4
आत्म्यांची परीक्षा करा
1 प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत. 2 याप्रकारे तुम्ही परमेश्वराचा आत्मा ओळखू शकता: जो प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्त देह धारण करून आले होते हे स्वीकारतो, तो परमेश्वरापासून आहे. 3 परंतु प्रत्येक आत्मा जो येशूंचा अंगीकार करीत नाही तो परमेश्वरापासून नाही. हा तर ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे, ज्याच्या येण्याबद्दल तुम्ही ऐकले आहे आणि तो आधीच जगामध्ये आलेला आहे.
4 प्रिय लेकरांनो, तुम्ही परमेश्वराचे आहात आणि जे ख्रिस्ताचे विरोधक आहेत, त्यांच्याशी झगडून तुम्ही विजय मिळविला आहे, कारण जगात जो आहे, त्याच्यापेक्षा जे तुम्हामध्ये आहेत, ते श्रेष्ठ आहेत. 5 हे लोक या जगाचे आहेत आणि म्हणून साहजिकच या जगाच्या गोष्टींबद्दल त्यांना आस्था वाटते आणि जगही त्यांच्याकडे लक्ष देते. 6 आम्ही परमेश्वरापासून आहोत आणि जे परमेश्वराला ओळखतात ते आमचे ऐकतात; परंतु जे कोणी परमेश्वरापासून नाहीत ते आमचे ऐकत नाहीत. याद्वारेच आम्ही सत्याचा आत्मा कोणता आणि फसवणुकीचा आत्मा कोणता हे ओळखतो.
परमेश्वराची प्रीती व आपली प्रीती
7 प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहेत आणि ते परमेश्वराला ओळखतात. 8 परंतु जे प्रीती करीत नाहीत, ते परमेश्वराला ओळखत नाहीत, कारण परमेश्वर प्रीती आहेत. 9 परमेश्वराने आपल्यावरील प्रीती अशी प्रकट केलीः त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका पुत्राला या जगात पाठविले यासाठी की, आपल्याला त्यांच्याद्वारे जीवन लाभावे. 10 प्रीती हीच आहे: आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्यांनी आपणावर प्रीती केली आणि आपल्या पापांसाठी त्यांच्या पुत्राला प्रायश्चिताचा बळी म्हणून पाठविले. 11 प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली, त्याअर्थी आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. 12 परमेश्वराला कोणीही कधीही पाहिले नाही; परंतु जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर, परमेश्वर आपल्यामध्ये राहतात आणि त्यांची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण झाली आहे.
13 ते आपल्यामध्ये राहतात व आपण त्यांच्यामध्ये राहतो, याचा पुरावा हा आहेः त्यांनी स्वतःचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे. 14 आम्ही पाहिले आहे आणि अशी साक्ष देतो की, पित्याने त्यांच्या पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. 15 येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असे जर कोणी अंगीकृत करतात तर, त्यांच्यामध्ये परमेश्वर राहतात आणि ते परमेश्वरामध्ये राहतात. 16 परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो.
परमेश्वर प्रीती आहेत. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. 17 अशा रीतीने प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते, यासाठी की न्यायाच्या दिवशी आपल्याला असा आत्मविश्वास प्राप्त व्हावाः या जगात आपण येशू सारखे आहोत. 18 प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.
19 आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो, कारण त्यांनी प्रथम आम्हावर प्रीती केली. 20 जे कोणी परमेश्वरावर प्रीती करण्याचा दावा करतात, तरी आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतात तर ते लबाड आहेत. कारण जर कोणी आपल्या भावाला आणि बहिणीला पाहत असूनही त्यांच्यावर प्रीती करीत नाही, तर ते परमेश्वरावर प्रीती करू शकत नाहीत, ज्यांना त्यांनी पाहिलेले नाही. 21 परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिली आहेः जे कोणी परमेश्वरावर प्रीती करतात त्यांनी आपल्या भावावर आणि बहिणीवर सुद्धा प्रीती करावी.