78
एकनिष्ठपणे न वागणाऱ्यावरही देवाची कृपा
आसाफाचे स्तोत्र
अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका,
माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या.
मी शहाणपणाचे गीत गाईन;
मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन.
ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या,
त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही.
त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये,
त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले
आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले.
त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की,
त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या.
त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या,
त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.
मग ते आपली आशा देवावर ठेवतील
आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत
परंतु त्याच्या आज्ञा पाळतील.
तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे
हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये,
त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही,
आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.
एफ्राइमाचे वंशज धनुष्यासह सशस्र होती,
परंतु त्यांनी युद्धाच्यादिवशी पाठ फिरवली.
10 त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही,
आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले.
11 ते त्याची कृत्ये
व त्याने दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले.
12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात
त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या.
13 त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलिकडे नेले,
त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले.
14 तो त्यांना दिवसा मेघ
व रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे.
15 त्याने रानात खडक फोडला,
आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले.
16 त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह
आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले.
17 तरी ते त्याच्याविरुध्द पाप करितच राहिले.
रानात परात्पराविरूद्ध बंड केले.
18 नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी,
अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले.
19 ते देवाविरूद्ध बोलले,
ते म्हणाले, “देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकेल का?
20 पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले,
आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले.
पण भाकरही देऊ शकेल काय?
तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय?”
21 जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला;
म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला,
आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला,
22 कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही,
आणि त्याच्या तारणावर भरवसा ठेवला नाही.
23 तरी त्याने वर आभाळाला आज्ञा दिली,
आणि आभाळाचे दरवाजे उघडले.
24 खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला,
आणि त्यांना आकाशातून धान्य दिले.
25 देवदूतांची भाकर लोकांनी खाल्ली.
त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले.
26 त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला,
आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला.
27 त्याने त्यांच्यावर धुळीप्रमाणे मांसाचा
आणि समुद्रातील वाळूप्रमाणे असंख्य पक्षांचा वर्षाव केला.
28 ते त्यांच्या छावणीच्यामध्ये पडले,
त्यांच्या तंबूच्या सर्व सभोवती पडले.
29 मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हावेप्रमाणे त्याने त्यांना दिले.
30 पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती;
त्यांचे अन्न त्यांच्या तोडांतच होते.
31 त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला,
आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले.
त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले.
32 इतके झाले तरी ते पाप करितच राहीले,
आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही.
33 म्हणून देवाने त्यांचे दिवस थोडके केले;
त्यांचे आयुष्य भयानक भयात संपवले.
34 जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली.
उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले.
35 देव आमचा खडक आहे,
आणि परात्पर देव आमचा सोडवणारा याची आठवण त्यांना झाली.
36 पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली
आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली.
37 कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते,
आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते.
38 परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही.
होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो,
आणि आपला सर्व राग भडकू देत नाही.
39 ती केवळ देह आहेत,
वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही याची त्याने आठवण केली.
40 त्यांनी किती वेळा रानात त्याच्याविरुध्द बंडखोरी केली,
आणि पडिक प्रदेशात त्यांनी त्यास दु:खी केले.
41 पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले,
आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु:खविले.
42 त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही,
त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते.
43 मिसरात जेव्हा त्याने आपली घाबरून सोडणारी चिन्हे
आणि सोअनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखविले ते विसरले.
44 त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले.
म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना.
45 त्याने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले त्यांनी त्यांना खाऊन टाकले,
आणि बेडकांनी त्यांचा देश आच्छादला.
46 त्याने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली
आणि त्यांच्या श्रमाचे फळ टोळाला दिले.
47 त्याने गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा
आणि त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश बर्फाने केला.
48 त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या
व त्यांचे कळप विजांच्या हवाली केली.
49 त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले.
त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले.
50 त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला;
त्याने त्यांना मरणापासून वाचविले नाही
पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले.
51 त्याने मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व,
हामाच्या तंबूतील* हामचे तंबू हा मिसरबद्दल बोलण्याचा एक मार्ग आहे (105:23, 27; 106:22 पहा, जिथे मिसरला “हामची भूमी असे म्हटले आहे”). हाम हा नोहाच्या मुलांपैकी एक होता, आणि त्याला मिसरी लोकांचा पूर्वज म्हटले गेले (उत्पत्ती 10:6 पहा). त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले.
52 त्याने आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर नेले
आणि त्याने त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले.
53 त्याने त्यांना सुखरुप आणि न भीता मार्गदर्शन केले,
पण समुद्राने त्यांच्या शत्रूंना बुडवून टाकले.
54 आणि त्याने त्यास आपल्या पवित्र देशात,
हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले.
55 त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना हाकलून लावली,
आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली; आणि त्यांच्या तंबूत इस्राएलाचे वंश वसविले.
56 तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्याविरुध्द बंडखोरी केली,
आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
57 ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली;
फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते.
58 कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले
आणि आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्यास आवेशाने कोपविले.
59 जेव्हा देवाने हे ऐकले, तो रागावला,
आणि त्याने इस्राएलाला पूर्णपणे झिडकारले.
60 त्याने शिलोतले शिलो हे शहर एफ्राइमाच्या कुळाचा प्रदेश होते, जेथे इस्राएलाच्या इतिहासाच्या सुरवातीच्या दिवसात कराराचा कोश ठेवण्यात आला होता (यहो. 18:1; 1 शमु. 1:3 पहा). पवित्रस्थान सोडून दिले,
ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता.
61 त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली,
आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले.
62 त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले,
आणि आपल्या वतनावर तो रागावला.
63 अग्नीने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले,
आणि त्यांच्या तरुण स्रीयांना लग्नगीते लाभली नाहीत.
64 त्यांचे याजक तलवारीने पडले,
आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.
65 मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला,
द्राक्षरसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला.
66 त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले;
त्याने त्यांची कायमची नामुष्की केली.
67 त्याने योसेफाचा तंबू नाकारला,
आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही.
68 त्याने यहूदाच्या वंशाला निवडले,
आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.
69 उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या
पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.
70 त्याने आपला सेवक दावीदाला निवडले,
आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.
71 आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन
करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले.
72 दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले,
आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला.

*78:51 हामचे तंबू हा मिसरबद्दल बोलण्याचा एक मार्ग आहे (105:23, 27; 106:22 पहा, जिथे मिसरला “हामची भूमी असे म्हटले आहे”). हाम हा नोहाच्या मुलांपैकी एक होता, आणि त्याला मिसरी लोकांचा पूर्वज म्हटले गेले (उत्पत्ती 10:6 पहा).

78:60 शिलो हे शहर एफ्राइमाच्या कुळाचा प्रदेश होते, जेथे इस्राएलाच्या इतिहासाच्या सुरवातीच्या दिवसात कराराचा कोश ठेवण्यात आला होता (यहो. 18:1; 1 शमु. 1:3 पहा).