13
यहूदीयातील परमेश्वराचा संदेष्टा
1 याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता. 2 याहवेहच्या वचनानुसार तो वेदीविरुद्ध ओरडला: “वेदी, हे वेदी! याहवेह असे म्हणतात: ‘दावीदाच्या घराण्यात योशीयाह नावाचा पुत्र जन्माला येईल. जे याजक तुझ्यावर येथे यज्ञ करतात, त्यांचे यज्ञ तो तुझ्यावर करेल, मनुष्यांची हाडे तुझ्यावर जाळली जातील.’ ” 3 त्याच दिवशी परमेश्वराच्या मनुष्याने एक चिन्ह दिले: “याहवेहने हेच चिन्ह जाहीर केले आहे: वेदी दुभागली जाईल आणि त्यावरील राख ओतली जाईल.”
4 जेव्हा यरोबोअम राजाने परमेश्वराच्या मनुष्याने बेथेलात वेदीविरुद्ध जे काही सांगितले ते ऐकले, तेव्हा वेदीवरून आपला हात पुढे करून तो म्हणाला, “त्याला पकडा!” परंतु जो हात त्याने पुढे केला होता, तो वाळून गेला आणि त्याला तो मागे घेता येईना. 5 आणि याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराच्या मनुष्याने जे चिन्ह दिले त्यानुसार वेदी दुभागली व वेदीवरील राख ओतली गेली.
6 तेव्हा राजाने परमेश्वराच्या मनुष्याला म्हटले, “याहवेह तुझ्या परमेश्वराकडे माझ्यासाठी मध्यस्थी कर व माझा हात पूर्ववत व्हावा म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहकडे मध्यस्थी केली आणि राजाचा हात बरा होऊन पूर्ववत झाला.
7 राजा त्या परमेश्वराच्या मनुष्यास म्हणाला, “माझ्याबरोबर भोजन करण्यास घरी चल आणि मी तुला एक भेट देईन.”
8 परंतु परमेश्वराच्या मनुष्याने राजाला उत्तर दिले, “तू जरी मला तुझी अर्धी संपत्ती दिली, तरीही मी तुझ्याबरोबर जाणार नाही, या ठिकाणी ना मी भाकर खाणार, ना पाणी पिणार. 9 कारण याहवेहच्या वचनाने मला आज्ञा दिली आहे: ‘तू तिथे ना भाकरी खावी ना पाणी प्यावे किंवा ज्या वाटेने तू जातोस त्या वाटेने परत येऊ नये.’ ” 10 म्हणून ज्या मार्गाने तो बेथेलास आला होता त्याने न जाता, दुसर्या मार्गाने रवाना झाला.
11 तेव्हा बेथेलमध्ये एक वृद्ध संदेष्टा राहत होता, त्याच्या मुलांनी येऊन त्याला परमेश्वराच्या मनुष्याने त्या दिवशी जे केले ते सर्वकाही सांगितले. आणि तो राजाला जे काही बोलला ते देखील सांगितले. 12 त्यांच्या पित्याने त्यांना विचारले, “तो कोणत्या मार्गाने गेला?” आणि परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आलेला होता तो ज्या मार्गाने गेला होता तो त्यांनी त्याला सांगितला. 13 तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “माझ्यासाठी गाढवावर खोगीर घाला.” आणि त्यांनी तसे केल्यानंतर तो गाढवावर बसला 14 आणि परमेश्वराच्या मनुष्याचा पाठलाग करीत गेला. तो त्याला एका एलाच्या वृक्षाखाली बसलेला दिसला. त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला तो तूच आहेस काय?”
तो म्हणाला, “होय, तो मीच आहे.”
15 त्या संदेष्ट्याने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर घरी चल आणि भोजन कर.”
16 परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “मी मागे वळून तुझ्याबरोबर जाऊ शकत नाही, ना मी तुझ्याबरोबर या ठिकाणी भाकर खाऊ शकत ना पाणी पिऊ शकत. 17 याहवेहच्या वचनाद्वारे मला सांगितले गेले: ‘तू तिथे भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये किंवा ज्या मार्गाने तू आलास, त्याने परत जाऊ नये.’ ”
18 त्या वृद्ध संदेष्ट्याने उत्तर दिले, “जसा तू तसाच मीही संदेष्टा आहे, आणि याहवेहच्या वचनाने दूत मला म्हणाला: ‘त्याने भाकर खावी व पाणी प्यावे म्हणून त्याला परत तुझ्या घरी घेऊन ये.’ ” (परंतु तो त्याच्याशी खोटे बोलत होता.) 19 म्हणून परमेश्वराचा मनुष्य त्याच्याबरोबर माघारी गेला व त्याच्या घरी खाणेपिणे केले.
