77
देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाने समाधान
आसाफाचे स्तोत्र
मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन;
मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल.
माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले.
मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही.
माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.
मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो;
मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो.
तू माझे डोळे उघडे ठेवतोस;
मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.
मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे
याबद्दल मी विचार करतो.
रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते.
मी काळजीपूर्वक विचार करतो
आणि काय घडले हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय?
तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का?
त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का?
त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का?
देव दया करण्याचे विसरला का?
त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का?
10 मी म्हणालो, हे माझे दुःख आहे,
आमच्या प्रती परात्पराचा उजवा हात बदलला आहे
11 पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन;
मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.
12 मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन,
आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
13 हे देवा, तुझे मार्ग पवित्र * चमत्कारीक आहेत,
आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.
14 अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस.
तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.
15 याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना,
आपल्या लोकांस आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस.
16 हे देवा, जलाने तुला पाहिले,
जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले,
खोल जले कंपित झाली.
17 मेघांनी पाणी खाली ओतले;
आभाळ गडगडाटले;
तुझे बाणही चमकू लागले.
18 तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली;
विजांनी जग प्रकाशमय केले;
पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली.
19 समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या,
पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाहीत.
20 मोशे आणि अहरोन याच्या हाताने
तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस.

*77:13 चमत्कारीक