14
अहीयाहचे यरोबोअमविरुध्द भविष्य
1 त्या काळात यरोबोअमचा पुत्र अबीयाह आजारी पडला, 2 आणि यरोबोअम आपल्या पत्नीस म्हणाला, “यरोबोअमची पत्नी म्हणून तुला कोणी ओळखू नये म्हणून आपला वेष पालट. मग शिलोह येथे जा. मी या लोकांचा राजा होईल असे ज्या व्यक्तीने मला सांगितले असा अहीयाह नावाचा संदेष्टा तिथे आहे. 3 तुझ्याबरोबर दहा भाकरी, काही वड्या आणि मधाची एक कुपी घेऊन त्याच्याकडे जा आणि मुलाचे काय होईल ते तो तुला सांगेल.” 4 म्हणून यरोबोअमच्या पत्नीने त्याने सांगितल्याप्रमाणे केले व शिलोह येथे अहीयाहच्या घरी गेली.
अहीयाह तर आता त्याच्या वयामुळे पाहू शकत नव्हता; त्याची दृष्टी मंद झाली होती. 5 परंतु याहवेहने अहीयाहला आधी सांगून ठेवले होते, “यरोबोअमची पत्नी तिच्या मुलाबद्दल तुला विचारण्यास येत आहे, कारण तो आजारी आहे आणि तू तिला असे उत्तर द्यावे. जेव्हा ती आत येईल तेव्हा ती कोणी दुसरीच स्त्री असल्याचे ढोंग करेल.”
6 जेव्हा अहीयाहने दाराजवळ तिच्या पावलांचा आवाज ऐकला, तेव्हा तो म्हणाला, “यरोबोअमचे पत्नी, आत ये. हे सोंग तू का घ्यावे? दुःखाची बातमी घेऊन मला तुझ्याकडे पाठविले गेले आहे. 7 जा, यरोबोअमला सांग, याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुला लोकांमधून वर काढले आणि माझ्या इस्राएली लोकांवर त्यांचा अधिकारी असे नेमले. 8 दावीदाच्या घराण्यापासून राज्य फाडून ते मी तुला दिले, पण तू माझा सेवक दावीदाप्रमाणे नाहीस, त्याने माझ्या आज्ञा पाळल्या व त्याच्या आयुष्यभर त्यांचे अनुसरण केले आणि केवळ जे माझ्या दृष्टीने योग्य ते त्याने केले. 9 पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुष्कर्मे केली आहेस. तू आपल्यासाठी इतर दैवत घडविलेस, धातूच्या मूर्ती बनविल्यास; तू माझा क्रोध पेटविला आहेस आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.
10 “ ‘यामुळे यरोबोअमच्या घरावर मी अरिष्ट आणणार आहे. मी इस्राएलातून यरोबोअमच्या घराण्याचा प्रत्येक शेवटचा पुरुष नष्ट करेन; मग तो गुलाम असो वा मोकळा असो. यरोबोअमचे घराणे संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत शेणाप्रमाणे जाळून टाकीन. 11 यरोबोअमच्या घराण्यातील जे कोणी शहरात मरण पावतील त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खाऊन टाकतील. याहवेहने हे म्हटले आहे!’
12 “तर तू आता ऊठ, परत घरी जा. शहरात तुझे पाऊल पडताच तुझा मुलगा मरण पावेल. 13 सर्व इस्राएली त्याच्यासाठी शोक करून त्याला पुरतील. यरोबोअमच्या घराण्यातील तो एकटाच आहे जो पुरला जाईल, कारण तो एकटाच आहे ज्याच्या ठायी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराला काहीतरी चांगले आढळले आहे.
14 “याहवेह स्वतःच आपल्यासाठी इस्राएलवर असा राजा उभा करतील जो यरोबोअमच्या कुटुंबाचा उच्छेद करेल. ते आताच घडण्यास सुरुवात होत आहे. 15 याहवेह इस्राएलवर असा वार करतील की ते वाहत्या पाण्यावरील बोरूप्रमाणे होतील. जी चांगली भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली, त्यातून मी त्यांना उपटून टाकीन व फरात*फरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीपलीकडे त्यांना पांगून टाकीन, कारण त्यांनी अशेराची खांब तयार करून याहवेहला क्रोधित केले आहे. 16 यरोबोअमने जी पापे केली व इस्राएलला सुद्धा करण्यास भाग पाडले यामुळे याहवेह त्यांचा त्याग करतील.”
17 तेव्हा यरोबोअमची पत्नी तिथून उठून तिरजाह येथे गेली. तिने उंबरठ्यावर पाऊल टाकताच, तिचा मुलगा मेला. 18 अहीयाह आपला सेवक जो संदेष्टा याच्याद्वारे याहवेहने जे सांगितले त्याप्रमाणे, त्यांनी त्याला पुरले व सर्व इस्राएलने त्याच्यासाठी शोक केला.
19 यरोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने कसे राज्य केले व कशा लढाया लढल्या हे सर्व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिले आहे. 20 यरोबोअमने बावीस वर्षे राज्य केले आणि तो त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. त्याचा पुत्र नादाब त्याचा वारस झाला.
यहूदीयाचा राजा रेहोबोअम
21 त्यावेळी शलोमोनचा पुत्र रेहोबोअम हा यहूदीयाचा राजा होता. तो राजा झाला त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती.
22 याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते यहूदीयाच्या लोकांनी केले. आणि जी पापे त्यांनी केली त्यामुळे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांपेक्षा त्यांनी याहवेहला अधिक क्रोधित केले. 23 प्रत्येक पसरलेल्या झाडाखाली त्यांनी त्यांच्यासाठी पूजास्थाने, पवित्र धोंडे व अशेराची खांब बनविली. 24 त्यावेळी देशात मंदिरामध्ये पुरुषगामीही होती; जे सर्व याहवेहने इस्राएलातून काढून टाकले होते, त्या सर्वप्रकारच्या अमंगळ कृत्यांमध्ये लोक भाग घेत होते.
25 रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, इजिप्तचा राजा शिशाकने यरुशलेमवर हल्ला केला. 26 त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले. 27 म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती त्या स्वाधीन केल्या. 28 जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन उभे राहत असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.
29 रेहोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने केलेली कृत्ये यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत की नाही? 30 रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले. 31 रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांजवळ पुरण्यात आले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. त्याचा पुत्र अबीयाह†काही इब्री मूळ प्रतींनुसार अबीयाम राजा म्हणून त्याचा वारस झाला.