20 ते मेजावर जेवायला बसले असताना, याहवेहचे वचन त्या वृद्ध संदेष्ट्याकडे आले, ज्याने त्याला माघारी आणले होते. 21 तो परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला होता त्याला ओरडून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तू याहवेहच्या वचनाचा अवमान केला आहेस आणि याहवेहने तुला दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही. 22 माघारी येऊन, ज्या ठिकाणी तू भाकर खाऊ नये किंवा पाणी पिऊ नये असे याहवेहने तुला सांगितले होते, तिथे तू खाणेपिणे केले. म्हणून तुझ्या पूर्वजांच्या कबरेत तुझे शरीर पुरले जाणार नाही.’ ”
23 परमेश्वराच्या मनुष्याचे खाणेपिणे झाल्यानंतर, ज्या संदेष्ट्याने त्याला माघारी आणले होते त्याने त्याच्यासाठी गाढवावर खोगीर घातले. 24 त्याच्या वाटेने जात असताना, त्याला वाटेत एका सिंहाने गाठले व त्याला मारून टाकले आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडून राहिले असून, त्याच्या एका बाजूला सिंह व दुसर्या बाजूला गाढव उभे राहिले. 25 जे लोक त्या रस्त्याने येणे जाणे करीत होते त्यांनी त्याच्या शरीराच्या बाजूला सिंह उभा आहे असे पाहिले आणि त्यांनी शहरात जाऊन ज्या ठिकाणी वृद्ध संदेष्टा राहत होता तिथे ही बातमी सांगितली.
26 त्याला त्याच्या प्रवासातून माघारी आणलेल्या त्या संदेष्ट्याने त्याविषयी ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराचा मनुष्य, ज्याने याहवेहच्या वचनाचा अवमान केला तो हाच. याहवेहने त्याला सिंहाच्या स्वाधीन केले व त्याने त्याला फाडून मारून टाकले, याहवेहने त्याला चेतवणी दिल्यानुसार ते घडले आहे.”
27 तेव्हा त्या संदेष्ट्याने त्याच्या मुलांना म्हटले, “माझ्यासाठी गाढवावर खोगीर घाला,” त्यानुसार त्यांनी केले. 28 तेव्हा तो गेला आणि त्याचे शरीर रस्त्यावर पडलेले व त्याच्या बाजूला गाढव व सिंह उभे असलेले आढळले. सिंहाने ना त्याचे शरीर खाऊन टाकले होते ना त्या गाढवाला फाडले होते. 29 मग त्या संदेष्ट्याने परमेश्वराच्या मनुष्याचे शरीर उचलून गाढवावर ठेवले आणि त्याच्यासाठी शोक करावा व त्याला पुरावे म्हणून आपल्या शहरात आणले. 30 मग त्याने त्याचे शरीर आपल्याच कबरेत ठेवले व म्हणाला, “अरेरे, माझ्या भावा!”
31 त्याला पुरल्यानंतर, संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला, “मी मेल्यावर, परमेश्वराच्या मनुष्याला ज्या कबरेत पुरले आहे तिथेच मलाही ठेवा; त्याच्या हाडांजवळ माझी हाडे असू द्या. 32 कारण बेथेलमधील वेदी व शोमरोन नगरातील उच्च स्थानावरील मंदिरांविरुद्ध याहवेहच्या वचनानुसार त्याने जे काही जाहीर केले ते निश्चितच घडून येणार.”
33 यानंतरही, यरोबोअमने त्याचे दुष्टमार्ग सोडले नाही व पुन्हा प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून पूजास्थानांसाठी याजकांची नेमणूक केली. ज्या कोणाला याजक होण्यास इच्छा होईल त्यांना त्याने पूजास्थानांसाठी वेगळे केले. 34 यरोबोअमचे घराण्याचे हे पाप त्यांच्या पतनास व पृथ्वीवरून त्यांच्या नाशास कारण झाले.