18
दावीदाविषयी शौलाची भीती वाढली 
  1 दावीदाने शौलाशी आपले संभाषण संपविले, तेव्हा योनाथानचा जीव दावीदाशी जडला आणि जशी स्वतःवर तशी प्रीती त्याने दावीदावर केली.   2 त्या दिवसापासून शौलाने दावीदाला आपल्याजवळ ठेवले व त्याला त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही.   3 आणि योनाथानने दावीदाशी करार केला, कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जिवावर तशी दावीदावर प्रीती केली.   4 योनाथानने आपल्या अंगातील झगा काढून तो दावीदाला दिला. आपला अंगरखा, तलवार, धनुष्य व कंबरपट्टा सुद्धा दावीदाला दिले.   
 5 शौलाने दावीदाला कोणत्याही कामगिरीवर पाठविले तरी त्यात दावीद यशस्वी होत असे, म्हणून शौलाने त्याला आपल्या सैन्यात उच्च हुद्दा दिला. ते सर्व सैनिकांना व शौलाच्या अधिकार्यांनाही आवडले.   
 6 दावीदाने पलिष्टी गल्याथाला ठार मारल्यानंतर ज्यावेळी लोक परत घरी येत होते, त्यावेळी इस्राएलच्या सर्व नगरांतून प्रत्येक गावातून स्त्रिया गात व नाचत आणि हर्षाने डफ व झांजा वाजवित शौल राजाला भेटायला आल्या.   7 नाचत असताना त्यांनी गीत गाईले:  
“शौलाने त्याच्या हजारास वधले,  
दावीदाने त्याचे दहा हजार वधले.”   
 8 यामुळे शौल अतिशय रागावला; गीतांच्या या ओळींनी तो असंतुष्ट झाला. तो म्हणाला, “त्यांनी दावीदाला दहा हजारांचे श्रेय दिले आणि मला केवळ हजारांचे. राज्यावाचून त्याला आणखी काय मिळायचे राहिले?”   9 आणि तेव्हापासून शौलाने दावीदावर पाळत ठेवली.   
 10 दुसर्या दिवशी परमेश्वराकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर जोराने उतरला, तेव्हा तो आपल्या घरात भविष्यवाणी करू लागला. दावीद रोजच्याप्रमाणे आपली वीणा वाजवित होता व शौलाच्या हाती भाला होता   11 “मी दावीदाला भिंतीशी खिळून टाकीन” असे म्हणत शौलाने भाला फेकला, परंतु दावीदाने त्याला दोनदा चुकविले.   
 12 शौलाला दावीदाची भीती वाटत होती, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते परंतु शौलाला याहवेहने सोडले होते.   13 तेव्हा शौलाने दावीदाला आपल्या पुढून घालवून दिले व हजारांचा सेनापती म्हणून नेमले आणि दावीदाने त्या सैनिकांचे युद्धात नेतृत्व केले.   14 प्रत्येक कामात दावीद यशस्वी होत असे, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते.   15 दावीद किती यशस्वी होतो हे जेव्हा शौलाने पाहिले, तेव्हा त्याला दावीदाची अधिक भीती वाटू लागले.   16 परंतु सर्व इस्राएली व यहूदीयाचे लोक दावीदावर प्रीती करीत होते. कारण तो त्यांचे युद्धात नेतृत्व करीत असे.   
 17 एके दिवशी शौल दावीदास म्हणाला, “माझी थोरली कन्या मेरब तुला मी पत्नी म्हणून देईन, केवळ शौर्याने माझी सेवा कर व याहवेहच्या लढाया लढ.” कारण शौल स्वतःशी म्हणाला, “मी दावीदावर हात टाकणार नाही, पलिष्ट्यांनी ते करावे.”   
 18 परंतु दावीद शौलाला म्हणाला, “राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे, माझे कुटुंब काय आहे किंवा इस्राएलातील माझे कूळ काय आहे?”   19 तरीही जेव्हा शौलाची कन्या मेरबचा विवाह दावीदाशी होण्याची प्रत्यक्ष वेळ आली, तेव्हा तिचा विवाह महोलाथी अद्रीएल याच्याबरोबर झाला.   
 20 या दरम्यान शौलाची कन्या मीखल हिचे दावीदावर प्रेम जडले, हे ऐकून शौलाला आनंद झाला.   21 त्याने विचार केला, “मी तिला दावीदाला देईन, अशासाठी की ती त्याला पाश अशी होईल व पलिष्ट्यांचा हात त्याच्याविरुद्ध येईल.” तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझा जावई होण्यासाठी तुला अजून एक संधी आहे.”   
 22 तेव्हा शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली: “दावीदाशी गुप्तपणे बोलून सांगा की राजाला तू आवडतोस आणि त्याच्या सर्व सेवकांची तुझ्यावर प्रीती आहे; म्हणून राजाचा जावई हो.”   
 23 हे शब्द शौलाच्या सेवकांनी दावीदाला सांगितले. परंतु दावीद म्हणाला, “मी केवळ एक गरीब व अप्रसिद्ध मनुष्य आहे, राजाचा जावई होणे तुम्हाला फार हलकी गोष्ट वाटते काय?”   
 24 दावीद जे काही म्हणाला ते शौलाच्या सेवकांनी जेव्हा शौलाला कळविले,   25 शौलाने उत्तर दिले, “दावीदाला सांगा राजाला हुंडा म्हणून काही नको, मात्र राजाच्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून शंभर पलिष्ट्यांची अग्रत्वचा पाहिजे.” दावीद पलिष्ट्यांच्या हाती मरून जावा यासाठी ही शौलाची योजना होती.   
 26 सेवकांनी ज्यावेळी या गोष्टी दावीदाला सांगितल्या, तो राजाचा जावई होण्यास आनंदाने तयार झाला, ठरविलेल्या वेळे आधी   27 दावीदाने आपली माणसे आपल्याबरोबर घेतली व जाऊन दोनशे पलिष्ट्यांना मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणल्या, दावीद राजाचा जावई व्हावा म्हणून त्यांनी त्या मोजल्या. मग शौलाने आपली कन्या मीखल दावीदाला त्याची पत्नी म्हणून दिली.   
 28 जेव्हा शौलाला लक्षात आले की याहवेह दावीदाबरोबर होते आणि त्याची कन्या मीखल हिची दावीदावर प्रीती होती,   29 तेव्हा शौलाला दावीदाचे अधिकच भय वाटू लागले व तो त्याच्या आयुष्यभर दावीदाचा वैरी म्हणून राहिला.   
 30 पलिष्ट्यांच्या सरदारांनी बाहेर जाऊन युद्ध सुरूच ठेवले आणि जेव्हा ते असे करीत, त्या त्यावेळी शौलाच्या बाकीच्या सैन्यापेक्षा दावीदाला अधिक यश मिळे, आणि तो प्रसिद्ध होत गेला.