19
शौल दावीदाचा वध करावयास पाहतो
शौलाने त्याचा पुत्र योनाथान आणि सर्व सेवकांना सांगितले की त्यांनी दावीदाला मारून टाकावे. परंतु योनाथानला दावीद फार आवडत असे म्हणून त्याने दावीदाला सावध केले, “माझा पिता शौल तुला मारण्याची संधी शोधत आहे. तर उद्या सकाळपर्यंत तू सावध राहा; गुप्त ठिकाणी जा व तिथेच लपून राहा. तू जिथे आहेस तिथे बाहेर मैदानात माझ्या पित्याबरोबर मी उभा राहीन; त्याच्याशी मी तुझ्याविषयी बोलेन आणि जे मला समजेल ते मी तुला कळवेन.”
योनाथान त्याचा पिता शौल याच्याशी दावीदाबद्दल चांगले बोलत म्हणाला, “राजाने त्यांचा सेवक दावीद याचे काही वाईट करू नये; त्याने तुमचे काही वाईट केले नाही आणि त्याने जे काही केले त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा झाला आहे. त्याने त्याचा प्राण पणाला लावून त्या पलिष्ट्याला मारले. याहवेहने सर्व इस्राएलसाठी मोठा विजय मिळवून दिला आणि तुम्हाला ते पाहून आनंद झाला होता. तर मग दावीदासारख्या निर्दोष व्यक्तीला विनाकारण मारून तुम्ही पाप का करावे?”
शौलाने योनाथानचे बोलणे ऐकले आणि शपथ घेतली: “खचितच जिवंत याहवेहची शपथ, दावीदाला जिवे मारले जाणार नाही.”
तेव्हा योनाथानने दावीदाला बोलाविले आणि झालेले सर्व संभाषण त्याला सांगितले. त्याने त्याला शौलाकडे नेले आणि नेहमीप्रमाणे दावीद शौलापुढे राहिला.
त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आणि दावीद जाऊन पलिष्ट्यांशी लढला, त्याने त्यांना असे मारले की ते त्याच्यापुढून पळून गेले.
परंतु शौल आपल्या घरी हातात भाला घेऊन बसला असता दावीद त्याच्यापुढे वीणा वाजवित होता, तेव्हा याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर आला, 10 शौलाने दावीदाला आपल्या भाल्याने भिंतीशी खिळण्याचा प्रयत्न केला, परंतु दावीद तिथून निसटला आणि भाला भिंतीत शिरला. त्या रात्री दावीद निसटला.
11 शौलाने दावीदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारावे म्हणून माणसे पाठवली. परंतु दावीदाची पत्नी मीखल हिने त्याला सावध केले, “जर आज रात्री तू आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला नाही तर उद्या सकाळी तू मारला जाशील.” 12 तेव्हा मीखलने दावीदाला खिडकीतून खाली उतरविले आणि तो पळून गेला. 13 मीखलने एक मूर्ती घेऊन ती पलंगावर ठेवली, उशाकडे शेळीचे केस लावून ते एका वस्त्राने झाकले.
14 जेव्हा शौलाने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, तेव्हा मीखल म्हणाली, “तो आजारी आहे.”
15 तेव्हा शौलाने दावीदाला पाहण्यासाठी माणसे परत पाठवली आणि त्यांना सांगितले, “त्याच्या पलंगासहित त्याला घेऊन या म्हणजे मी त्याला ठार मारेन.” 16 परंतु जेव्हा माणसे आत गेली, त्यांना दिसले की पलंगावर मूर्ती होती आणि उशाशी शेळीचे केस.
17 शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसविलेस आणि त्याने पळून जावे म्हणून तू माझ्या शत्रूला का जाऊ दिलेस?”
मीखल त्याला म्हणाली, “मला तो म्हणाला, ‘मला जाऊ दे, मी तुला का मारावे?’ ”
18 जेव्हा दावीद निसटून पळाला तेव्हा तो रामाह येथे शमुवेलकडे गेला आणि शौलाने त्याच्याशी केले ते सर्वकाही त्यांना सांगितले. मग तो व शमुवेल नायोथ येथे जाऊन राहिले. 19 दावीद रामाहतील नायोथ येथे असल्याचे शौलाला कळले; 20 तेव्हा त्याने दावीदाला पकडण्यासाठी माणसे पाठवली, परंतु जेव्हा त्यांनी संदेष्ट्यांचा घोळका भविष्यवाणी करीत आणि शमुवेल त्यांचा पुढारी म्हणून तिथे उभा आहे असे पाहिले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा शौलाच्या माणसांवर आला आणि ते सुद्धा भविष्यवाणी करू लागले. 21 जे झाले याविषयी शौलाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने अजून माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. शौलाने तिसर्‍यांदा माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. 22 शेवटी, शौल स्वतः रामाहास निघाला व सेखू येथील मोठ्या विहिरीपर्यंत पोहोचल्यावर, त्याने विचारले, “दावीद व शमुवेल कुठे आहेत?”
ते म्हणाले, “रामाहतील नायोथ येथे ते गेले आहेत.”
23 शौल रामाहतील नाइयोथकडे निघाला. परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरही आला आणि नायोथपर्यंत पोहोचेपर्यंत भविष्यवाणी करीत चालत गेला. 24 त्याने आपली वस्त्रे काढली आणि शमुवेलपुढे भविष्यवाणी करू लागला. तो संपूर्ण दिवस व ती रात्र शौल विवस्त्र पडून राहिला. त्यावरूनच लोक म्हणतात, “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?”