कारण की परमेश्वराने आपली जी सर्व वचने आमच्याजवळ सांगितली ती हिने ऐकली आहेत; तर ही तुमच्याविषयी साक्षीदार यासाठी व्हावी की तुम्ही आपल्या देवाला कधी नाकारू नये.” 28 मग यहोशवाने लोकांस त्यांना त्यांच्या वतनाकडे रवाना केले.
यहोशवा आणि एलाजार ह्यांचा मृत्यू
29 मग या गोष्टी झाल्यावर असे झाले की नूनाचा पुत्र परमेश्वराचा सेवक यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन मेला. 30 मग त्याच्या वतनाच्या सीमेत एफ्राइमाच्या डोंगरवटीवर जे तिम्नाथ-सेरह आहे त्यामध्ये, गाश डोंगराच्या उत्तरेस लोकांनी त्यास पुरले. 31 आणि यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि जे वडील यहोशवाच्या मागे अधिक आयुष्य पावले, म्हणजे परमेश्वराने आपले जे काम इस्राएलासाठी केले होते, ते अवघे ज्यांनी पाहिले होते, त्यांच्या सर्व दिवसात इस्राएलांनी परमेश्वराची सेवा केली. 32 आणि शखेमात जो शेतभूमीचा भाग याकोबाने शखेमाचा बाप हमोर याच्या संतानांजवळून शंभर रुप्याच्या तुकड्यावर विकत घेतला होता, आणि जो योसेफाच्या संतानांच्या वतनाचा झाला त्यामध्ये, योसेफाची जी हाडे इस्राएली लोकांनी मिसर देशातून वर आणली होती, ती त्यांनी पुरली. 33 आणि अहरोनाचा पुत्र एलाजार मेला, तेव्हा त्याचा पुत्र फिनहास याची टेकडी जी एफ्राइमाच्या डोंगरवटीत, त्यास दिली होती, तिजवर त्यांनी त्यास पुरले.