15
यहूदीयाचा राजा अबीयाह
नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह*काही मूळ प्रतींनुसार अबीयाम यहूदीयाचा राजा झाला, त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह होते जी अबशालोमची कन्या होती.
त्याच्या वडिलांनी त्याच्यापूर्वी जी पापे केली होती ती सर्व पापे त्याने केली; त्याचा पूर्वज दावीदाप्रमाणे त्याचे हृदय याहवेह त्याच्या परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित नव्हते. तरीपण दावीदाप्रित्यर्थ याहवेह त्याचे परमेश्वर यांनी त्याला त्याचा वारस म्हणून यरुशलेमात त्याला दीप दिला व यरुशलेमास बलवान बनविले. कारण दावीदाने याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले होते आणि उरीयाह हिथीची घटना वगळता, दावीद आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात याहवेहची कोणतीही आज्ञा पाळण्यापासून मागे वळला नाही.
अबीयाहच्या जीवनभर यरोबोअम आणि रेहोबोअमकाही मूळ प्रतींनुसार अबीयाह यांच्यामध्ये युद्ध होत राहिले. अबीयाहच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले ते सर्व यहूदीया देशाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? अबीयाह व यरोबोअम यांच्यातील युद्ध सुरूच होते. मग अबीयाह त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र आसा राजा म्हणून त्याचा वारस झाला.
यहूदीया राजा आसा
इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी आसा यहूदीयाचा राजा झाला, 10 आणि त्याने यरुशलेमात एकेचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माकाह होते ती अबशालोमची कन्या होती.
11 आसाने आपला पूर्वज दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. 12 त्याने मंदिरातून पुरुषगामी करणार्‍यांना देशाबाहेर घालवून दिले आणि त्याच्या पूर्वजांनी केलेल्या मूर्ती देखील काढून टाकल्या. 13 त्याने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली, 14 जरी त्याने पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते. 15 त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने याहवेहच्या मंदिरात आणले.
16 यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले. 17 यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशाने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.
18 त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील भांडारात उरलेले सर्व चांदी व सोने काढून घेतले व ते आपल्या सरदारांच्या हाती स्वाधीन करून त्यांना हेजीओनचा पुत्र ताब्रिम्मनचा पुत्र बेन-हदाद, अरामचा राजा जो दिमिष्कात राज्य करीत होता त्याच्याकडे पाठवले. 19 आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोन्याची भेट पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”
20 बेन-हदद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठविले. त्याने इय्योन, दान, आबेल-बेथ-माकाह आणि नफतालीसहीत संपूर्ण किन्नेरेथवर विजय मिळविला. 21 बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबवून तिरजाह येथे राहिला. 22 मग आसा राजाने सर्व यहूदीयात एक हुकूम जाहीर केला; त्यातून कोणीही वगळले नाही; आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने बिन्यामीनातील गेबा आणि मिस्पाह हे बांधले.
23 आसाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याचे सर्व पराक्रम, जे सर्वकाही त्याने केले व जी शहरे त्याने बांधली, ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? पण त्याच्या वृद्धापकाळात तो पायाच्या आजाराने त्रस्त झाला. 24 मग आसा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरला गेला. आणि त्याचा पुत्र यहोशाफाट राजा म्हणून त्याचा वारस झाला.
इस्राएलचा राजा नादाब
25 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यरोबोअमचा पुत्र नादाब इस्राएलचा राजा झाला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले. 26 याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. आपल्या पित्याचे अनुसरण करीत, त्याच्या पित्याने इस्राएली लोकांना जी पापे करण्यास लावले होते, त्याच मार्गाला तो लागला.
27 इस्साखार गोत्रातील अहीयाहचा पुत्र बाशाने नादाबाविरुद्ध कट केला, नादाब व सर्व इस्राएली लोकांनी गिब्बथोनला वेढा घातला असता, त्याने त्याला पलिष्ट्यांच्या गिब्बथोन नगरात मारून टाकले. 28 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बाशाने नादाबला ठार केले व तो स्वतः त्याच्या जागी राजा झाला.
29 त्याच्या राज्याच्या सुरुवातीलाच, त्याने यरोबोअमच्या संपूर्ण घराण्याला मारून टाकले, याहवेहचा सेवक शिलोनी अहीयाहच्या वचनानुसार त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही, सर्वांचा नाश केला. 30 जी पापे यरोबोअमने केली आणि इस्राएली लोकांना देखील करावयाला लावली आणि त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा राग भडकाविला म्हणून हे सगळे घडले.
31 नादाबच्या राज्याच्या इतर घटना, आणि जे सर्वकाही त्याने केले ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेल्या नाहीत काय? 32 यहूदीयाचा राजा आसा व इस्राएलचा राजा बाशा यांच्यात त्यांच्या आयुष्यभर युद्ध होत राहिले.
इस्राएलचा राजा बाशा
33 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी अहीयाहचा पुत्र बाशा हा तिरजाह येथे इस्राएलचा राजा झाला. त्याने चोवीस वर्षे राज्य केले. 34 याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. त्याने यरोबोअमच्या मार्गाचे अनुसरण करून जी पापे त्याने इस्राएलास करण्यास लावले, तीच पापे बाशानेही केली.

*15:1 काही मूळ प्रतींनुसार अबीयाम

15:6 काही मूळ प्रतींनुसार अबीयाह