5
परमेश्वराच्या पुत्रावरील विश्वास
1 येशू हे ख्रिस्त आहेत, असा विश्वास ठेवणारा प्रत्येकजण परमेश्वरापासून जन्मला आहे आणि प्रत्येकजण जे पित्यावर प्रीती करतात ते त्यांच्या लेकरावरही प्रीती करतात. 2 आपण परमेश्वराच्या मुलांवर प्रीती करतो हे यावरून आपणास समजतेः परमेश्वरावर प्रीती करावी व त्यांच्या आज्ञांचे पालन करावे. 3 परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणे होय आणि त्यांच्या आज्ञा जाचक नाहीत 4 कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे. 5 जगावर मात करणारे असे ते कोण आहेत? फक्त तेच आहेत जे येशू हेच परमेश्वराचे पुत्र आहेत असा विश्वास धरतात.
6 पाणी आणि रक्त यांच्याद्वारे जे आले तेच येशू ख्रिस्त आहेत. ते केवळ पाण्याच्याद्वारे आले नाहीत, परंतु पाण्याच्या आणि रक्ताच्याद्वारे आले. जो साक्ष देतो तो परमेश्वराचा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे. 7 याबद्दल तिघे जण साक्ष देतात: 8 आत्मा, पाणी आणि रक्त या तिघांमध्ये*काही आधुनिक प्रतींनुसार स्वर्गामध्ये पिता, शब्द आणि पवित्र आत्मा साक्ष देतात, आणि ते तिघे एक आहेत एकमत आहे. 9 आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारतो, परंतु परमेश्वराची साक्ष सर्वात महान आहे, कारण ती परमेश्वराने दिलेली साक्ष आहे जी त्यांनी त्यांच्या पुत्राबद्दल दिली आहे. 10 जे कोणी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात ते ही साक्ष स्वीकारतात. जे कोणी यावर विश्वास ठेवीत नाहीत, परमेश्वराने त्यांना लबाड ठरविले आहे, कारण परमेश्वराने त्यांच्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही; 11 हीच ती साक्ष आहे: परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्यांच्या पुत्रामध्ये आहे. 12 ज्या कोणामध्ये परमेश्वराचा पुत्र वसतो, त्याच्यामध्ये जीवन आहे; ज्याच्यामध्ये परमेश्वराचा पुत्र वसत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही.
समाप्तीचे अभिप्राय
13 मी तुम्हाला हे लिहित आहे यासाठी की, तुम्ही जे परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता त्या तुम्हाला हे माहीत असावे की, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळालेले आहे. 14 आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात. 15 जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे.
16 ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही. 17 प्रत्येक चुकीचे कृत्य पाप आहे आणि असेही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाही.
18 आपल्याला माहीत आहे की, जे कोणी परमेश्वरापासून जन्मले आहेत ते पाप करीत राहत नाहीत; जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांना परमेश्वर सुरक्षित ठेवतात आणि तो दुष्ट त्यांना अपाय करू शकत नाही. 19 आपल्याला हे माहीत आहे की, आपण परमेश्वराची लेकरे आहोत आणि संपूर्ण जग त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. 20 आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की, परमेश्वराचे पुत्र ख्रिस्त आले आहेत आणि आपण खर्या परमेश्वराला ओळखावे यासाठी त्यांनी आपल्याला बुद्धी दिली आहे. त्यांचे पुत्र येशू ख्रिस्तामध्ये असल्याने, जे खरे आहेत त्यांच्यामध्ये आपण आहोत. तेच एकमेव खरे परमेश्वर आहेत आणि तेच सार्वकालिक जीवन आहेत.
21 प्रिय लेकरांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर ठेवा.
*5:8 काही आधुनिक प्रतींनुसार स्वर्गामध्ये पिता, शब्द आणि पवित्र आत्मा साक्ष देतात, आणि ते तिघे एक आहेत