16
1 हनानीचा पुत्र येहूकडे बाशासंबंधी याहवेहचे जे वचन आले ते हे: 2 “मी तुला धुळीतून उचलून माझ्या इस्राएली लोकांवर अधिकारी नेमले, परंतु तू यरोबोअमचा मार्ग अनुसरला आहेस व माझ्या इस्राएली लोकांना पाप करावयाला भाग पाडले आणि त्यांच्या पापामुळे माझा क्रोध भडकविला आहे. 3 म्हणून मी बाशा व त्याच्या घराण्याला नाहीसे करेन आणि मी तुझ्या घराण्याला नेबाटाचा पुत्र यरोबोअम याच्या घराण्यासारखे करेन. 4 बाशाच्या मालकीचा जो कोणी शहरात मरेल त्यांना कुत्रे खातील आणि जे शहराच्या बाहेर मरतील त्यांना पक्षी खातील.”
5 बाशाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली कृत्ये व त्याची यशप्राप्ती, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही? 6 बाशा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला तिरजाह येथे पुरले गेले. त्याचा पुत्र एलाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.
7 त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.
इस्राएलचा राजा एलाह
8 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी, बाशाचा पुत्र एलाह तिरजाह येथे इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.
9 जिम्री, जो त्याच्या अधिकार्यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता. 10 तेव्हा जिम्री आत आला व त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकले आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा झाला. यहूदीयाचा राजा आसाच्या सत्ताविसाव्या वर्षी असे झाले.
11 तो राजा झाला व राजासनावर बसताच, त्याने बाशाच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले. कोणीही पुरुष, नातेवाईक किंवा मित्र त्याने जिवंत सोडला नाही. 12 याप्रकारे बाशाविरुद्ध याहवेहचे जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले गेले होते त्यानुसार, जिम्रीने बाशाच्या संपूर्ण घराण्याचा नाश केला; 13 कारण बाशाने व त्याचा पुत्र एलाहनी जी पापे केली आणि इस्राएली लोकांना देखील ती पापे करावयाला भाग पाडले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला होता.
14 एलाहच्या कारकिर्दीच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय?
इस्राएलचा राजा जिम्री
15 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी जिम्रीने तिरजाह येथे इस्राएलवर सात दिवस राज्य केले. सैन्याने पलिष्ट्यांच्या हद्दीतील गिब्बथोन नगराजवळ छावणी दिली होती. 16 जिम्रीने राजाविरुद्ध कट करून त्याला ठार मारले असे जेव्हा छावणीतील इस्राएली सैन्याने ऐकले, तेव्हा त्यांनी त्याच दिवशी सेनापती ओमरीला इस्राएलचा राजा म्हणून छावणीतच घोषित केले. 17 तेव्हा ओमरी व त्याच्या बरोबरच्या इस्राएली लोकांनी गिब्बथोन सोडून तिरजाह नगराला वेढा दिला. 18 शहर हस्तगत झाले आहे असे जेव्हा जिम्रीने पाहिले, तेव्हा तो राजवाड्याच्या किल्ल्यात गेला आणि त्यात स्वतःभोवती आग लावली आणि तो मेला. 19 कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करून त्याने पाप केले आणि यरोबोअमचे अनुसरण करीत त्याने जी पापे केली, ती केली व इस्राएली लोकांना सुद्धा ती पापे करावयाला भाग पाडले.
20 जिम्रीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेली बंडखोरी, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?
इस्राएलचा राजा ओमरी
21 आता इस्राएली लोक दोन भागात विभागले गेले; अर्ध्या लोकांनी गीनाथचा पुत्र तिबनी याला पाठिंबा दिला, तर अर्ध्यांनी ओमरीला राजा होण्यासाठी पाठिंबा दिला. 22 परंतु गीनाथचा पुत्र तिबनी याच्या समर्थकांपेक्षा ओमरीचे समर्थक अधिक प्रबळ झाले; म्हणून तिबनी मेला व ओमरी राजा झाला.
23 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या एकतिसाव्या वर्षी ओमरी इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने बारा वर्षे राज्य केले, त्यापैकी सहा वर्षे तिरजाह येथे राज्य केले. 24 त्याने शेमेर नावाच्या व्यक्तीकडून शोमरोन डोंगर चांदीचे दोन तालांत*सुमारे 68 कि.ग्रॅ. देऊन विकत घेतले आणि त्या डोंगरावर नगर बांधले व त्या डोंगराचा आधीचा मालक शेमेर याच्या नावानुसार शोमरोन असे नाव दिले.
25 पण ओमरीने सुद्धा याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले आणि त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्यांपेक्षा अधिक पाप केले. 26 त्याने पूर्णपणे नेबाटाचा पुत्र यरोबोअमचे अनुसरण केले होते, यरोबोअमने इस्राएली लोकांना जी पापे करावयाला भाग पाडले, ती त्याने केली आणि त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.
27 ओमरीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेल्या गोष्टी व त्याची यशप्राप्ती इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही? 28 ओमरी आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला शोमरोनात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र अहाब त्याचा वारस म्हणून राजा झाला.
इस्राएलचा राजा अहाब
29 यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी ओमरीचा पुत्र अहाब इस्राएलवर राज्य करू लागला. त्याने शोमरोन येथे इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले. 30 ओमरीचा पुत्र अहाबाने त्याच्या आधी होऊन गेलेल्यांपेक्षा याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. 31 नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पापांना क्षुल्लक समजून त्याचे अनुसरण केले; इतकेच नाही, तर त्याने सीदोनी राजा एथबालची कन्या ईजबेल हिच्याशी विवाह केला आणि बआलची सेवा व उपासना करू लागला. 32 शोमरोनात त्याने बआलासाठी जे मंदिर बांधले होते त्यात बआलासाठी एक वेदी उभारली. 33 अहाबाने अशेरा देवीचे स्तंभही उभारले आणि असे करून त्याच्या आधी होऊन गेलेल्या राजांपेक्षा याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या क्रोधाला अधिक भडकाविले.
34 अहाबाच्या काळात, बेथेलचा हिएल याने यरीहोची पुनर्बांधणी केली. त्याने त्याचा पाया घातला, तेव्हा त्याचा प्रथमपुत्र अबीराम मरण पावला आणि जेव्हा त्याची फाटके उभारली तेव्हा त्याचा सर्वात धाकटा पुत्र सगूब मरण पावला; नूनाचा पुत्र यहोशुआच्या द्वारे याहवेहने सांगितलेल्या वचनानुसार हे सर्व घडले.